जाणत्या राजास कोण सांगणार?

By Admin | Published: September 2, 2016 02:49 AM2016-09-02T02:49:02+5:302016-09-02T02:49:02+5:30

भविष्याचा वेध घेणारी विकासाची दृष्टी आणि शाहू-फुले-आंबेडकर तत्त्वांशी घट्ट नाळ जपणाऱ्या ‘जाणत्या राजास’ बदलत्या समाजमनाची भावना कोण आणि कशी सांगणार?

Who will tell the sensible King? | जाणत्या राजास कोण सांगणार?

जाणत्या राजास कोण सांगणार?

googlenewsNext

- राजा माने

भविष्याचा वेध घेणारी विकासाची दृष्टी आणि शाहू-फुले-आंबेडकर तत्त्वांशी घट्ट नाळ जपणाऱ्या ‘जाणत्या राजास’
बदलत्या समाजमनाची भावना कोण आणि कशी सांगणार?

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील बलात्कार प्रकरणाच्या निमित्ताने एरवी राजकारण्यांच्या लेखी सदैव ‘झोपलेला’ असलेला मराठा समाज खडबडून जागा झाला आहे. त्याला आलेली ही जाग कुठल्याही जातीपंथाच्या विरोधातील नाही, हे त्याचे एक वैशिष्ट्य मानावे लागेल. राज्यात आतापर्यंत निघालेल्या मोर्चांना शिस्त होती, शांतता होती आणि हे मोर्चे यशस्वी करण्यासाठी इतर समाजही मदत करताना दिसले. खुद्द सोलापुरातही आता असा मोर्चा आयोजित करण्याचा निर्णय झाला असून येत्या एकवीस तारखेस तो निघणार आहे.
या मोर्च्यांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी दलितांवरील अत्त्याचार प्रतिबंधक (अ‍ॅट्रॉसिटी) कायद्याच्या संदर्भात केलेले वक्तव्य वादग्रस्त ठरले आणि त्यांनी नंतर केलेल्या सारवासारवीने ते अधिकच चर्चेचा विषय ठरले. ते स्वत:ही ‘मी सहज बोलत नसतो’ असे नेहमी सांगत आले आहेत. त्यामुळे त्यांच्या सारवासारवीला तसा अर्थ उरत नाही.
‘महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे ‘मानसपुत्र’ असलेल्या शरद पवारांनी ‘मासबेस’ काय असतो हे देशाला अनेकदा दाखवून दिले आहे. पुरोगामी विचार आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी दिल्ली दरबारच काय पण जगाशी भिडण्याची हिंमत असणारा हा नेता! सर्व जाती-धर्मांना, सर्व विधायक विचारप्रवाहांना सोबत घेऊन शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांशी इमान राखण्यासाठी धडपडणारा डॅशिंग नेता अशी आपली प्रतिमा निर्माण करण्यातही पवारांनी यश मिळविले. त्यांच्या राजकीय वाटचालीत त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांना समतावाद आणि पुरोगामित्वाचा आधार असायचा.
रामदास आठवलेंसारख्या आंबेडकरी चळवळीतील तरुणास राज्याचा कॅबिनेट मंत्री करणे असो वा माळी समाजाच्या छगन भुजबळांना उपमुख्यमंत्री पदावर बसविणे असो, प्रत्येक वळणावर त्यांनी ‘सोशल इंजिनिअरिंग’ करीत आपली समतावादी प्रतिमा जतन केली. मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तारापासून अगदी महिला आरक्षणापर्यंतच्या त्यांच्या प्रत्येक पावलाचे एकमुखी कौतुक झाले. हे करीत असताना त्यांनी स्वत:च्या मराठा जातीचा फारसा विचार कधी केल्याचे दिसले नाही. पण क्वचित त्यांनी मराठा समाजाचा विचार केला तेव्हां दुर्दैवाने तो नात्या-गोत्यांच्या पलीकडे मात्र पोहोचलाच नाही! मग लाल दिव्यांच्या गाड्या असोत अथवा इतर राजकीय लाभ असोत, त्याची पोहोच मर्यादितच राहिली.
मराठा जातीचे मूठभर नेते, मराठा कंत्राटदारांची झुंड आणि राजकीय लाभासाठी प्रतीक्षा रांगेत आयुष्य घालविणारे जातीने मराठा असलेले पुढारी म्हणजेच तमाम मराठा समाज आहे का? मोलमजुरी करणारी, पिढ्या न् पिढ्या शेतमजूर म्हणून जगणारी, न परवडणारी शेती करत मुला-मुलींच्या लग्नांसारख्या प्रत्येक कर्तव्यपूर्तीसाठी जमिनीचे तुकडे विकत विकत भिकेला लागलेली मराठा कुटुंबे, दारिद्र्यरेषेखाली जगणारा मराठा समाज तथाकथित मराठा पुढाऱ्यांना माहीत तरी आहे का? राज्याच्या विविध जिल्ह्यांत ‘मराठा क्रांती’चे मोठमोठे मोर्चे निघू लागल्याने उपरोक्त प्रश्न नव्याने जिवंत झाले आहेत. आजवर मराठा नेत्यांनी मराठा समाजाला ‘गृहीत’ धरून राजकारण केले. त्यासाठी त्यांनी त्यांच्या सोयीचे राजकीय पक्षही निवडले. त्या त्या पक्षांची भूमिका गृहीत धरलेल्या आपल्या समाजावर लादली. मराठा समाजाचे पुढारी आणि मराठा समाज यांच्यात जणू ‘प्रासंगिक’ कराराचे नाते राहायचे. ज्यांची सत्ता आहे त्यांनी कानावर हात ठेवायचे व जे सत्तेबाहेर आहेत त्यांनी मराठा आरक्षणाचे तोंडदेखले समर्थन करायचे, असा प्रकार नेहमीच चालायचा. जो सर्वसामान्य मराठा समाजाच्या अंगवळणी पडला होता.
पण पवारांच्या उद्गारांमुळे निर्माण झालेल्या वादातून मराठा समाजाचे प्रश्न मराठा नेत्यांनी सहज घेऊ नयेत, असा सूर उमटू लागला आहे. विविध पक्षात असलेले प्रस्थापित मराठा नेते अभ्यासू, मुरब्बी आणि कायदा जाणणारे आहेत. त्यामुळे त्यांच्यासह पवारांनीही इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावणारे व कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मराठा समाजाला मिळवून द्यावे पण जाणत्या राजाला हे कोण आणि कसे सांगणार?

 

Web Title: Who will tell the sensible King?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.