छी थू कोणाची?
By admin | Published: April 20, 2016 02:54 AM2016-04-20T02:54:16+5:302016-04-20T02:54:16+5:30
विजय मल्ल्या यांच्या विरोधात मुंबईतील विशेष न्यायालयाने अजामीनपात्र पकड वॉरन्ट काढल्यामुळे त्यांच्या म्हणजे मल्ल्या यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे साऱ्यांचेच अनुमान आहे
विजय मल्ल्या यांच्या विरोधात मुंबईतील विशेष न्यायालयाने अजामीनपात्र पकड वॉरन्ट काढल्यामुळे त्यांच्या म्हणजे मल्ल्या यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे साऱ्यांचेच अनुमान आहे. आधी त्यांचे पारपत्र रद्द करणे आणि आता असे वॉरन्ट काढणे यात भारताच्या या मद्य सम्राटाची आणि एका धनाढ्य गुलछबू उद्योगपतीची आंतराराष्ट्रीय पातळीवर चांगलीच छी थू झाल्याचेही अनेकाना वाटू लागले आहे. परंतु प्रत्यक्षात ही छी थू त्यांची नव्हे तर संपूर्ण देशाची झाली आहे, होत आहे आणि मल्ल्यांचे किमान प्रस्तुत प्रकरणातील पूर्वचरित्र लक्षात घेता यापुढेही होत राहाणार आहे. मल्ल्या कोणी एक साधे उद्योजक नव्हते. आता त्यांच्यावर तुटून पडणाऱ्या बव्हंशी राजकीय पक्षांच्याच कृपेने ते राज्यसभेचे सदस्य असल्याने त्यांना विदेश मंत्रालयाने राजनैतिक पारपत्र जारी केले होते. असे पारपत्र धारण करणाऱ्याला परदेशात ज्या बहुविध सवलती देय असतात त्यांचा आजवर ते उपभोग घेत आले आहेत. साहजिकच भारतासारख्या सार्वभौम राष्ट्राने ज्या व्यक्तीला राजनैतिक पारपत्र बहाल केलेले असते, तीच व्यक्ती जेव्हां तेच राष्ट्र ‘भगोडा’ म्हणून जाहीर करते तेव्हां त्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या व्यक्तीचीच नव्हे तर संबंधित राष्ट्राचीही मोठी मानहानी होत असते. आता तर त्याच्याही पुढची पायरी गाठताना त्यांच्या विरुद्ध चक्क पकड वॉरन्टच जारी केले गेले आहे. पण त्यातूनही नेमके काय साध्य होणार? मल्ल्या राजरोसपणे भारताचा किनारा सोडून इंग्लंडात गेले आहेत असे म्हणतात. तिथे जाऊन भारताचा अगदी केन्द्रीय गृहमंत्रीदेखील मल्ल्यांना बेड्या ठोकून भारतात आणू शकत नाही. त्यासाठी आधी इंटरपोलमार्फत ‘रेड कॉर्नर’ नोटीस जारी करावी लागेल. ती जारी केल्यानंतर मल्ल्या खरोखरीच इंग्लंडमध्ये वा अन्य कोणत्याही देशात असल्याचे आढळून आले तर त्या देशाची मनधरणी करावी लागेल. अशा मनधरणीने संबंधित राष्ट्राचे मन वळले जाईलच याची पुन्हा शाश्वती नाही. कॅसेटकिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलशनकुमार खून प्रकरणातील प्रमुख संशयित संगीतकार नदीम शेख इतकी वर्षे लोटूनही अद्याप मुंबई पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही हे येथे लक्षात घ्यावयाचे.