ज्याचा त्याचा इतिहास!

By admin | Published: May 19, 2016 04:41 AM2016-05-19T04:41:30+5:302016-05-19T04:41:30+5:30

इतिहास म्हणजे काय, हा प्रश्न निर्माण झाला आहे, तो भारत-पाक यांच्यातील नकाशाच्या वादामुळे आणि त्यात आता आणखी दोन नव्या वादांची भर पडली

Whose history! | ज्याचा त्याचा इतिहास!

ज्याचा त्याचा इतिहास!

Next


इतिहास म्हणजे काय, हा प्रश्न निर्माण झाला आहे, तो भारत-पाक यांच्यातील नकाशाच्या वादामुळे आणि त्यात आता आणखी दोन नव्या वादांची भर पडली आहे. त्यापैकी पहिला आहे, तो मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रमाच्या पुस्तकात ‘टिळक व गांधी हे धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात-अँटी सेक्युलर-होते, असे म्हटले असल्याचा आरोप काँगे्रस व राष्ट्रवादी यांनी केला आहे. दुसरी घटना आहे, ती परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही. के.सिंह यांनी दिल्लीतील अकबर रस्त्याचे नाव बदलण्याच्या केलेल्या मागणीची. साहजिकच इतिहास म्हणजे काय, या प्रश्नाचेच उत्तर शोधायला हवे. इतिहास म्हणजे विविध प्रकारच्या तपशिलाचा अर्थ लावणे, असे ‘व्हॉट इज हिस्टरी’ हा गाजलेला ग्रंथ लिहिणाऱ्या इ.एच.कार या प्रख्यात इतिहासकाराने म्हटले आहे. जो सच्चा इतिहासकार असतो, तो तपशिलाबाबत अतिशय काटेकोर असतो, त्यात तो सोईनुसार कधीही फेरफार करीत नाही, तो फक्त त्याच्या वैचारिक दृष्टिकोनानुसार या तपशिलाचे विश्लेषण करतो. म्हणूनच ऐतिहासिक तपशिलाचे विश्लेषण विविध प्रकारे केलेले आढळून येत असते. ते इतिहासाचे पुनर्लेखन नसते, तो इतिहासच असतो, फक्त त्या इतिहासकाराच्या वैचारिक दृष्टिकोनातून लिहिलेला, पण वस्तुनिष्ठ तपशिलावर आधारलेला. या निकषाच्या आधारे जर वर उल्लेख केलेल्या घटनांकडे दृष्टिक्षेप टाकल्यास काय आढळते? भारत व पाक यांच्यातील आजच्या वादाचे मूळ हे फाळणीत आहे. मुस्लीम बहुसंख्यता व भौगोलिक सलगता या दोन निकषांच्या आधारे ही फाळणी झाली. ब्रिटिश परत गेल्यानंतर संस्थानांना त्यांचे सार्वभौमत्व परत मिळाल्यानंतर ते भारत वा पाकिस्तान यापैकी एका देशात सामील होणे वा स्वतंत्र राहाणे याचा निर्णय करणार होते. पण ‘सार्वभौमत्व हे संस्थानिकांचे नसून, ते संस्थानातील जनतेचे आहे’, अशी काँगे्रसची भूमिका होती. फाळणीच्या दोन्ही निकषांनुसार जम्मू व काश्मीरवर पाकने दावा केला, पण या संस्थानातील जनतेची व संस्थानिकांचीही तशी इच्छा नव्हती. त्यांना ‘स्वतंत्र’ राहायचे होते. त्यातून पाकची घुसखोरी व पुढच्या सगळ्या घटना घडत गेल्या. जेव्हा पाक घुसखोर आले, तेव्हा जम्मू व काश्मीर संस्थानाला स्वत:चे संरक्षण करणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी भारताची मदत मागितली आणि ती मिळावी म्हणून भारतात विलीन होण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे हे संस्थान भारतात विलीन झाले. पण पाकला ते मान्य नव्हते आणि तेव्हापासून ‘पाकव्याप्त काश्मीर’ आणि आपले काश्मीर असे दोन भाग अस्तित्वात आहेत. म्हणूनच गेली सहा दशके ‘काश्मीर’ हा जगासाठी ‘वादग्रस्त’ भाग आहे. सर्व काश्मीर हा भारताचा आहे, असे आपण मानतो आणि भारताने बळकावलेला काश्मीरचा भागही आमचाच आहे, असे पाक मानत आला आहे. भारताच्या नकाशात ‘जम्मू व काश्मीर’ हा देशाचा भाग दाखवला जातो. पण जग हे मानत नाही. जगभर भारताच्या नकाशात ‘जम्मू व काश्मीर’ हा वादग्रस्त भाग म्हणूनच दाखवला जातो. असे नकाशे असलेली पुस्तके, नियतकालिके भारतात येतात, तेव्हा त्यावर केंद्र सरकारतर्फे ‘हा भारताचा अधिकृत नकाशा नाही’, असा छापा मारला जातो. हे गेली सहा दशके चालू आहे. मात्र आजच हा वाद उफाळून आला; कारण आता नकाशा चुकीचा दाखवला, तर तुरूंगवास व दंडाची शिक्षा ठोठावणारा बदल संबंधित कायद्यात करण्याचे मोदी सरकारने ठरवले आहे. हे इतिहासाचे पुनर्लेखन झाले. काश्मीर वादग्रस्त असल्याचे आपण नाकारू शकतो. पण जग ते मान्य करणार नाही व त्याने मान्य करावे, हा आपला आग्रहही कोणी स्वीकारणार नाही. असा वाद चीनशीही होऊ शकतो. किंबहुना आपला चीनशी असलेला वाद हा मुळात ‘नकाशांचा’च आहे. खरे तर कायद्यात असा बदल करण्याची अजिबात गरज नव्हती आणि हा विनाकारण ओढवून घेतलेला वाद आहे. हीच गोष्ट अकबराचे नाव बदलण्याची आहे. रस्त्याचे नाव बदलले, तरी इतिहासातील अकबराच्या स्थानाला व त्याच्या कारकिर्दीला काही धक्का बसणार नाही. फक्त नाव बदलून आम्ही ‘मुस्लीम आक्रमण’ पुसून टाकले, असे भ्रामक समाधान मिळेल एवढेच. असाच प्रकार मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचाही आहे. महात्माजी स्वत:ला सनातन हिंदू म्हणवून घेत असत. त्या अर्थाने ते धर्मनिरपेक्ष नव्हतेच. पण ते धर्माग्रहीही नव्हते. टिळकही धर्मनिरपेक्ष नव्हते. किंबहुना टिळक वा गांधी यांच्या काळात ‘धर्मनिरपेक्षता’ या संकल्पनेचा भारतीय राजकीय चर्चाविश्वात फारसा उल्लेखही होत नसे. तेव्हा आजची राजकीय प्रमेये इतिहासातील व्यक्ती व घटना यांना लावणे, हेच अनैतिहासिक आहे. त्यामुळेच पाठ्यपुस्तकात ‘अँटी सेक्युलर’ असा टिळक व गांधी यांचा उल्लेख करणे हे निव्वळ अज्ञानच नव्हे, तर तो बौद्धिक अडाणीपणाही आहे. शेवटी ‘ज्याचा त्याचा इतिहास’ हाच आजचा नियम बनवण्यात आला आहे व हेच तेवढे सत्य आहे.

Web Title: Whose history!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.