पुढाकार कोण घेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 05:24 PM2018-10-25T17:24:30+5:302018-10-25T17:25:13+5:30

मिलिंद कुलकर्णी जळगावमध्ये परवा हृदयद्रावक घटना घडली. रात्रीच्या भोजनानंतर शतपावली करायला निघालेल्या वृध्द दाम्पत्यापैकी सविता बिर्ला या महिलेला भरधाव ...

Who will take the initiative? | पुढाकार कोण घेणार?

पुढाकार कोण घेणार?

Next

मिलिंद कुलकर्णी
जळगावमध्ये परवा हृदयद्रावक घटना घडली. रात्रीच्या भोजनानंतर शतपावली करायला निघालेल्या वृध्द दाम्पत्यापैकी सविता बिर्ला या महिलेला भरधाव दुचाकीस्वाराने धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. पाच तासांच्या झुंजीनंतर त्यांचे निधन झाले. दुचाकीस्वारदेखील जखमी झाला. घटनास्थळी मदतीला धावलेल्या लोकांच्या सांगण्यानुसार दुचाकीस्वार मद्यप्राशन केलेला होता. त्यामुळे वृध्द महिलेला धडक दिल्यानंतर त्याची दुचाकी दुभाजकावर आदळली आणि दोन-तीन वेळा उलटली. मद्य आणि वेगाच्या नशेने एक जीव घेतला, दुचाकीस्वारालाही जायबंदी केले. अशा घटना अधून मधून घडतात. तेवढ्यापुरता हळहळ व्यक्त होते. पीडित कुटुंबाला आयुष्यभराची वेदना अकारण दिली जाते. काही काळानंतर सगळे विसरले जाते.
जळगावच काय बहुसंख्य मोठ्या शहरांमध्ये तरुणाईकडून वेगाने वाहने चालविण्याची स्पर्धा हमखास सुरु असते. रात्री उशीरा गुळगुळीत रस्त्यांवर दुचाकींच्या ‘फायरींग’चा मोठा आवाज करीत ही स्पर्धा चालते. रस्ता आपल्यासाठीही आहे, असा समज असलेला सामान्य माणूस शतपावली करायला बाहेर पडलेला असतो. वाहन नसल्याने पायी चालणारे अनेक नागरीक रस्त्यावर नियमितपणे जात असतात. ही माणसे या दुचाकीस्वार तरुणांच्या मते अनावश्यक गतिरोधकांसारखी असतात. भटक्या कुत्र्यांना जसे कोणीही छेडतो, दगड मारतो, त्या भावनेतून या पादचाऱ्यांना घाबरवणे, धक्का देणे, उडवणे असे प्रकार निर्ढावलेल्या मनाने केले जातात. ‘एकटा-दुकटा’ असलेला सामान्य माणूस या दहा-पंधरा मस्तवाल दुचाकीस्वारांना कसा रोखणार? त्याची क्षीण शक्ती या तरुणांपुढे कशी टिकाव धरणार? अपघात झाल्यानंतर मदतीला धावणाºया जमावाकडून अशा भरधाव वेगाच्या दुचाकीस्वारांना अडविण्याचे, गांधीगिरी करुन हातात हात घेऊन रस्ता अडवून सत्याग्रह करण्याचे पाऊल का उचलले जात नाही? कुणीच का पुढाकार घेत नाही?
भौतिक जगात आम्ही आत्ममग्न आणि स्वार्थी झालो आहोत. ‘मला काय त्याचे’ अशी बेपर्वा वृत्ती आमच्या भिनली आहे. परपीडा आमच्या हृदयापर्यंत पोहोचत नाही. मात्र हीच वेळ स्वत:वर आल्यास मात्र कुणीतरी मदतीला यावे, कुणीतरी या प्रवृत्तींविरुध्द संघर्ष करायला हवा, असे वाटायला लागते. कुणी सोबत आले नाही, तर उद्विग्नता, हतबलता येते. सगळ्या समाज, व्यवस्थेविरुध्द चीड येते. असे का होते? शिवाजीमहाराज, भगतसिंग जन्माला यायलाच हवे, पण शेजारच्याच्या घरात, असे जे म्हटले जाते, ही भावना खरे म्हणजे समस्येचे मूळ आहे.
कथा, कादंबरी, मालिका, नाटक, चित्रपटात व्यवस्थेविरुध्द संघर्ष करणारे पात्र आम्हाला खूप भावते. अँग्री यंग मॅनपासून तर एक दिवसाच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत असे काल्पनिक पात्र प्रत्यक्षात का येत नाही, असेही आम्हाला वाटत असते. पण प्रत्यक्ष कृतीची वेळ येते तेव्हा आम्ही मागे हटतो. जबाबदारी, कर्तव्यापासून पळतो. त्यासाठी लंगड्या सबबी सांगतो.
छोट्या छोट्या गोष्टींपासून याची सुरुवात होते. वैयक्तीक आणि सार्वजनिक ठिकाणी वर्तनाचे आमचे नियम वेगळे असतात. घर आमचे टापटीप ठेवतो, पण कामाच्या ठिकाणी तसे नसते. स्वत:चे वाहन धुवून, पुसून लखलखीत ठेवतो, पण बस, रेल्वेत पिचकाºया मारतो. कुणी असे करत असेल तर त्याला रोखण्याचे कामदेखील आम्ही करत नाही. ‘नागरीकशास्त्र’ आम्ही केवळ शालेय जीवनापुरती मर्यादीत केलेले असल्याने नागरिकांची कर्तव्ये आणि जबाबदाºयांचे भान आम्हाला राहिलेले नाही. आणि सगळ्यात आवडता उद्योग म्हणजे, जे सगळे वाईट, अव्यवस्थित घडत आहे, त्याला कुणीतरी दुसरा जबाबदार आहे. मग ही दुसरी व्यक्ती कुणीही असू शकते. सरकार, सत्ताधारी पक्ष, परगाव, परप्रांतीय, परधर्मीय,परदेशी असा कोणतातरी ‘बागुलबुवा’ उभा करुन त्याच्या माथी या सगळ्यांचे खापर फोडतो. हे योग्य आहे काय, याचा विचार नको करायला. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी आम्ही जागृत व्हायला नको का ?

Web Title: Who will take the initiative?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.