ख्राइस्टचर्च हत्याकांडाचे सर्वदूर पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 02:10 AM2019-03-30T02:10:24+5:302019-03-30T02:11:12+5:30

ब्रेंटनने हा हल्ला आपल्या हेल्मेटला लावलेल्या कॅमेऱ्यातून चित्रित केला आणि तो स्वत:च्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजवरून थेट प्रक्षेपित केला. वर्णवर्चस्ववादी लोकांनी हे चित्रीकरण यु-ट्यूब, टिष्ट्वटर सारख्या माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणावर शेअर केले.

 The whole mass of Christchurch massacre | ख्राइस्टचर्च हत्याकांडाचे सर्वदूर पडसाद

ख्राइस्टचर्च हत्याकांडाचे सर्वदूर पडसाद

Next

- अनय जोगळेकर
(आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक)

१५ मार्च २0१९ रोजी न्यूझीलंडमधील ख्राइस्टचर्च येथील हत्याकांडाचे पडसाद दोन आठवड्यांनंतरही उमटत आहेत. ब्रेंटन हॅरिसन टॅरंट या २८ वर्षीय आॅस्ट्रेलियन श्वेत वर्णवर्चस्ववादी तरुणाने बेधुंद गोळीबार करून अल नूर मशीद आणि लिनवूड मशिदीत शुक्र वारच्या नमाजासाठी जमलेल्या ५0 लोकांना ठार मारले आणि सुमारे तेवढ्याच लोकांना जखमी केले. या हल्ल्यात किमान ७ भारतीय वंशाचे लोक मारले गेले. ब्रेंटनने हा हल्ला आपल्या हेल्मेटला लावलेल्या कॅमेऱ्यातून चित्रित केला आणि तो स्वत:च्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजवरून थेट प्रक्षेपित केला. वर्णवर्चस्ववादी लोकांनी हे चित्रीकरण यु-ट्यूब, टिष्ट्वटर सारख्या माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणावर शेअर केले.
२0११ साली नॉर्वेमध्ये अशाच प्रकारचा हल्ला करून ७७ लोकांना ठार मारणाऱ्या आंद्रेस ब्रैव्हिकला आपला आदर्श मानणाºया ब्रेंटनने या हत्याकांडापूर्वी ७४ पानी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. त्याला ब्रैव्हिकप्रमाणेच स्वत:च्या बाह्य व्यक्तित्वाच्या प्रेमात पडण्याचा (नारिससिझम) आजार जडला आहे का, याचा तपास यंत्रणा शोध घेत आहेत. ब्रेंटनच्या नावावर कुठल्याही देशात एकही गुन्हा नसून तो व्यायामशाळेत प्रशिक्षक म्हणून काम करत होता. गेल्या काही वर्षांत त्याने तुर्कीला भेटी दिल्या असून बल्गेरिया, हंगेरी, रोमेनिया या युरोपीय देशांसह पाकिस्तान आणि पाकव्याप्त गिलगिट, बाल्टीस्तानलाही भेट दिली होती. त्याचे ब्रेन-वॉशिंग कोणी केले हे अजून स्पष्ट व्हायचे आहे.
हत्याकांडानंतर त्याचा व्हिडीओ सुमारे तासभर फेसबुकवर दिसत होता आणि तेथून तो काढल्यानंतरही तो वेगवेगळ्या पेजवर झळकत होता. त्यामुळे अशा प्रकारच्या विकृती पसरवण्यात समाज माध्यमांची, खासकरून फेसबुकची भूमिका हा विषय ऐरणीवर आला आहे. २७ मार्च रोजी फेसबुकने आपल्या धोरणात बदल करत भविष्यात श्वेत राष्ट्रवादी तसेच वर्णवर्चस्ववादी मजकूर प्रसिद्ध करण्यावर बंदी घातली. जर कोणी अशा प्रकारच्या मजकुराचा शोध घेतला तर त्यांना ‘लाइफ आफ्टर हेट’ या जनजागृती करणाºया पानावर नेण्यात येईल. यापूर्वी फेसबुकने वर्णवर्चस्ववादी मजकुरावर बंदी घातली असली तरी श्वेत-राष्ट्रवाद आणि वर्णाधारित विभाजनाबद्दल मजकूर विचार स्वातंत्र्याच्या भूमिकेतून स्वीकारला जात होता. श्वेत वर्णवर्चस्ववादाच्या पलीकडे जाऊन वेगवेगळ्या देशांत धर्म, भाषा, प्रांत आणि जातीवर आधारित द्वेष प्रसारित करण्यावर नियंत्रण आणण्यास समाजमाध्यमे सक्षम आहेत का, याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत.
४४ लाख लोकसंख्येचा न्यूझीलंड हा जगातील सर्वाधिक शांतताप्रिय देशांपैकी एक असला तरी तेथील सुमारे १२ लाख लोकांकडे परवान्यासह बंदुका आहेत. एवढ्या बंदुका असूनही दरवर्षी तेथे बोटावर मोजण्याइतक्या गोळीबाराच्या घटना घडतात. या घटनेमुळे न्यूझीलंड हादरले असून समाजात सहज उपलब्ध असणाºया कायदेशीर शस्त्रांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पंतप्रधान जेसिंडा आर्डेन यांनी भविष्यात न्यूझीलंडमध्ये बंदुका बाळगण्याबाबत नियम अधिक कडक करणार असल्याचे घोषित केले असले तरी वर्णवर्चस्ववादातून झालेल्या हल्ल्याला त्यांनी इस्लामोफोबिया किंवा इस्लामच्या भीतीशी जोडण्याची चूक केली. शोक व्यक्त करण्यासाठी तसेच न्यूझीलंडच्या सेक्युलर मूल्यांचे प्रदर्शन करण्यासाठी त्यांनी संसदेत एका मौलवीकडून कुराणातील आयता म्हणवून घेतल्या. संसदेतील आपल्या भाषणाची सुरुवात अस्सलाम वालेकुमने केली. त्या स्वत: हिजाब घालून फिरल्या. त्याला प्रतिसाद म्हणून न्यूझीलंडमधील महिला मोठ्या संख्यने हिजाब घालून रस्त्यावर उतरल्या. पण या घटनांमुळे नवीन वाद निर्माण झाले. हिजाबला इस्लामशी जोडणे म्हणजे त्याला साचेबंद करण्यासारखे आहे. जगभर अनेक मुस्लीम महिला स्वत:च्या मर्जीने हिजाब वापरत असल्या तरी अनेकदा त्याची सक्तीही केली जाते. रूढीवादाला विरोध करून, हिजाब न वापरणाºया महिलांना, अशा कृतींतून कमी लेखले जाते, अशी टीका त्यांच्यावर झाली. अशा प्रकारे प्रदर्शन करून सर्वधर्मसमभावाचा संदेश जाण्याऐवजी मूलतत्त्ववादी शक्तींना बळ मिळेल, अशी भीती व्यक्त केली गेली.
या हल्ल्यानंतर इसिसचा प्रवक्ता अबू हसन अल मुहाजिर याने हल्ल्याचा बदला घेण्याचे आवाहन धर्मबांधवांना केले. १८ मार्च रोजी नेदरलँडच्या युट्रेक्ट शहरात स्थायिक झालेल्या गोकमन टॅनिस या ३७ वर्षीय युवकाने सकाळी साडेदहाच्या सुमारास ट्रामवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यात तीन माणसे मारली गेली आणि पाच जखमी झाली. अशा हल्ल्यांचे लोण युरोप आणि अमेरिकेत पसरू शकते. ख्राइस्टचर्च हल्ल्याचे निमित्त करून बालाकोट येथील सर्जिकल स्ट्राइकचा बदला घेण्यासाठी पाकिस्तान भारतातील, खासकरून पश्चिम उत्तर प्रदेशात स्लीपर सेल कार्यरत करत असल्याचा इशारा गुप्तचर संस्थांनी दिला आहे. दिल्ली आणि मुंबई येथे इसिस आणि अल-कायदाकडून दहशतवादी हल्ले केले जाऊ शकतात. सध्याच्या निवडणुकांच्या हंगामात अशा हल्ल्यांचे मोठ्या प्रमाणावर पडसाद उमटतील. ते सरकार, गुप्तहेर संस्था, समाजमाध्यम कंपन्या, मोबाइल सेवा पुरवणाºया कंपन्या आणि सुरक्षा यंत्रणांना एकत्र काम करावे लागेल.

Web Title:  The whole mass of Christchurch massacre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.