ही तंबी कोण ऐकेल ?

By admin | Published: December 18, 2014 12:27 AM2014-12-18T00:27:30+5:302014-12-18T00:27:30+5:30

बोलायचे तर फक्त विकासाविषयी आणि सरकारच्या परिणामकारकतेविषयीच बोला. अवांतर बोलणे टाळा. या लक्ष्मणरेषेचा आदर करा’ अशी तंबी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

Who will hear this trick? | ही तंबी कोण ऐकेल ?

ही तंबी कोण ऐकेल ?

Next

बोलायचे तर फक्त विकासाविषयी आणि सरकारच्या परिणामकारकतेविषयीच बोला. अवांतर बोलणे टाळा. या लक्ष्मणरेषेचा आदर करा’ अशी तंबी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनात घेतलेल्या त्यांच्या पक्षातील खासदारांच्या बैठकीत साऱ्यांना दिली. ती देण्याआधी तेथे हजर असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांना त्यांनी सभागृहाबाहेर जायला सांगितले. या तंबीने भाजपाच्या उठवळ खासदारांनी त्यांच्या बेजबाबदार वक्तव्यांमुळे पंतप्रधानांना आणलेला वैतागच उघड केला आहे. ‘गुड गव्हर्नन्स अ‍ॅन्ड डेव्हलपमेंट’ याच गोष्टींवर सातत्याने बोलणारे नरेंद्र मोदी जातीधर्मावरून समाजात नको ते वाद निर्माण करण्याच्या त्यांच्या पक्षातील खासदारांच्या प्रयत्नांमुळे व्यथित आहेत आणि अशा तऱ्हेची तंबी त्यांनी याआधी किमान अर्धा डझनवेळा दिली आहे. या तंबीचा परिणाम होऊन ही माणसे गप्प होतील आणि त्यांनी दाखविलेल्या लक्ष्मणरेषेची मर्यादा सांभाळतील, अशी शक्यता मात्र कमी आहे. धर्मांधता आणि तिच्यातून येणारा इतर धर्मांविषयीचा द्वेष ज्यांच्या हाडीमासी रुजला आहे, त्यांच्याकडून अशा राजकीय सभ्यतेची अपेक्षाही फारशी बाळगता येत नाही. त्यातून हे पुढारी ज्या संघ संस्कारात वाढले, तो संस्कारही धार्मिक एकारलेपणाचा आणि परधर्माविषयीच्या टोकाच्या द्वेषाचा आहे. स्वत: नरेंद्र मोदीही याच संस्कारात वाढले आहेत. मात्र, पंतप्रधानपद ही देशाचे नेतृत्व करण्याची व जबाबदारीची गंभीर बाब आहे. त्या पदावर असणाऱ्या व्यक्तीला देशातील सर्व जातीधर्माच्या व भाषा-प्रदेशांच्या लोकांना सोबत घेऊन चालावे लागते आणि त्यातला कोणताही वर्ग दुखावला जाणार नाही याची काळजीही घ्यावी लागते. ही जबाबदारी ज्यांच्यावर नाही, त्यांना उठवळपणे वागता येते व तशी ही माणसे वागता-बोलताना देशाने पाहिलीही आहेत. आपला धर्म सोडून इतर धर्माच्या लोकांना हरामजादे म्हणणारे मंत्री, मोदींना पाठिंबा न देणाऱ्यांनी देश सोडून चालते व्हावे असे म्हणणारे खासदार, आपल्या धर्माचा ग्रंथच तेवढा राष्ट्रीय ठरविला जावा, असे म्हणणाऱ्या ज्येष्ठ मंत्रीणबाई आणि साऱ्या देशाला आपलीच प्राचीन भाषा सक्तीने शिकवायला निघालेल्या दुसऱ्या एका मंत्रीणबार्इंचे अभिनेतेपण हा सारा मोदींच्या नेतृत्वाचा दुबळेपणा सांगणारा प्रकार आहे. असे बेताल बोलणारी माणसे मोदींच्या तंबीने शिस्तीत येतील, अशी अपेक्षा बाळगता येत नाही. मोदींची पाठ फिरल्यानंतर या माणसांनी त्यांना वाकुल्या दाखवल्या असतील तर त्याचेही आपण नवल वाटू देता कामा नये. (आदित्यनाथ या खासदारांनी त्या दाखविल्याही आहेत. उत्तर प्रदेशात चालविलेल्या धर्मांतराच्या उपद्रवाला सरकारने मदत करावी, अशी अफलातून विनंतीच त्यांनी जाहीररीत्या केली आहे) मोदींचा लोकसभेच्या निवडणुकीतील विजय हा त्यांच्या राजकीय नेतृत्वाचा व त्यांनी जनतेला दिलेल्या विकासाच्या आश्वासनांचा विजय नसून, संघाच्या हिंदुत्वाचा विजय आहे, असा गैरसमज करून घेतलेली ही माणसे आहेत आणि त्यांना कसेही करून आपल्याला असलेले संघाचे पाठबळ बळकट करायचे आहे. त्यांच्या वक्तव्यातून प्रगट होणारी एकारलेली धार्मिकता त्यांच्या या गरजेतून आली आहे. मात्र, संघाचे आताचे नेतृत्व पूर्वीएवढे स्वप्नाळू नाही आणि धार्मिकतेला असलेल्या मर्यादाही ते ओळखणारे आहेत. सुषमा स्वराज यांनी भगवद््गीतेला राष्ट्रीय ग्रंथाचा दर्जा दिला पाहिजे असे म्हटले. त्यावर संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीच ‘भगवद््गीता हा ग्रंथ सारेच वाचत नाहीत. ज्यांच्या घरी तो आहे तेही त्याकडे बघत नाहीत’ असे सांगून सुषमाबाईंच्या आग्रहातली सारी हवाच काढून घेतली आहे. भागवतांच्या या अभिप्रायातूनही या उठवळांनी शिकावे असे बरेच आहे. परंतु स्वत:ला महाराज किंवा महंत म्हणविणारी माणसे आपल्याला स्वयंभू समजत असतात. दुसऱ्या कोणी आपल्याला काही शिकवावे असे नाही, असा त्यांचा स्वत:विषयीचा समज असतो. त्यामुळे साक्षी महाराजापासून गिरीराज सिंगापर्यंत आणि स्मृती इराणीपासून निरंजन ज्योतीपर्यंतची माणसे त्यांचे अंगभूत बेबंदपण विसरतील, असे समजणे चुकीचे आहे. नरेंद्र मोदींनाही या माणसांना वठणीवर आणायचे असेल तर नुसती तोंडी तंबी देऊन चालणार नाही. त्यासाठी या माणसांविरुद्ध त्यांना कठोर पाऊलच उचलावे लागेल. तसे करणे हे त्यांच्या नेतृत्वासाठी वा पक्षासाठीच गरजेचे नसून देशासाठी आवश्यक आहे. भारत हा धर्मबहुल व भाषाबहुल देश आहे. त्याच्या भिन्न प्रदेशात भिन्न संस्कृतींचा वावर आहे. शिवाय या देशाची मूलभूत प्रकृती मध्यममार्गाची आहे. त्याची धार्मिक, जातीय, भाषिक वा प्रादेशिक ओढाताण करणारी माणसे या देशात दुही माजविणारी आहेत. त्यांना वठणीवर आणणे देशहितासाठी आवश्यक आहे.

Web Title: Who will hear this trick?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.