ज्याच्या त्याच्या पाठीला केवळ खंजिराचीच भीती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 08:08 AM2021-06-24T08:08:38+5:302021-06-24T08:08:47+5:30

स्पीच संपलं. काका उठले. दादाही त्यांच्या ‘पाठी’मागं निघाले. मात्र लगेच त्यांचा हात धरून काकांनी त्यांना आपल्या‘सोबत’ घेतल्याचं मुनींनी पाहिलं...

Whose back is only afraid of the dagger! pdc | ज्याच्या त्याच्या पाठीला केवळ खंजिराचीच भीती!

ज्याच्या त्याच्या पाठीला केवळ खंजिराचीच भीती!

Next

- सचिन जवळकोटे

रंभा अन्‌ उर्वशीतला वाद काही मिटता मिटत नव्हता. अखेर इंद्र महाराजांनाच यात मध्यस्थी करावी लागली, ‘काय चाललंय तरी काय तुम्हा दोघींचं? आघाडी सरकारमधले नेतेही भांडत नसतील एवढा तुम्ही विषय ताणताहात. स्वत:ला काय नाना समजताहात की दादा?’ - महाराजांच्या खोचक प्रश्नावर दोघीही चपापल्या. 

‘आम्ही दोघी भांडतो, रुसतो, फुगतो; परंतु त्या मंडळींबरोबर नका ना आमची तुलना करू. आम्ही नक्कीच त्यांच्यापेक्षा अधिक समजूतदार आहोत,’- दोघींनीही एका तालात, एका सुरात सांगितलं. दरबारात हशा पिकला. वातावरण हलकं-फुलकं बनलं. 
‘पण, काय मुनीऽऽ या तीन पार्ट्यांमध्ये नेमका प्रॉब्लेम तरी काय? सातत्यानं का फील येतोय सार्वजनिक नळावरचा?’ - महाराजांनी विचारताच नारद उत्तरले, ‘केवळ आपल्यालाच नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्राला हा प्रश्न पडलाय. मी समक्ष जाऊनच शोध घेतो. आज्ञा असावी.’ 

वीणा झंकारत नारद भूतलावर पोहोचले. सुरुवातीला त्यांना पटोले नाना भेटले. ते कुणाशीतरी मोबाइलवरून बोलत होते, 
‘हे बघ राजू.. मला वर्षा सूट होईल की दुसरा बंगला, याचा निर्णय उद्या घेतो. तोपर्यंत दोन-तीन लाल दिव्यांच्या नव्या कोऱ्या गाड्या आजच बुक करून ठेव. एक मुंबईत तर दुसरी भंडाऱ्यात फिरण्यासाठी.’ 

ते आपल्या राजू पीएसोबत ‘भावी सीएम’पदाची चर्चा करताहेत, हे मुनींच्या लक्षात आलं.
‘तुमची तयारी तर भलतीच जोरात दिसतेय नानाभाऊऽऽ मग सध्याचे सीएम कुठं जाणार?’- नारदांनी खोदून विचारताच नाना नेहमीप्रमाणं ठसक्यात बोलले, ‘ते पीएमना विचारा. चला जाऊ द्या मला विदर्भाच्या दौऱ्यावर.’ 
नाना निघाले. पाठमोरे झाले. त्यांची पाठ जरा मोठी वाटली. नारदांनी विचारताच एका कार्यकर्त्यानं कानात सांगितलं, ‘आजकाल नाना शर्टाच्या आत चिलखत घालून फिरताहेत.’ 

मुनी दादरला गेले. तिथं रौतांचे संजयराव भेटले. मुनींनी विचारलं, ‘तुमचे पॉलिटिकल पार्टनर नाना म्हणत होते की, सीएमबद्दल पीएमना विचारा. त्या दोघांचं काय दिल्लीत ठरलं-बिरलं की काय?’ डोकं खाजवत संजयराव हळूच कुजबुजले, ‘आजकाल काय चाललंय, हे मलाही कळेनासं झालंय. माझेपण आडाखे चुकू लागलेत. मलाही धोरण बदलावं लागणार की काय, असं वाटू लागलंय.’ 
नारद गालातल्या गालात हसत म्हणाले, ‘कदाचित थोरले काका बारामतीकरांपर्यंत या हालचाली पोहोचू नयेत म्हणून तुमच्यापासूनही गुप्त ठेवल्या जात असाव्यात.. पण काय हो, दिल्लीच्या भेटीत काहीतरी गिफ्ट दिलंय म्हणे नमोंनी खास?’ 
यावर रौतांनी बोलणं टाळलं; मात्र प्रतापराव घाईघाईनं बोलले, ‘होय. होय. तेच ते चिलखत घालून आमचे सीएम फिरताहेत सर्वत्र. माझ्या लेटरमध्येही लिहिलंय की तसं!’ 

पुन्हा पाठीवरच्या चिलखताचा विषय कानावर पडताच मुनी चमकले. त्यांनी थेट बारामतीची वाट धरली. गोविंद बागेजवळ प्रशांत किशोर यांचा कार ड्रायव्हर भेटला, ‘भविष्य में हमारे साब का हेड ऑफिस इसी गाँव मे होगा क्या?’ - तो घाबरून विचारत होता. बंगल्यात अनेक नेत्यांची मिटिंग सुरू होती. एका स्टील कंपनीचा अधिकारी पीपीटी सादर करत होता. खासगी साखर कारखान्यांनंतर अजितदादांनी आता स्टील फॅक्टरीतही लक्ष घातलं की काय, असं उगाच मुनींना वाटून गेलं. ऑफिसर शेवटी बोलला, ‘कितीही ॲटॅक होऊ देत. आमचं स्ट्राँग चिलखत हण्ड्रेड परसेंट सेफ मिन्स सेफ!’
स्पीच संपलं. साऱ्यांच्या नजरा थोरल्या काकांकडं वळल्या. त्यांनी मूकपणेच संमती दिली. डील झालं. डझनभर चिलखतांची ऑर्डर दिली गेली. 
काका उठले. दादाही त्यांच्या ‘पाठी’मागं निघाले. मात्र लगेच त्यांचा हात धरून काकांनी आपल्यासोबत घेतलं.
मुनी गोंधळले. तेव्हा मिश्कील हसत जयंतराव हळूच बोलले, ‘साहेबांना खंजिरांची अन् विरोधकांचीही भीती नाही वाटत. फक्त आपल्याच माणसांपासून ते नेहमी सावध असतात. पहाटे झोपेतही!’ 
अगाऽऽगाऽऽ मुनींच्या डोक्यात प्रकाश पडला. 
तत्काळ इंद्र दरबारात पोहोचून त्यांनी कथन केलं, ‘महाऽऽराज.. भूतलावर राज्य केवळ चिलखतांचंच. दहशत केवळ खंजिरांचीच. प्रत्येकालाच वाटतंय की आपल्या पाठीत आता खंजीर खुपसला जाणार.’ नारायणऽऽ नारायणऽऽ 

Web Title: Whose back is only afraid of the dagger! pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.