कुणाची संक्रांत कुणावर ?
By सचिन जवळकोटे | Published: January 11, 2018 03:00 AM2018-01-11T03:00:00+5:302018-01-11T03:00:50+5:30
संक्रांत जवळ येताच अशोकराव नांदेडकरांनी मुद्दामहून ‘कणकवली’करांना मेसेज पाठविला. ‘तीळगूळ घ्या ऽऽ एकदा तरी गोड बोला,’ मेसेज वाचून गोंधळलेल्या धाकट्या नीतेशनी थोरल्या नीलेशना विचारलं, ‘गोड बोला... हेचो अर्थ काय?
स्थळ पहिलं : कणकवली
संक्रांत जवळ येताच अशोकराव नांदेडकरांनी मुद्दामहून ‘कणकवली’करांना मेसेज पाठविला. ‘तीळगूळ घ्या ऽऽ एकदा तरी गोड बोला,’ मेसेज वाचून गोंधळलेल्या धाकट्या नीतेशनी थोरल्या नीलेशना विचारलं, ‘गोड बोला... हेचो अर्थ काय?’ थोरलेही दचकले. दोघांनी पिताश्रींना विचारलं. या दोन गुणी लेकरांच्या अनोख्या प्रश्नावर भरपूर डोकं खाजवूनही नारायणरावांना काही उत्तर सापडलं नाही.
‘माका पण कळला नाय बाळांनोऽऽ मी पण आयुष्यात कधी गोड बोलाक नाय,’ असं म्हणत त्यांनी देवेंद्रपंतांनाच मेसेज टाकला, ‘याचा अर्थ काय?’ पंतांकडून तत्काळ रिप्लाय आला, ‘गूळ खोबरं घ्याऽऽ नुसतंच गोड-गोड बोला,’ हा मेसेज वाचताना मात्र तिघांच्याही डोक्यात प्रकाश पडला. आपल्याला नुसतं गूळ खोबरं देऊन ठेवलेल्या पंतांच्या गोडऽऽ गोड बोलण्याचा अर्थही त्यांना समजला.
स्थळ दुसरं : मातोश्री
उद्धोंच्या मोबाईलची रिंग वाजली, तेव्हा त्यांनी प्रश्नार्थक नजरेनं मिलिंदकडं बघितलं; कारण या मोबाईलवर कुणाचा कॉल घ्यायचा अन् कुणाचा कट करायचा, याचं नियोजन म्हणे मिलिंदच करायचे. कॉल चक्क ‘कृष्णकुंज’वरून आलेला पाहून मोबाईल उचलला गेला. तिकडून खर्ज्या आवाजात एक डॉयलॉग आदळला, ‘नमस्कार. मी राज. तीळ द्याऽऽ गूळही द्याऽऽ गोडही तुम्हीच बोला!’ फोन कट झाला. या संदेशात फक्त घेण्याचीच भाषा होती. देण्याचा कुठं उल्लेखच नव्हता. तेव्हा चिडून उद्धोंनी युवराजांना विचारलं, ‘देण्या-घेण्यात माहीर असणाºया तुमच्या काकांना आज-काल फक्त घ्यायचंच माहितंय वाटतं; परंतु आपण तरी कधी कुणाला काय देतोय?’ त्यावर अल्लडपणे युवराज उत्तरले, ‘हो. देतो कीऽऽ आपल्याच सरकारला तळतळाट अन् शिव्याशाप!’
स्थळ तिसरं : वर्षा बंगला
देवेंद्रपंतांना तीळगूळ देण्यासाठी अष्टप्रधान मंडळातील सहकारी उत्साहानं (अन् नाईलाजानंही) जमले. तीळगुळाची पुडी बांधण्यासाठी रद्दीच्या भावात गेलेल्या मुंबई विद्यापीठाची उत्तरपत्रिका विनोदभाऊंनी वापरली. ‘पुढच्या वर्षी बदलणाºया सरकारमध्ये आम्ही दोघं असणार की नाही?’ असा सवाल महादूदादा अन् सदाभाऊंनी केला, मात्र मोबाईल पाहण्यात गुंतलेल्या गिरीशरावांनी लक्ष दिलं नाही. बहुधा रात्रीची क्लिप पाहण्यात ते व्यस्त असावेत. चंद्रकांतदादांनी खुणावताच त्यांच्या लाडक्या यल्लप्पानं तातडीनं पोतं भरून तीळ-गूळ आणलं. हे भरगच्च पोतं म्हणजे ‘खड्डेमुक्त महाराष्ट्र’चीच कृपा. (म्हणजे चांगल्या रस्त्यावरून आलेल्या गाडीतलं पोतं टिकलं हो. उगाच नसता गैरसमज नसावा.) असो.
इकडं सुभाषबापू सांगू लागले, ‘मी लोकांचं मंगल करणारा मंत्री. त्यामुळं पालिकेत बाहेरच्यांना गूळ देईन, मात्र घरच्या मालकांना तीळही देणार नाही,’ हे ऐकून सोलापुरातील ‘विजयकुमार अन् दिलीपराव’ अनेकांना आठवले. या सर्व धांदलीत कुणाच्या तरी लक्षात आलं की इथं पंकजाताईच आल्या नाहीत. गर्दीतल्या एकानं त्यांना कॉल केला, ‘ताई.. तीळ-गूळ द्यायला कधी येणार?’ तेव्हा तिकडून दचकून विचारणा झाली, ‘कुठला गूळ.. चिक्कीतला का?’ मात्र, नेटवर्क खराब झाल्यानं पुढचा आवाज ऐकू आला नाही.