रस्ता कुणाचा? -आधी पादचारी, घोडे, मग गाड्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 05:53 AM2021-08-04T05:53:06+5:302021-08-04T05:54:25+5:30

रस्त्यावर पहिला अधिकार कोणाचा? गायी-गुरांचा? पादचाऱ्यांचा, दुचाकी वाहनचालकांचा की चार चाकी वाहनचालकांचा? प्रत्यक्ष पाहिले, तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवगळी परिस्थिती दिसेल. उत्तर भारतासारख्या ठिकाणी  अगदी हमरस्त्यांवरही ठिकठिकाणी गायी-गुरांचा वावर दिसेल.

Whose road is it -First pedestrians, horses, then carts! | रस्ता कुणाचा? -आधी पादचारी, घोडे, मग गाड्या!

रस्ता कुणाचा? -आधी पादचारी, घोडे, मग गाड्या!

Next

रस्त्यावर पहिला अधिकार कोणाचा? गायी-गुरांचा? पादचाऱ्यांचा, दुचाकी वाहनचालकांचा की चार चाकी वाहनचालकांचा? प्रत्यक्ष पाहिले, तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवगळी परिस्थिती दिसेल. उत्तर भारतासारख्या ठिकाणी  अगदी हमरस्त्यांवरही ठिकठिकाणी गायी-गुरांचा वावर दिसेल. दिवसा-रात्री कोणत्याही वेळी रस्त्यानं गेलं तरी तिथं गुरं विशेषत: गायी बसलेल्या दिसतील. अर्थातच दूध न देणाऱ्या भाकड गायी. त्यांना उगाचंच पोसण्यापेक्षा लोक त्यांना सरळ रस्त्यावर सोडून देतात. त्यामुळे त्यांनीही तिथेच ठाण मांडलेलं असतं. वाहनांनाही ही गुरं इतकी सरावली आहेत, की अगदी त्यांच्याजवळून वाहनं गेली, डोळ्यांवर प्रखर प्रकाशझोत पडला, मोठमोठ्यानं हॉर्न वाजवला तरी ती ढिम्म हलत नाहीत! इतरवेळी, इतर ठिकाणी मात्र रस्त्यांवर चार चाकी वाहनांचं राज्य असतं. पादचारी तर अगदी कस्पटासमान! 
हा झाला भारतातला प्रकार, पण ब्रिटन आणि इतर देशांमध्ये उलट प्रकार आहे. तिथे लोकच स्वत:हून पादचाऱ्यांना प्रथम प्राधान्य देतात. ब्रिटनने तर नुकताच एक प्रस्ताव तयार केला आहे. पुढील वर्षी त्याचं कायद्यात रूपांतर होईल. त्यानुसार कायद्यानं हमरस्त्यावर विशेषत: सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग, चौक इत्यादी ठिकाणी पहिला अधिकार पादचाऱ्यांचा असेल. त्यासाठीची क्रमवारीही त्यांनी जाहीर केली आहे. कोणीही पादचारी सिग्नल, चौक ओलांडत असेल, तर इतरांनी थांबावं. त्यानंतर अधिकार घोडेस्वारांचा, त्यानंतर दुचाकीस्वारांचा आणि शेवटचा अधिकार चार चाकी आणि इतर मोठ्या वाहनांचा.
अर्थातच याला एक कारणही आहे. ब्रिटनमध्ये सध्या लोकांच्या आरोग्याला प्रचंड प्राधान्य दिलं जात आहे. त्या जोडीला पर्यावरणातही सरकारनं लक्ष घातलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी याच सदरात आपण वाचलं, ब्रिटनमध्ये व्यायाम करणाऱ्यांना आणि पौष्टिक अन्नपदार्थ खाणाऱ्यांना ब्रिटनचं सरकार स्वत:च रोख पैसे आणि सवलती देणार आहे. त्याचबरोबर जंकफूडच्या वाहिन्यांवरील जाहिरातीही दिवसा बंद ठेवण्यात येतील. याच प्रयत्नांचा हा पुढचा भाग आहे. कोरोना काळातही लोकांनी ॲक्टिव्ह राहावं, त्यांना प्रवास करता यावा, पायी चालणं आणि सायकलिंगला प्रोत्साहन मिळावं यासाठी सरकारनं नवी नियमावली तयार केली असून, त्यासाठी तब्बल ३३८ मिलिअन पाऊण्ड‌्सची तरतूदही केली आहे. या नियमांमुळे इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्स येथील वाहतुकीसंबंधीचे नियम बदलतील. उत्तर आयर्लंडनं याबाबतचे नियम पूर्वीच लागू केले आहेत.
अनेक नागरिक, स्वयंसेवी संस्था तसेच सायकलिंगचे ग्रुप आणि संघटना यांनी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं असून, यामुळे लोकांना आरोग्यदायी जीवनशैलीसाठी प्रेरणा तर मिळेलच, त्याबरोबर पर्यावरणाचंही रक्षण होईल, असं म्हटलं आहे.
खरंतर, वाहतुकीला सर्वांत कमी त्रास पादचाऱ्यांचा होतो, पण बेधडक वाहन चालविल्यामुळे त्यांच्याच जीवाला मोठा धोका पोहोचतो. नव्या नियमांमुळे आता कार, व्हॅन, लॉरी, ट्रक इत्यादी वाहनचालकांना मोठी दक्षता घ्यावी लागेल.
‘लिव्हिंग स्ट्रीट्स’ या सामाजिक संस्थेचे प्रमुख स्टीफन एडवर्ड‌्स म्हणतात, यामुळे लोकांचे जीव वाचतील आणि वाहतुकीलाही शिस्त लागेल. ‘लिव्हिंग स्ट्रीट्स’ या संस्थेतर्फे विविध शहरं आणि उपनगरांमध्ये लोकांना पायी चालण्यासाठी जागा आणि प्राधान्य मिळावं यासाठी जनचळवळ उभारली जाते.
रस्त्यावरील पादचारी जोपर्यंत झेब्रा क्रॉसिंग ओलांडून सुरक्षित ठिकाणी जात नाही तोपर्यंत वाहनचालकांना आता थांबावे लागेल. त्याचवेळी पादचाऱ्यांनाही सल्ला देण्यात आला आहे की, जोपर्यंत रस्त्यावरची वाहनं थांबत नाहीत, तोपर्यंत तुम्हीही रस्ता ओलांडायला सुरुवात करू नका.
गेल्या काही वर्षांपासून ब्रिटनमध्ये सायकल चालवणाऱ्या लोकांची संख्याही प्रचंड प्रमाणात वाढली आहे. लोकांनी गेल्या वीस वर्षांत एकत्रितपणे जेवढं सायकलिंग केलं नाही, तेवढं सायकलिंग लोकांनी मागच्या एका वर्षात केलं, असंही वाहतूक विभागाचं म्हणणं आहे. सायकलिंगमध्ये गेल्या वर्षी तब्बल ४६ टक्के वाढ झाली आहे. हे सायकलिंग किती असावं? लोकांनी किती सायकल चालवली असावी?  आकडेवारी सांगते, गेल्या वर्षी ब्रिटनच्या रस्त्यांवरून लोकांनी पाच बिलिअन मैल (किलोमीटर नव्हे) सायकल चालवली! 
सरकारचं म्हणणं आहे, येत्या काळात लोकांच्या सोयीसाठी आणि त्यांना चालण्याला प्रोत्साहन देण्यासाठी फक्त पादचारी मार्ग तर आम्ही तयार करणार आहोतच, पण उच्च प्रतीचे सायकलिंग ट्रॅक, सायकल लेन्सही तयार केल्या जातील. त्यासाठी ‘नॅशनल सायकल नेटवर्क’ मजबूत करण्यात येईल. नेदरलॅण्ड‌्स हा युरोपीय देश सायकलींचा देश म्हणून ओळखला जातो. सायकल ट्रॅकसाठी या देशाचीही मदत घेतली जाणार आहे. 

वाहनचालक संघटनांचा विरोध! 
वाहनचालकांच्या संघटनेनं  या नव्या नियमांना जोरदार विरोध केला आहे. ‘अलायन्स ऑफ ब्रिटिश ड्रायव्हर्स’ आणि इतरही वाहनचालक संघटनांचं म्हणणं आहे, हे अन्यायकारक आहे. मुळातच अनेक पादचारी आणि सायकलचालक वाहतूक नियमांचं पालन करीत नाहीत. त्यात त्यांना आता इतके अधिकार दिल्यानं त्यांच्याच चुकीनं समजा एखादा अपघात झाला, तर त्याचा दोष वाहनचालकांच्याच माथी मारला जाईल!

Web Title: Whose road is it -First pedestrians, horses, then carts!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.