मध्य पूर्वेतील भडक्याने संपूर्ण जग होरपळेल
By विजय दर्डा | Published: January 6, 2020 06:42 AM2020-01-06T06:42:11+5:302020-01-06T06:42:44+5:30
अमेरिकेच्या दृष्टीने विचार केला तर त्यांनी सुमारे ५०० अमेरिकी सैनिकांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या व्यक्तीचा काटा काढला आहे.
- विजय दर्डा
अमेरिकेच्या दृष्टीने विचार केला तर त्यांनी सुमारे ५०० अमेरिकी सैनिकांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या व्यक्तीचा काटा काढला आहे. इराणच्या दृष्टीने ज्याच्या नावाने शत्रू थरथर कापत असे असा एक बहाद्दर जनरल त्यांनी गमावला आहे... आणि जगाच्या दृष्टीने पाहिले तर ज्यात बरेच काही जळून खाक होऊ शकते अशी आग लावणारी ही घटना आहे. इराण ही घटना सहजपणे पचवू शकणार नाही, हे नक्कीच. म्हणूनच इराणने अमेरिकेचा सूड उगविण्याची धमकी दिली आहे!
इराणच्या रेव्होल्युशनरी गार्ड्स या सैन्यदलांमध्ये प्रतिष्ठित ‘कुद््स फोर्स’ या प्रतिष्ठित विशेष विभागाचे प्रमुख मेजर जनरल कासिम सुलेमानी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनाई यांच्या थेट आदेशावरून काम करायचे आणि इराणमध्ये ते खमेनाई यांच्यानंतरचे सर्वात शक्तिशाली मानले जायचे. म्हणून सुलेमानी यांच्या मृत्यूनंतर इराणने त्यांना ‘अमर शहिदा’चा दर्जा देऊन तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. त्याचबरोबर अमेरिकेने सुलेमानी यांच्या हत्येची किंमत मोजायला तयार राहावे, असा इशाराही इराणने दिला. जगात इराणचे प्रभुत्व वाढविण्यात सुलेमानी यांची भूमिका महत्त्वाची राहिली होती. सीरिया, येमेन व इराकमध्ये त्यांचा मोठा दबदबा होता. ‘इस्लामिक स्टेट’ला नामोहरम करण्यासाठी सुलेमानी यांनी इराक आणि सीरियामध्ये कुर्द सशस्त्र दले व शिया बंडखोरांची एकजूट केली आणि त्यांना प्रशिक्षणही दिले.
देशभर उठाव होऊनही सीरियाच्या बशर अल असद सरकारला पाय घट्ट रोवून खुर्चीवर कायम राहण्यातही त्यांनी महत्त्वाची कामगिरी केली. हिजबुल्लाह व हमास यासारख्या शिया बंडखोरांच्या सशस्त्र संघटनांनाही त्यांनीच बळकटी दिली होती. अमेरिकेसारख्या महासत्तेपुढे इराण पूर्ण ताकदीनिशी ताठपणे उभे राहू शकले तेही बव्हंशी सुलेमानी यांच्यामुळेच. अमेरिकेचे नुकसान करण्याच्या प्रत्येक रणनीतीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. म्हणूनच सुलेमानी अमेरिकेचे कट्टर शत्रू बनले व त्यांचा काटा काढण्याचे प्रयत्न अमेरिका निरंतर करत राहिली. सुलेमानी यांच्या नेतृत्वाखालील ‘कुद््स फोर्स’ला अमेरिकेने २५ आॅक्टोबर २००७ रोजीच दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले होते. त्यानंतर अमेरिकेने इराणवर कठोर निर्बंध लागू केले. मात्र हे निर्बंध निष्प्रभ करण्यातही सुलेमानी यांनी हरतºहेचे उपाय केले, असे मानले जाते. यामुळे अमेरिकेची तळपायाची आग मस्तकात गेली होती. दुसरीकडे काहीही करून सुलेमानी यांचा बंदोबस्त करण्यासाठी इस्रायल व सौदी अरबस्तानकडून अमेरिकेवर वाढता दबाव येत होता. सुलेमानी यांच्या मृत्यूनंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचा राष्ट्रध्वज टिष्ट्वट केला यावरूनच सुलेमानींचे या जगात न राहणे अमेरिकेसाठी किती बहुमोल होते याची कल्पना यावी.
आता पुढे काय होईल, हा मोठा प्रश्न आहे. काहीही करून इराण सुलेमानी यांच्या हत्येचा सूड उगवणार हे नक्की. त्यासाठी इराणकडून अमेरिका, सौदी अरबस्तान व इस्रायलच्या आस्थापनांवर हल्ले होणार हेही स्पष्ट आहे. अजूनही इराकमध्ये अमेरिकेचे पाच हजारांचे सैन्य तैनात आहे. प्रतिहल्ल्याची पूर्ण कल्पना असल्याने आपल्या सैनिकी तळांची सुरक्षा आधीच मजबूत केली आहे. इराणकडून काही आक्रमक आगळीक होताना दिसली तर अमेरिका आणखी सैन्य आणू शकेल. शिवाय संभाव्य धोके टाळण्यासाठी अमेरिका हवाई हल्लेही करू शकेल. तसे झाले तर इराण उघडपणे युद्धात उतरेल, कारण त्यात रशिया पाठीशी उभी राहील, याची इराणला खात्री आहे. सुलेमानी यांच्या मृत्यूला ‘हत्या’ म्हणून रशियाने तिची निंदा केली आहे. चीनही इराणच्या बाजूने असल्याचे दिसत असले तरी चीन कदाचित रशियाप्रमाणे या रणांगणात उघडपणे उतरणार नाही.
खरोखर युद्ध किवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर त्याचा खनिज तेलाच्या किमतींवर थेट परिणाम होईल हे निश्चित. तसे संकेत मिळालेही आहेत. सुलेमानी यांच्या मृत्यूनंतर जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती चार टक्क्यांनी वाढल्या आहेत. आपल्या अखत्यारीतील सागरी मार्गांनी जाणाऱ्या तेलवाहू जहाजांवर इराणने हल्ले केले तर तेलाच्या बाजारपेठेत आगडोंब उसळणे स्वाभाविक आहे. तसे झाले तर संपूर्ण जगाला त्याची झळ लागेल. खासकरून भारतावर त्याचा प्रतिकूल परिणाम होईल. आधीच नाजूक परिस्थिती असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर तेलाच्या चढ्या किमतींचा नवा बोजा पडला तर विकासदराला आणखी घसरण लागेल. आपल्या परिसरातील देशांची अवस्थाही याहून वेगळी नसेल. जगातील अनेक देश या भडक्याने होरपळून निघतील. म्हणून मध्य पूर्वेच्या या देशांमध्ये शांतता नांदणे गरजेचे आहे. पण तसे होण्याची लक्षणे दिसत नाहीत. मध्य पूर्व आशिया हा जगाचा असा शापित भाग आहे की जेथे तेलाच्या रूपाने अमाप संपत्ती आहे, पण नशिबी रक्तपात लिहिलेला आहे. त्या देशांच्या नशिबी शांतता नाही. तेथे शांतता कशी प्रस्थापित करता येईल यावर जगातील सर्वच देशांनी एकत्र बसून विचार करायला हवा.
(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)