यूपीएससीत बिहारी टक्का का वाढतो आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 09:01 AM2022-06-07T09:01:27+5:302022-06-07T09:05:06+5:30

UPSC : आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या ‘बिमारू’ राज्य म्हणून ओळख असलेल्या बिहारमधील ‘टॅलेंट’ सध्या सगळ्यांनाच चकीत करत आहे !

Why Bihari percentage is increasing with UPSC? | यूपीएससीत बिहारी टक्का का वाढतो आहे?

यूपीएससीत बिहारी टक्का का वाढतो आहे?

Next

- नंदकिशोर पाटील
(संपादक, लोकमत, औरंगाबाद)

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यंदाही बिहारी विद्यार्थ्यांनी बाजी मारली. देशात दुसरी आलेली अंकिता अग्रवाल सध्या कोलकात्यात राहात असली, तरी ती मूळची बिहारी आहे. मधेपुरा जिल्ह्यातील बिहारगंज हे तिचे गाव. गतवर्षीचा ‘टॉपर’ शुभम कुमार हाही बिहारचा होता. अखिल भारतीय पातळीवर २२ वा आलेला अमन अग्रवाल तसेच अंशू प्रिया, शुभंकर पाठक, आशिष कुमार हे टॉप - १००मध्ये आलेले चौघेही बिहारी! यावर्षी यूपीएससीची परीक्षा उतीर्ण झालेल्या देशभरातील एकूण ६८५ विद्यार्थ्यांमध्ये पन्नास बिहारचे आहेत. त्यातही भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) दाखल होत असलेल्या १८० अधिकाऱ्यांमध्ये सोळा आणि आयपीएस झालेल्या दोनशे जणांमध्येही अकरा बिहारचेच ! हिंदी सिनेमा, ओटीटीवरील मालिका आणि वर्तमानपत्रातील बातम्यांमधून बिहारकडे बघणाऱ्यांसाठी हे आकडे चकीत करणारे आहेत.

केवळ यूपीएससीच नव्हे, तर आयआयटी, एआयआयएम, एनआयटी, बीट्स यासारख्या नामांकित शिक्षण संस्थांमध्ये बिहारी विद्यार्थ्यांचा टक्का वाढतो आहे. भारतीय प्रशासन सेवा असो की पोलीस प्रशासन, प्रत्येक दहा अधिकाऱ्यांमध्ये एकजण तरी बिहारी असतो. सीबीआय, ईडी, एनआयएसारख्या राष्ट्रीय तपास यंत्रणांमध्येही बिहारी अधिकारी अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावताना दिसतात. आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या ‘बिमारू’ राज्य म्हणून ओळख असलेल्या बिहारमधील हे ‘टॅलेंट’ आहे !

बिहारमधली सुमारे ५२ टक्के जनता निरक्षर आहे. चाळीस टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. वीस जिल्हे अत्यंत मागासलेले, तर तेरा जिल्हे पूरग्रस्त. ताज्या आकडेवारीनुसार, सुमारे ४५ लाख सुशिक्षित बिहारी युवक बेरोजगार. रस्ते, वीज, पाणी, दवाखाने आणि शाळांच्या बाबतीत तर सगळा अंधारच. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या संस्था बोटावर मोजण्याएवढ्या ! औद्योगिक मागासलेपण, सेवा उद्योेगांचा अभाव आणि त्यातून आलेली प्रचंड बेकारी हे आजच्या बिहारचे प्राक्तन आहे. रोजगाराच्या शोधात दरवर्षी सुमारे पाच लाख लोक बिहार सोडून दिल्ली, मुंबईसारख्या मोठ्या शहरात जातात.

बिहारमध्ये एकही मोठा उद्योग नाही. मुंबई, बंगळुरु, पुण्यात आयटी हब तयार झाल्याने महाराष्ट्र, कर्नाटकातील विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी आहेत. तामिळनाडू, केरळ, दिल्ली आणि राजस्थानचे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी अमेरिका, कॅनडा, रशियात जातात. यूपी, बिहारच्या विद्यार्थ्यांपुढे स्पर्धा परीक्षांखेरीज दुसरा पर्याय नाही. या राज्यातील युवकांना तसेही सरकारी नोकरीचे प्रचंड आकर्षण असते. राजकारणातील बाहुबली नेत्यांच्या मागे लागून आपल्या आयुष्याचे मातेरे करण्यात काही अर्थ नाही, हे आता इथल्या सुशिक्षित युवकांना कळून चुकले आहे. त्यामुळे बारावीची परीक्षा देऊन ते स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागतात. पाटण्यात जागोजागी कोचिंग क्लासेस उघडले गेले आहेत. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सरकारी अकादमी उघडली आहे.

या अकादमीचा रिझल्ट चांगला असतो. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, ते सरळ दिल्ली गाठतात. दरवर्षी सुमारे दोन लाख विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी दिल्लीत येतात. कमला मार्केट, मुखर्जी नगर, विश्वविद्यालय मेट्रो परिसरात कधी गेलात तर तिथे तुम्हाला ‘मिनी बिहार’ दिसून येईल. या भागाला ‘यूपीएससीची फॅक्टरी’ही म्हणतात ! ‘बिहारी’ हा शब्द उच्चारताच आपल्यासमोर जे चित्र उभे राहते, त्या कल्पनेला छेद देणारे हे वास्तव आहे. बिहारची नवी पिढी बदलत आहे. प्रतिकूलतेवर मात करून त्यांनी नवी वाट शोधली आहे. बिहारी युवकांची ही ‘सक्सेस स्टोरी’ अनेकांना प्रेरणा देणारी आहे.

Web Title: Why Bihari percentage is increasing with UPSC?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.