‘तस्करी’च्या उंटांना शेपूट कोणी लावायची?

By संजय पाठक | Published: May 20, 2023 09:12 AM2023-05-20T09:12:17+5:302023-05-20T09:13:08+5:30

नाशिकमध्ये अचानक दीडशे उंट का, कशामुळे आले, याचा उलगडा अजूनही ना पोलिसांना झाला आहे, ना प्रशासनाला! प्रत्येक जण दुसऱ्याकडे बोट दाखवत आहे!

Who would put the tail on the trafficking camels | ‘तस्करी’च्या उंटांना शेपूट कोणी लावायची?

‘तस्करी’च्या उंटांना शेपूट कोणी लावायची?

googlenewsNext

संजय पाठक - वृत्तसंपादक, लोकमत, नाशिक

‘एक हत्ती आणि सात आंधळे’ ही  गोष्ट सर्वांनाच माहीत असेल. आता या गोष्टीत हत्तीच्या जागी उंट आला आहे इतकेच! नाशिक जिल्ह्यात अचानक आलेले तब्बल १५४ उंट पंधरा दिवसांपासून चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यापैकी १११ उंटांनी नाशिकच्या पांजरापोळ संस्थेत पाहुणचार घेतला तर ४३ उंट मालेगाव येथे गोशाळेत आहेत. 

तेथून त्यांना शुभास्ते पंथान: करण्याची जबाबदारी एका प्राणीमित्र संस्थेकडे सोपवण्यात आली. यासाठी ‘रायका’ म्हणजेच पशुपालक जमातीच्या लोकांना बोलावण्यात आले. पोलिस बंदोबंस्तात या उंटांची रवानगी आता राजस्थानात मरूभूमीकडे करण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात थकल्या-भागल्या आणि येथील वातावरण न मानवलेल्या १३ उंटांचा मात्र मृत्यू झाला आहे.

हे उंट येथे कसे आले, याचा उलगडा जिल्हा प्रशासनासह पोलिसांनाही झालेला नाही. जिल्हा प्रशासनाने तपासाचे काम आमचे नाही, असे सांगून पोलिसांकडे बाेट दाखवले तर पोलिसांकडेही याचे ठोस उत्तर नाही. मे महिन्याच्या प्रारंभी जिल्ह्यात अचानक उंटांचे कळप दिसू लागल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. राजस्थानसारख्या ठिकाणाहून खडतर प्रवास करत आलेल्या उंटांची अवस्था बिकट होती. राजस्थानमधील हे उंट नाशिकमध्ये एकाएकी घुसले नाहीत तर मध्य प्रदेश आणि गुजरातमधून ते जिल्ह्यात आले. 

विशेष म्हणजे प्राणीमित्रांच्या आग्रहावरून दिंडोरी आणि मालेगावी उंटांची हेळसांड आणि क्रूर वागणूकप्रकरणी गुन्हा दाखल झाला खरा; परंतु तो अत्यंत साध्या स्वरूपाचा! सटाणा पोलिसांनी हे सर्व उंटवाहक मदारी आणि उंट नाशिक जिल्ह्यातीलच आहेत, चारापाण्यासाठी नाशिकहून ते गुजरातला कच्छच्या रणामध्ये (उलट) गेल्याचा जावईशोध लावला. मदारी हे कठपुतली आहेत, त्यांचे खरे सूत्रधार कोण, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. 

उंट हा प्राणी मुख्यत: सवारी आणि मालवाहतुकीसाठी वापरला जात असला तरी अभक्ष्य भक्षणासाठीही त्याचा वापर होतो. त्यामुळे कत्तलही मोठ्या प्रमाणात होते. नाशिकच्या उंट प्रकरणाला धार्मिक जोड दिली जाऊ लागल्याने आणि हे उंट मालेगाव तसेच हैदराबादमध्ये कत्तलीसाठीच जात असल्याची चर्चा होऊ लागली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची दखल घेऊन हे उंट ताब्यात घेत पुन्हा राजस्थानकडे परत पाठवण्याची जबाबदारी महावीर कॅमल सेंच्युरी व धरमपूरच्या श्रीमद राजचंद्र मिशन या संस्थांना दिली. 

मुळात हा मुद्दा राजस्थानशी संंबंधीत आहे. उंट हा राजस्थानचा राज्य प्राणी आहे. त्यामुळेच त्याला महत्त्व असले तरी गेल्या काही वर्षात उंटांची तस्करी हा चिंतेचा विषय ठरला आहे. उंटांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने राजस्थान सरकाराने उष्ट्र संरक्षण (उंट संवर्धन) कायदा केला असून विक्री-कत्तलीला बंदी घातली आहे. उंट संवर्धनासाठी उंट पालकांना प्रत्येक उंटामागे पाच हजार रुपये दिले जातात. मात्र, तेथील सरकारच्या कायद्यामुळे तो विकता येत नसल्याने त्याचा विपरीत परिणाम झाला.

उंटांची तस्करी वाढल्याने उंटांच्या संख्येत जागतिक क्रमवारीत भारताचा असलेला पाचवा क्रमांक आता नऊवर घसरला आहे. विशेष म्हणजे ही तस्करी हैदराबादकडे होत असल्याने यापूर्वी अनेक सामाजिक संस्थांच्या प्रयत्नांमुळे हैदराबादमध्ये कत्तलीसाठी गेलेले उंट पुन्हा राजस्थानात आणण्यात आले आहेत. नाशिकमधील या प्रकरणामुळे अनेक प्रश्नही उपस्थित झाले आहेत. अन्य राज्यातील प्राणी कशासाठी येतात, याची किमान नोंद कोणत्या ना कोणत्या ठिकाणी असायला हवी, वन्य जीव किंवा अन्य अधिसूचीत किंवा संवर्धीत पाळीव प्राणी याबाबत तर त्यांची नोंदणी आणि माहिती असायला हवी. राजस्थानमधून उंट निघून जातात आणि अन्य दोन राज्यातून ते महाराष्ट्रात नाशिकला दाखल होतात, तरीही या सर्व राज्यांत कोणताही समन्वय नाही, हे आश्चर्यजनक आहे. या प्रकरणाला केवळ प्राणीमित्रांच्या मदतीमुळे विधायक वळण मिळाले. उंट आता निघून गेले असले तरी यापुढे काळजी घेतली जाईल, हीच अपेक्षा.

Web Title: Who would put the tail on the trafficking camels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.