जेएनयूचे कुलगुरू जगदीश कुमार यांच्यावर सारेच का नाराज?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 03:42 AM2020-01-11T03:42:48+5:302020-01-11T03:42:52+5:30
जगभरातील आणि भारताच्या विविध भागांतून जिथे शिकायला जावे, अशी विद्यार्थ्यांची इच्छा असते,
- संजीव साबडे
जगभरातील आणि भारताच्या विविध भागांतून जिथे शिकायला जावे, अशी विद्यार्थ्यांची इच्छा असते, अशा दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरूपदी जगदीश कुमार यांची नेमणूक झाली, त्याला आता पाच वर्षे पूर्ण होत आली. पण ते कुलगुरू झाले, तेव्हापासूनच त्यांच्याविषयी सतत नाराजी व्यक्त होत आली आहे. त्यांच्या राजकीय भूमिकेमुळे काही जणांची नाराजी आहे. पण कुलगुरू कोणत्या विचारांचा असावा, हे ठरवता येत नाही. त्यामुळे तो मुद्दा गैरलागू ठरतो.
जगदीेश कुमार हे अत्यंत विद्वान आहेत, पण विद्वत्ता आणि प्रशासक म्हणून करावयाचे काम यांमध्ये खूपच फरक असतो. प्रशासक म्हणून वेगळ्या पद्धतीने काम करायचे असते. जिथे हजारो विद्यार्थी शिकतात, शेकडो शिक्षक अध्यापनाचे काम करतात, अशा शिक्षण संस्थेची धुरा सांभाळणे सोपे नसते. तिथे मीच दाखवेन, ती दिशा ही भूमिका चालत नाही. जगदीश कुमार यांच्याविषयी सतत वाद झाले, त्यामागील कारण हेच आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या विशिष्ट गटाला जवळ केले आणि त्यांच्या मदतीने अन्य विद्यार्थ्यांची बदनामी सुरू केली.
जगदीश कुमार यांचा एककल्ली कारभार, अकार्यक्षमता, सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न न करणे, प्राध्यापकांना विचारात न घेताच दडपून कारभार हाकण्याचे प्रयत्न यामुळे त्यांच्याविषयीचा राग वाढतच गेला. जेएनयूच्या आवारात गेल्याच आठवड्यात घुसून गुंडांनी घातलेला हैदोस आणि त्यात अनेक विद्यार्थी जखमी झाल्याने जगदीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे. त्यातच ज्यांना मारहाण झाली, त्यांच्याविरोधातच तक्रारी आणि गुन्हे नोंदवले जात असल्याने जगदीश कुमार यांच्याविषयीचा संताप फारच वाढला आहे.
त्याचमुळे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मनुष्यबळ विकासमंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी यांनीही जगदीश कुमार यांना दूर करा, अशी मागणी केली आहे. जगदीश कुमार कारभार हाकण्यात अयशस्वी ठरले, हेच त्याचे कारण आहे. उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल आणि भाजपचे आणखी एक नेते राम नाईक यांनीही अशीच भावना व्यक्त केली आहे. विद्यार्थी व विद्यापीठाच्या हितासाठी जगदीश कुमार यांना कुलगुरूपदावरून दूर करायला हवे, असे मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकरही म्हणाले आहेत. कुलगुरूंच्या राजकीय विचारसरणीमुळे ही मागणी करीत नसल्याचेही त्यांनी बोलून दाखविले. कुलगुरू झाल्यानंतर त्यांनी कारगिल युद्धातील विजयाचे प्रतीक म्हणून विद्यापीठाच्या आवारात लष्करी रणगाडे आणण्याचा घाट घातला. हे रणगाडे पाहून विद्यार्थ्यांत देशप्रेमाची भावना निर्माण होईल, असा त्यांचा अजब तर्क होता.
जगदीश कुमार यांच्याच काळात जेएनयूमधील विद्यार्थी देशद्रोही व पाकिस्तानधार्जिणे असल्याचे आरोप झाले. त्यात भाजप नेते व अभाविप यांचाही हात होता. त्या वेळी जगदीश कुमार या मंडळींचे हीरो होते. या विद्यार्थ्यांची संभावना ‘तुकडे तुकडे गँग’ अशी करण्यात आली. विद्यापीठालाच देशद्रोह्यांचा अड्डा ठरविण्याचे जोरदार प्रयत्न केले गेले. त्याचवेळी नजीब अहमद हा विद्यार्थी गायब झाला. विद्यापीठात विशिष्ट गटालाच हाताशी धरण्याचे प्रयत्न कुलगुरूंनी केल्याचा हा परिणाम असल्याचे आरोप झाले.
गेल्या महिन्यापासून जेएनयूमध्ये सुरू असलेले आंदोलन फीवाढीच्या विरोधात होते. विद्यापीठाने शैक्षणिक शुल्क, वाचनालय शुल्क, वसतिगृह भाडे या साऱ्यांमध्ये वाढ केली. तसे करताना ते परवडेल की नाही, याचाही विचार विद्यापीठ व मनुष्यबळ विकास मंत्रालयाने केला नाही. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शुल्कातही प्रचंड वाढ करताना महागाईचे कारण पुढे केले गेले. शिक्षणावर सरकारने खर्च करण्याऐवजी प्रचंड फीवाढ करण्याचा प्रयत्न सरकारच्या अंगाशी आला. मग फीवाढ काहीशी कमी करण्यात आली. पण विद्यार्थ्यांना ती मान्य नव्हती आणि जगदीश कुमार मात्र अडून राहिले. त्यांनी नोंदणी सुरू केली. त्यामुळे विद्यार्थी संतापले.
त्याचवेळी गुंड विद्यापीठात घुसले. विद्यार्थी संघाच्या अध्यक्षासह ३४ जण जखमी झाले. गुंड घुसल्यानंतर कुलगुरूंनी लगेच पोलिसांना पाचारण केले नाही, हाही आरोप आहे. जखमी विद्यार्थ्यांना भेटायलाही ते गेले नाहीत. कुलगुरूंकडून कोणत्याच अपेक्षा पूर्ण होत नाहीत, असे आता विद्यार्थ्यांबरोबर सरकार व भाजपमधील अनेक नेत्यांनाही वाटू लागले आहे. डाव्यांपुढे झुकायचे नाही, म्हणून जगदीश कुमार यांना कदाचित आता हटवण्यात येणार नाही. पण विद्यार्थ्यांचा सर्वाधिक राग असलेला कुलगुरू अशीच त्यांची नोंद झाल्यात जमा आहे.
(समूह वृत्त समन्वयक)