हे पाप कोणाच्या माथी?

By admin | Published: January 3, 2017 12:17 AM2017-01-03T00:17:09+5:302017-01-03T00:17:09+5:30

अकोल्यात गुन्हेगार ठरलेल्या डोंबारी मात्या-पित्यांपासून आपण जसे जगण्याचे साधन हिसकावून घेतले तशीच त्यांची मुलेसुद्धा हिरावून घेतली आहेत. या पापाचे प्रायश्चित कोण घेणार?

Whose sin is this? | हे पाप कोणाच्या माथी?

हे पाप कोणाच्या माथी?

Next

अकोल्यात गुन्हेगार ठरलेल्या डोंबारी मात्या-पित्यांपासून आपण जसे जगण्याचे साधन हिसकावून घेतले तशीच त्यांची मुलेसुद्धा हिरावून घेतली आहेत. या पापाचे प्रायश्चित कोण घेणार?

आपल्या मुलांकडून जीवघेणे खेळ करवून घेतात म्हणून डोंबारी माता-पित्यांना अकोला पोलिसांनी केलेली अटक ही घटना तशी साधीच. माध्यमांच्या दृष्टीने ती किरकोळ असल्याने तिची कुणी दखल घेतली नाही. पण, संवेदनशील समाजमन असलेल्यांना ती अस्वस्थ करून गेली. यातील चीड आणणारी गोष्ट अशी की, या माता-पित्यांविरुद्ध कुणीही तक्रार केली नव्हती. अकोल्याच्या अतिउत्साही ठाणेदाराने स्वत:हून पुढाकार घेत या डोंबारी माता-पित्यांविरुद्ध कारवाई केली. अशी जागरुकता हे पोलीस एरवी दाखवत नाहीत. डोंबारी समाजाचे नष्टचर्य आणि पिढ्यान्पिढ्यांपासून सुरू असलेली ससेहोलपट या पोलिसाला ठाऊक असती तर तो असा संवेदनशून्य वागलाच नसता.

कायद्याच्या भाषेत विचार केला तर या आई-वडिलांनी तसा गंभीर गुन्हा केला आहे. पण, कुठलेही मायबाप स्वेच्छेने आपल्या मुलांना दोरीवर चालायला लावत नाहीत वा जीवघेण्या कसरतीही त्यांच्याकडून करवून घेत नाहीत. पोटाची खळगी भरण्यासाठी मुलांना जीव धोक्यात घालायला लावणे हा या डोंबारी समाजाच्या प्राक्तनाचा भाग आहे. अभिजनांनी या खेळांना लोककलेच्या बेड्या ठोकून हे मार्ग आणखी घट्ट केले आहेत. तो गुन्हा आहे हे त्या दुर्दैवी आई-वडिलांना पहिल्यांदाच कळले असावे. शेकडो वर्षांपासून ज्यांनी त्यांचे माणूसपणाचे हक्क हिरावून घेतले ते गुन्हेगार मात्र प्रतिष्ठित ठरले आहेत. मूल उभे राहू लागले की त्याच्या अंगाचे मुटकुळे करून त्याला शारीरिक कसरती करायला लावणे, हीच डोंबारी समाजातील पहिली ‘अक्षरओळख’. कारण, त्यातून त्यांना जगण्याचे साधन सापडत असते. शहरात वर्दळीच्या एका कोपऱ्यात दोरीवरून चालणे, आगीच्या रिंगमधून उडी घेणे असे खेळ ही डोंबारी मुले करीत असतात. आपण कुतुहलाने त्यांच्याकडे पाहतो, चार पैसे फेकतो व घटकाभर मनोरंजन करून पुढे निघून जातो. आपले बाळ रडले तरी अस्वस्थ होणारी माणसे आपण. पण, या मुलांच्या वेदनांनी आपण कधी विव्हळत नाही.

रात्री आपल्या मुलांना कुशीत घेऊन झोपताना त्यांचा चेहराही आपल्याला आठवत नाही. या समाजाच्या एकगठ्ठा मतांची भीती राज्यकर्त्यांना नसल्याने लोकशाहीत त्यांचे अस्तित्व मान्य केले जात नाही. डोंबाऱ्यांचा खेळ ही ‘लोककला’ असल्याचे समाजशास्त्रज्ञ सांगतात. पण तिला लोककला तरी कसे म्हणावे? कारण ती शोषणावर उभी आहे. अभिजनांनी आपल्या करमणुकीसाठी तिला पोसले आहे. त्यामुळे ही माणसे अशीच दारिद्री, मागास राहावीत असेच पुढारलेल्या समाजाला वाटत राहते. जाती व्यवस्थेत एकेका जातीला आपण अशा लोककलांत करकचून बांधून टाकले आहे. एकेक जात-जमात अशीच अस्तंगत होत आहे. समाजात लोककला हव्यातच. पण त्या जाती आणि शोषणविरहित. डोंबाऱ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न फारसे होत नाहीत. झाले तरी ते संस्कृत श्लोक पाठांतर, पौराहित्याचे धडे देण्यापुरतेच मर्यादित असतात. म्हणजे या समाजाने शहाणे होऊ नये यासाठीच ती तजवीज असते.

भटक्यांच्या उत्थानाच्या नावावर काही मंडळी अनुदान लाटतात व इमले बांधतात. समाजजागरणाचा वारसा सांगणारी माध्यमे या मुलांच्या कसरतीचे फोटो छापतात. कारण, त्यांच्या चोखंदळ नवग्राहकांची ती आवड असते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते या भटक्यांच्या अंधश्रद्धेवर प्रहार करतात. मात्र त्यांना या दुष्टचक्रातून बाहेर काढत नाहीत. या लोककलांचे जतन व्हायला हवे, असा आग्रह धरीत पीएच.डी. करणारे संशोधकही त्यांना या दास्यातून मुक्त करू इच्छित नाहीत. कारण, त्यामुळे त्यांच्या संशोधनाची क्षितिजे रुंदावण्याची भीती असते. एरवी छोट्या-छोट्या गोष्टींसाठी आपण पेटून उठतो. पण, या मुलांच्या मायबापांना अटक झाल्यानंतर चिडत नाही किंवा संतापतही नाही.

देशाच्या पहिल्या पंतप्रधानांपासून तर आताच्या ‘प्रधान सेवका’पर्यंत साऱ्यांनाच सुटाबुटाचे आकर्षण असते आणि हे सारेच जण मुलांमध्येही रमतात. पण, त्यात डोंबाऱ्यांची मुले कधीच दिसत नाहीत. आयुष्यभर त्यांचे पोट या दोरीला टांगलेले असते. अकोल्यात गुन्हेगार ठरलेल्या डोंबारी मात्या-पित्यांपासून आपण जसे जगण्याचे साधन हिसकावून घेतले तशीच त्यांची मुलेसुद्धा हिरावून घेतली आहेत. या पापाचे प्रायश्चित कोण घेणार?
- गजानन जानभोर

Web Title: Whose sin is this?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.