उत्तर प्रदेशात विजय कोणाचा, योगींचा की मोदींचा? भाजपाच्या विजयाची रणनिती समजून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 09:33 AM2022-03-11T09:33:41+5:302022-03-11T09:35:24+5:30
मोदी गुजरातचे नव्हे तर यूपीचे आहेत असे वाटावे! राम मंदिराचे भूमीपूजन करुन निवडणूक निकालाची पायाभरणी केली आणि वाराणसीतील काशी विश्वेश्वर मंदिराच्या परिसराचा जीर्णोद्धार करुन त्यावर कळस चढविला!
- नंदकिशोर पाटील, संपादक, लोकमत
पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंजाब वगळता चार राज्यात भाजपने घवघवीत यश मिळवले. विशेषत: उत्तर प्रदेशात सलग दुसऱ्यांदा मिळालेले यश अभूतपूर्व असे आहे. ऐंशीच्या दशकानंतर या राज्यात कोणत्याच पक्षाला अशी संधी मिळालेली नाही. योगी सरकार त्यास अपवाद ठरले. यूपीत काय होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते, कारण या राज्यातून लोकसभेत ८० खासदार निवडून येतात. हा आकडा मोठा आहे. यूपी जिंकली की लोकसभेची अर्धी लढाई जिंकण्यासारखे असते. महाराष्ट्र (४८), प. बंगाल (४१), बिहार (४०), तमिळनाडू (३९), मध्यप्रदेश (२९), कर्नाटक (२८), गुजरात (२६), आंध्रप्रदेश (२५), राजस्थान (२५) या नऊ मोठ्या राज्यांपैकी प. बंगाल, तमिळनाडू आणि आंध्र सोडले तरी उर्वरित सहा राज्यातून तब्बल १९६ खासदार निवडून येतात. यूपीचे ८० मिळून २७६ खासदार होतात. लोकसभेत बहुमतासाठी २७१ जागा लागतात ! भाजपचे राजकारण समजून घ्यायचे असेल तर हे आकडे महत्वाचे ठरतात. २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रामुख्याने याच राज्यांनी भाजपला सत्ता मिळवून दिली.
यूपी का महत्वाचे, याचे उत्तर वरील आकडेवारीत आहे. त्यामुळे काही करुन हे राज्य जिंकणे भाजपसाठी आणि अर्थातच मोदींसाठी अनिवार्यच होते. म्हणूनच, मोदीजींनी गेल्या दोन वर्षांपासून तयारी सुरु केली होती. या दोन वर्षात पंतप्रधानांचे सर्वाधिक दौरे याच राज्यात झाले. इतके की, मोदी गुजरातचे नव्हे तर यूपीचे आहेत असे वाटावे! राम मंदिराचे भूमीपूजन करुन निवडणूक निकालाची पायाभरणी केली आणि वाराणसीतील काशी विश्वेश्वर मंदिराच्या परिसराचा जीर्णोद्धार करुन त्यावर कळस चढविला! भाजपच्या प्रचारात सुरुवातीपासूनच 'राम' होताच. मनोज तिवारी यांनी गायलेले राम मंदिरावरील गीत तर इतके लोकप्रिय ठरले की ते लग्न समारंभात वाजू लागले ! अनेक लोकगायकांनी याच धर्तीवर भाजपचा प्रचार केला. मुख्यमंत्री योगींच्या भाषणात 'सुशासन आणि राशन हे दोन मुद्दे असले तरी त्यांचाही भर 'ये धर्मयुद्ध है', 'कुरुक्षेत्र है' 'कौरव और पांडवों की लढाई है' हे सांगण्यावर होता. मतांच्या धुव्रीकरणासाठी एवढे पुरेसे होते!
खरंतर शेतकरी आंदोलन, हाथरस, लखीमपूर खेरी, उन्नावच्या घटना, महिलांवरील अत्याचाराच्या घटना आणि कोरोनाकाळात गंगेत वाहणारी प्रेतं हे मुद्दे योगी सरकारच्या विरोधात जाणारे होते. शिवाय, जाट विरुद्ध ठाकूर यांच्यातील सुप्त संघर्ष, राजा मिहीरभोज पुतळा प्रकरणामुळे गुर्जर सुद्धा मोठ्या प्रमाणात दुखावले गेले होते. त्यामुळे निवडणुकीच्या सुरुवातीपासून 'मोदी तुमसे बैर नही, मगर योगी तुम्हारी खैर नही!' अशी घोषणा सर्वत्र घुमत होती. लोक योगींवर नाराज आहेत, पण मोदीजींवर खुश आहेत ही बाब भाजपच्या चाणक्यांनी वेळीच हेरली आणि विरोधात जाणाऱ्या सर्व विषयांवर 'बुलडोझर' फिरवला. योगी आणि मोदी 'डबल इंजिन सरकार' असा प्रचार केला. योगीविरोधी जनमताचे मतपरिवर्तन घडविण्यात मोदीजी यशस्वी झाले. भाजपच्या या विजयात मोदीजींचा सिंहाचा वाटा आहे, हे कोणीही मान्य करेल.
सपाचे अखिलेश यादव यांनी चांगली लढत दिली. पण उमेदवार देण्यात त्यांची चूक झालेली दिसते. खरं म्हणजे, यावेळी मायावती निष्क्रिय होत्या. अखिलेश यांना बसपाची वोट बँक खेचता आली असती. पण तिथेही ते कमी पडलेले दिसतात. बसपाचा एकमेव उमेदवार निवडून आला असला तरी या पक्षाला १२ टक्के मते मिळाली आहेत. काँग्रेस पक्ष या रेसमध्येच नव्हता. प्रियांका गांधी यांच्या रोड शोला गर्दी जमायची पण ती गर्दी मतपेटीपर्यंत पोहोचली नाही. एकट्या प्रियांकांच्या भरोशावर पक्ष कसा जिंकेल?