अतुल सावे कोणा कोणाच्या घरी पाणी भरत आहेत ?

By सुधीर महाजन | Published: April 30, 2019 03:40 PM2019-04-30T15:40:39+5:302019-04-30T15:46:07+5:30

पाणी टंचाईला शिवसेनेइतकेच भाजप ही जबाबदार आहे याचा विसर मात्र भाजपला सोयीस्कर पडतो.

At whose house Atul Save fills water ? | अतुल सावे कोणा कोणाच्या घरी पाणी भरत आहेत ?

अतुल सावे कोणा कोणाच्या घरी पाणी भरत आहेत ?

googlenewsNext

- सुधीर महाजन

सटाण्याला देव मामलेदारांचे मंदीर आहे; मामलेदार नावाचा देव म्हटल्यानंतर नावातच उत्सुकता खुण्या मारुती, कानफोडे हनुमान अशा नावांना सरावलेले आपले काम असतांनाही हे नाव कानावर पडले की वेगळेच वाटते. मामलेदार म्हणजे तहसीलदार. तहसीलदाराला लोक देव मानतात हे म्हणजे फारच झाले. तर या देव मामलेदारांनी बागलान परिसरात प्रचंड लोकोपयोगी काम केली. पाण्याचा प्रश्न सोडविला त्यांच्या अशा कामांनी जनतेने त्यांना देवत्त्व बहाल केले. त्यांचे मंदीर बांधले. त्याची दरवर्षी मोठी यात्रा भरते. सोयगाव या तालुक्याच्या गावानेही नाईक गुरूजींचे मंदीर बांधले. या शिक्षकाने आयुष्यभर ज्ञानदान आणि समाज कार्य केले. पाच वर्षापूर्वी निधनानंतर त्यांचे मंदीर गावाने बांधले. अशी उदाहरणे दुर्मीळ असतात आपले काम चाकोरीबाहेर जावून करणे व लोककल्याण साधने अशांनाच देवत्त्व प्राप्त होते. आज एक बातमी वाचतांना या दोघांची आवठवण झाली. देव मामलेदारांना मी पाहिलेले नाही. कारण ते ब्रिटिशांच्या काळात होते; परंतु नाईक गुरूजींना भेटलो आहे. आपण वेगळे काही करतो आहे असा अभिनिवेश नसलेला निर्मळ, साधा माणुस तुमच्या माझ्या घरातील आजोंबासारखा. 

तर या दोघांच्या आठवणीचे कारण एक बातमी होती. औरंगाबादमध्ये भीषण पाणी टंचाई आहे. आठ-दहा दिवस पाणी मिळत नाही. सगळ्यांच्याच तोडचे पाणी पळाले आहे. जनतेच्या रोषामुळे लोकप्रतिनिधी तोंड लपवत आहेत. त्यांच्या नाकर्तेपणाची प्रतिती लोकांना पावला पावलावर येते तर पाण्याच्या टँकरसाठी सिडको एन-५ येथील पाण्याच्या टाकीवर एक जमाव गेलेला. आधिच उन्हाची काहिली आणि त्यात पाणी टंचाईची भर संतापलेल्या जमावाने येथे टँकर अडवले. तेवढ्यात एक टँकर रांग मोडून घुसला तो भाजपचे आमदार अतुल सावेंचा होता जनतेला पाणी पुरवठा करण्याच्या कल्याणकारी कामासाठी सावेंनी हा टँकर सुरू केला. मतदारांच्या काळजीचा उदात्त हेतु असावा असे तरी दिसत होते. लोकांनी तो अडवला. एकाने त्यातील रजिस्टर उघडून नावे तपासली तर म्हणजे या टँकरने पाणी देवून कोणाची सेवा बजावली हे तपासले आणि नावे वाचण्यास सुरूवात केली. तर यात विजया रहाटकर ज्या की माजी महापौर आणि आता महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. किशनचंद तनवाणी, स्वत: अतुल सावे अशी नावे बाहेर आली. आणखी वस्त्रहरण नको म्हणून समयसूचकता दाखवत सावे यांच्या टँकर चालकाने ते रजिस्टर हिसकावून घेत पोबारा केला. या कृतीतूनच आमदारांच्या समाजसेवेचे दर्शन घडले.

पाण्याच्या प्रश्नावर गेल्या महिन्यात भाजपच्या नगरसेवकांनी आंदोलनाचा आव आणला होता. जो तो उठून आंदोलन करत आपण कसे समजासेवक, जनतेचे कैवारी आहोत याचे दर्शन घडवत होता. खरे तर शिवसेनेच्या गळ्यात गळा घालून ही मंडळी संत्तेत आहेत, सत्ताधारी आहेत; पण सत्ताधारीच आंदोलन करतात असे अभूतपूर्व दृश्य औरंगाबादकरांनी अनुभवले. पाणी टंचाईला शिवसेनेइतकेच भाजप ही जबाबदार आहे याचा विसर मात्र भाजपला सोयीस्कर पडतो. भ्रष्टाचारी माणूस भरपूर पैसे कमावतो व पाप क्षालनासाठी वर्षातून एकदा तिरुपतीला जावून हुंडीत काही रक्कम टाकून स्वत:चे समाधान करून घेतात, असा हा नगरसेवकांच्या आंदोलनाचा प्रकार आहे. त्यामुळे आपल्या पक्षांच्या सहकाऱ्यांच्या घरी अतुल सावे पाणी भरतात यात वावगे ते काय ही सर्व एकाच संस्कृतीची मंडळी आहेत हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. रोम जळत असतांना निरो गिटार वाजवत होता ही प्रपृत्ती अनादी काळापासूनची असल्याने वेगळे काहीच नाही. जनतेच्या तोंडचे पाणी काढून घेण्याचा प्रकार नवा नाही.

Web Title: At whose house Atul Save fills water ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.