अशी कुणाकुणाची तोंडे दाबाल ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 12:39 AM2017-09-13T00:39:28+5:302017-09-13T00:39:28+5:30

रामचंद्र गुहा हे देशातील एक प्रभावी व सत्यशोधक पत्रकार आहेत. त्यांच्या निर्भिड लिखाणासाठी व धर्मनिरपेक्ष मांडणीसाठी ते प्रसिद्ध आहेत. कोणत्याही मोठ्या वृत्तपत्राशी न जुळता स्वतंत्रपणे पत्रकारिता करणारे आणि मोठी मान्यता मिळविणारे जे थोडे पत्रकार देशात आहेत त्यात गुहा एक आहेत.

 Who will say that? | अशी कुणाकुणाची तोंडे दाबाल ?

अशी कुणाकुणाची तोंडे दाबाल ?

Next

रामचंद्र गुहा हे देशातील एक प्रभावी व सत्यशोधक पत्रकार आहेत. त्यांच्या निर्भिड लिखाणासाठी व धर्मनिरपेक्ष मांडणीसाठी ते प्रसिद्ध आहेत. कोणत्याही मोठ्या वृत्तपत्राशी न जुळता स्वतंत्रपणे पत्रकारिता करणारे आणि मोठी मान्यता मिळविणारे जे थोडे पत्रकार देशात आहेत त्यात गुहा एक आहेत. गौरी लंकेश या पत्रकार महिलेच्या हत्येचा संबंध उजव्या विचारसरणीच्या व विशेषत: संघ परिवाराच्या विचारांशी जुळला असल्याचा त्यांचा आरोप त्यांना लाभलेल्या या मान्यतेमुळेच त्या परिवारात संतापाची लाट उसळविणारा ठरला आहे. गुहा यांच्या आधी हा आरोप देशातील अनेक वृत्तपत्रांनी, माध्यमांनी आणि नेत्यांनी केला. दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी या उदारमतवादी व सुधारणावादी लेखकांचे खून ज्या विचारसरणीने केले तिनेच गौरीचीही हत्या केली असे अनेकांनी म्हटले व त्यांचे तसे म्हणणे स्वाभाविकही होते. या माणसांना खुनाच्या धमक्या मिळत होत्या. त्यांची नोंद पोलिसात होत होती. त्यांच्याशी कुणाचे खासगी वैर नव्हते. समाजातील अंधश्रद्धा आणि तिला खतपाणी घालून त्यावर आपले राजकारण उभे करणारे उजवे पक्ष आणि त्यांचे परिवार हे होते. त्यामुळे दाभोलकरांच्या हत्येपासूनच साºया चौकशी यंत्रणांचे व समाजाचेही संशयपूर्ण लक्ष या उजव्या संघटनांकडे लागले होते. शिवाय या संघटनांना खुनाचा व रक्तरंजित राजकारणाचा इतिहास आहे आणि तो गांधीजींच्या खुनापासून सुरू होणारा आहे. ‘आपल्यातील काही संघटनांना रक्ताची चटक असल्याचे’ विधान खुद्द बलराज मधोक या जनसंघाच्या माजी अध्यक्षांनीच केले आहे. त्यामुळे या संघटनांकडे संशयाची सुई वळणे स्वाभाविक होते व तशीच ती वळलीही आहे. या चौकशीतून काही निष्पन्न करता येणे सरकारी यंत्रणांना आजवर जमले नाही, ही बाबही हा संशय वाढविणारी आहे. करणारे तेच आणि चौकशी करणारेही तेच असे असेल तर त्या प्रयत्नातून काही निष्पन्न होणारेही नसते. राज्य सरकार उजव्या विचाराचे, केंद्रही त्याच विचाराचे, आरोपाच्या संशयाची सुईही त्याच विचारावर, ही स्थिती सरकार, तपासयंत्रणा व प्रत्यक्ष आरोपी यांचे ‘वैचारिक’ संबंध अधोरेखित करणारी ठरते की नाही? की परवापर्यंत आम्ही एक होतो आणि त्या घटनेनंतर आम्ही विलग झालो अशी बतावणी त्यांच्यातील साºयांना करता येणार आहे. एका विचारसरणीची व श्रद्धेची माणसे समूहात काय ठरवितात वा कसे वागतात याचा नेमका अंदाज तपास यंत्रणांना कसा बांधता येणार? त्यातून या तपास यंत्रणाही याच समूहांशी जुळल्या असतील तर त्यांना त्याकडे पाहणेही जमणार नाही. अशा संस्थांबाबतचा अंदाज जसा वैचारिक जवळिकीवर बांधला असतो तसा पत्रकारांचा अंदाजही अदमासांवरच बेतला असतो. त्यांच्याजवळ पोलिसांना व तपास यंत्रणांना उपलब्ध असलेली साधने नसतात. ते कोणाला चौकशीसाठी बोलवू शकत नाहीत आणि कोणाचा कबुलीजबाबही त्यांना सक्तीने घेता येत नाही. त्यांना त्यांची बुद्धी, प्रतिभा व आकलन यांच्या आधारेच आपल्या निष्कर्षांवर येणे भाग असते. रामचंद्र गुहांचा अनुभव मोठा आहे. मात्र त्यांनी केलेल्या आरोपाआधी त्याचा उच्चार देशभरातील सगळ््या प्रमुख वृत्तपत्रांनी, माध्यमांनी व नेत्यांनीही केला आहे. झालेच तर आता साºया जगातील वृत्तपत्रांनी गौरीची हत्या आणि तिचा उजव्या विचारांशी असलेला संबंध याविषयी लिहून टाकले आहे. यातल्या कोणालाही उत्तर देण्याचा वा त्यांची तोंडे बंद करण्याचा प्रयत्न न करणाºया संघ परिवाराने एकट्या रामचंद्र गुहांना वेठीला धरावे याचा अर्थही उघड आहे. ते एकटे आहेत आणि त्यांना वेगवेगळ््या कोर्टात खेचून त्रास देणे या परिवाराला शक्य आहे. जी गोष्ट उघड असते, जिची सत्यता साºयांना पटली असते आणि जिचे धागेदोरे सरकारपासून संशयितांपर्यंत कसे पोहचले असतात हे साºयांना कळत असते त्याविषयी बोलणे हा अपराध कसा होतो? आणि एखाद्या संघटनेने तो तसा ठरविण्याचा अट्टहास धरलाच तर तसे बोलणाºयाला ती प्रसंगी कोर्टात खेचू शकेल व एखादेवेळी तिला छोटीशी शिक्षाही करू शकेल. मात्र जनतेच्या मनात असलेला संशय त्यामुळे दूर होणार नाही. उलट त्याचे रूपांतर खात्रीत होईल. दाभोलकर ते गौरी यांच्या हत्याकांडांनंतर गावोगावी निघालेले लोकांचे मोर्चे त्यांची हीच मानसिकता दाखविणारे होते. खून करणारी माणसे तुमच्याच घरात दडली असतील तर तुम्ही त्यांना पकडणार कसे आणि ते तुम्हाला सापडतील कसे, हा प्रश्न याआधी किती डझनवेळा विचारला गेला. त्याला मख्ख शांततेने उत्तर देण्याखेरीज सरकारला व संघ परिवाराला काही करताही आले नाही. रामचंद्र गुहांवर दाखल करण्यात आलेला खटला ही एक धमकी आहे. ती याआधी राहुल गांधींनाही दिली गेली आहे. मात्र आता अशा धमक्यांना कोणी भीक घालीत नाही. खरेतर या धमक्या खुनी माणसांचेच मानसिक बळ अधिक वाढवीत असतात. आपल्या शस्त्रामागे एक विचारसरणी उभी आहे आणि ती सक्रिय आहे याची त्यांना होणारी जाणीव मोठी असते. शिवाय ती सरकारने स्वीकारली असेल तर मग आपल्याला कोणी हात लावणार नाही हाही विश्वास त्यांना वाटत असतो. त्यामुळे राहुल गांधींनी जशी माफी मागितली नाही तशी गुहाही ती मागणार नाहीत हे उघड आहे.

Web Title:  Who will say that?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत