बेलगाम ड्रॅगनच्या मुसक्या कोण आवळणार?
By विजय दर्डा | Published: September 8, 2020 05:30 AM2020-09-08T05:30:01+5:302020-09-08T05:30:02+5:30
कोरोना विषाणूची निर्यात केल्याचा संशय असलेल्या चीनमधून अमेरिकेत पोहोचली अज्ञात बियांची रहस्यमय पाकिटे.
- विजय दर्डा
चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह (vijaydarda@lokmat.com)
पुराणकथेतील कालिया नागाबद्दल तुम्ही ऐकले असेल. ज्या डोहात तो राहायचा त्याचे पाणी इतके विषारी झाले होते की, बाजूने जाणारे पशुपक्षीही मरून पडायचे. कालियाच्या विषाने यमुनाही विषारी झाली, त्यामुळे भगवान कृष्णाला यमुनेच्या प्रवाहात उडी घ्यावी लागली. कालियाला दहा तोंडे होती. कृष्णाने ती चिरडून टाकल्यावर कालियाला त्याची चूक कळली. आज चीन त्या कालिया नागासारखाच सारे जग गिळंकृत करू पाहत आहे. जगातल्या मोठ्या अर्थव्यवस्था असणाऱ्या इतर देशांप्रमाणेच चीनकडेही अणुबॉम्ब व इतर संहारक जैविक शस्रे आहेत. मानवी जीवन, मानवी अधिकारांची पत्रास या देशात ठेवली जात नाही. १९८९ मध्ये लोकशाहीची मागणी करणाऱ्या हजारो तरुणांना या देशाने तोफेच्या तोंडी दिले, रणगाड्यांखाली चिरडले. एखाद्या लढाईत लाखभर सैनिक मेले तर त्याची चीनला फिकीर नसते. अमेरिका, जपान किंवा भारतासारखा लोकशाही देश असा विचार तरी करू शकेल? उत्तर अर्थातच नाही असे आहे, कारण आपण माणसांचे जीवित, अधिकार यांची कदर करतो. चीनचे नेमके उलटे आहे. जगा आणि जगू द्या यावर त्यांचा विश्वासच नाही. हा देश देव मानत नाही. या निलाजऱ्या देशाने भगवान बुद्धांना कधीच हद्दपार केले आहे. या देशाच्या नसानसात कट-कारस्थानेच वाहत असतात. एकीकडे चीन भारताशी वाटाघाटींचे ढोंग करतो दुसरीकडे जमीन हडपण्याचा खुनशी खेळ खेळतो. रशियात भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी बोलणी केल्याच्या दुसऱ्याच दिवशी धमक्या देणाऱ्या चीनची प्रवृत्ती चलाख, कुटिल राक्षसासारखीच आहे. प्रश्न असा आहे की या अशा देशाच्या मुसक्या कशा आवळायच्या?
एक स्पष्ट केले पाहिजे. मी स्वत: चिनी जनतेच्या विरोधात नाही. तिथले लोक माझे मित्रच आहेत. चीनच्या पीपल्स पार्टीने त्यांना नरकयातनात ढकलले असल्याने मला चिनी नागरिकांची काळजीच वाटते. दहा लाखांहून अधिक बिगर मुस्लिमांना तुरुंगात टाकणाºया राक्षसी प्रवृत्तीच्या सरकारला माझा विरोध आहे. जगातल्या छोट्या असहाय्य देशाना वाट्टेल तशी कर्जे वाटून चीनने अंकित केले आहे. आता त्यांना या राक्षसाच्या तावडीतून कोण वाचवणार हाही प्रश्न आहेच. अशा स्थितीत मोठे देश चीनशी कसे लढतील? या घडीला जगातल्या किमान १०० देशांतले लोकशाहीचा बुरखा पांघरलेले हुकूमशहा चीनच्या तालावर नाचत आहेत. चीन उघडपणे दहशतवाद्यांना साथ देतो आहे. भारत सुरक्षा परिषदेत हाफिज सैदला दहशतवादी घोषित करू इच्छितो तर चीन तेथे नकाराधिकार वापरतो. अशा चीनशी लढणे कसे सोपे असेल?
कमालीची गोष्ट म्हणजे अवघ्या जगात चीनच्या विरोधात हवा असूनही चीन मात्र सतत सगळ्यांवर डोळे वटारत असतो. या देशाने अमेरिकेशी पंगा घेतला आहे. तिबेटप्रमाणेच चीन आता तैवान गिळू पाहतोय. जपानशी त्याच्या कुरबुरी चालू आहेत. दक्षिण चिनी समुद्र आणि लाल समुद्रातही त्याने उच्छाद मांडला आहे. भारतीय सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून ठेवली आहेच. भारत संयमाने वागतो आहे म्हणून ठीक, नाही तर युद्ध केव्हाच सुरू झाले असते. युरोपशीही चीनने शत्रुत्व पत्करले आहे. ऑस्ट्रेलियाशीही तोच प्रकार दिसतो. हाँगकाँगच्या प्रश्नावर ब्रिटनशी झालेला समझौता झुगारणाºया चीनपासून सुटकेसाठी कोणीही हॉँगकाँगच्या मदतीला आलेले नाही.
चीनच्या कुरापतीचे नवे उदाहरण समोर आले आहे. ‘चायना पोस्ट’ नावाच्या कुठल्या संस्थेकडून अमेरिकेतल्या विभिन्न राज्यातल्या लोकांना त्यांनी न मागवलेली पाकिटे आली. त्यावर ‘दागिने’ असे लिहिलेले होते. लोकांनी ती उघडली, तर आत विविध प्रकारच्या बिया होत्या. अमेरिकी सरकारला कळल्यावर हे बियाणे गोळा करण्यात आले. लोकांनी ते पेरू नये असे सांगितले गेले. अशी पाकिटे इतर देशातही गेली म्हणतात. गतसप्ताहात भारताने यासंदर्भात लोकांना सावध केले. यात कळीचा प्रश्न हा, की बियांची पाकिटे दुसऱ्या देशात पोहोचलीच कशी? कारण एका देशातून दुसऱ्या देशात बियाणे किंवा रोपे नेण्यास परवानगीच नसते. चीन यावर बोलायला तयार नाही. ‘चौकशी सुरू आहे’ एवढेच उत्तर दिले जाते आहे. अनेकांना आठवत असेल की भारतात मागे दुष्काळ पडल्यावर अमेरिकेतून लाल गहू आयात केला गेला. त्या गव्हाबरोबर गवताचे बीसुद्धा आले होते. या गवताने आपली हजारो एकर जमीन आजही नापीक ठेवली आहे. दुसऱ्या देशातली जमिनीची सुपीकता नष्ट करण्याचा चीनचा यामागे डाव असू शकतो. बेलगाम होत चाललेल्या चीनला जग लगाम कसा घालू शकेल हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे. चीनशी बहुतांश व्यवहार थांबवणाय़ऱ्या अमेरिकेचे मी अभिनंदन करतो. भारतानेही चिनी अॅप्सवर बंदी घातली शिवाय इतर काही पावले टाकली; पण यामुळे चीन सुधारेल? मला ते सोपे वाटत नाही. जगातल्या बलवान देशांनी मतभेद विसरून एकत्रितपणे चीनला लगाम घालण्याची आज गरज आहे.