मुलांच्या आत्महत्यांचा दोष एकट्या आई-बाबांच्या माथी का मारता?

By धर्मराज हल्लाळे | Published: August 31, 2023 08:28 AM2023-08-31T08:28:19+5:302023-08-31T08:29:09+5:30

परीक्षा आणि अभ्यासाचा ताण असह्य होऊन आत्महत्या करणारी मुले हे केवळ त्या मुलांच्या पालकांचे नव्हे, तर अख्ख्या व्यवस्थेचेच अपयश आहे. 

Why blame the suicide of children on parents alone? | मुलांच्या आत्महत्यांचा दोष एकट्या आई-बाबांच्या माथी का मारता?

मुलांच्या आत्महत्यांचा दोष एकट्या आई-बाबांच्या माथी का मारता?

googlenewsNext

-धर्मराज हल्लाळे
(वृत्तसंपादक, लोकमत, लातूर)

स्वप्नांच्या ओझ्याखाली मुलांना गुदमरून टाकणारी ‘कोटा फॅक्टरी’ असे म्हणता  म्हणता समाज आत्मपरीक्षण करायचे सोडून थेट फक्त  आई-वडिलांनाच  दोषी ठरवत सुटला तर तो आत्मघात ठरेल. कोट्यामध्ये  मागील आठ महिन्यांत २३ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. स्वत:ची अर्धवट स्वप्ने मुलांच्या माथी मारण्यासाठी पालक स्पर्धा करीत आहेत, अशी टीकाही सुरू झाली. हे सर्व आणखी काही दिवस चालेल. पुन्हा जैसे थे! ज्या  कुटुंबातील मुलाने आपले जीवन संपविले आहे, त्यांच्यासाठी मात्र  दु:खाचा डोंगर आजन्म उभा राहतो. विद्यार्थी, शेतकरी, बेरोजगार असा कोणताही घटक अपयशाने, चिंतेने स्वत:ला संपवीत असेल तर दोष कोण्या एका-दोघांचा नक्कीच नाही.

कोटा येथे दरवर्षी देशभरातून दोन लाख विद्यार्थी ‘नीट’-‘जेईई’च्या तयारीसाठी जातात. मागील आठ वर्षांत कोट्यातील ११० विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. कमी-अधिक फरकाने देशात आणि राज्यात अशा घटना एका मागून एक घडतात. कधी आई-वडिलांची, कधी मुलांची, तर बऱ्याचदा समाजानं निर्माण केलेली हट्टाग्रही मानसिकता आत्महत्यांचे कारण ठरते. उत्तीर्ण होणे, ‘नीट’-‘जेईई’मधून उत्कृष्ट महाविद्यालयात प्रवेश मिळणे म्हणजेच यशस्वी होणे, हे समीकरण घातक आहे. 

बारावीनंतर ‘नीट’-‘जेईई’ची तयारी असो की, पदवीनंतरची स्पर्धा परीक्षा, सगळीकडे जीवघेणी स्पर्धा आणि तणाव आहेच. इतकेच नव्हे, नामांकित शाळेत प्रवेश मिळविणे हासुद्धा पालकांसाठी ताण-तणावाचा विषय आहे. त्यामुळे पालक सतत मुलांच्या पाठीशी असतात. बहुतांश आई-वडिलांकडून मुलांवर असणारा दबाव हा त्या मुलांच्या मानसिकतेला पेलला जाईल एवढाच असतो. काही अपवाद आहेत जिथे पालक चुकतात. कुठे थांबावे, त्यांना कळत नाही. अनेकदा विद्यार्थ्यांच्या स्वत:कडूनही अपेक्षा अवास्तव असतात. त्यांना स्वत:ची क्षमता आणि मर्यादा ओळखता येत नाही. त्याची सुरुवात आणि शेवट बारावीनंतर नव्हे, तर अगदी पहिल्या वर्गापासून होते. 

प्रवेश घ्यायचाय?- दे परीक्षा, शिष्यवृत्ती मिळवायचीय?-  दे परीक्षा. अमुक शाखा, विषयच, हवा आहे?- दाखव गुण. त्यातून पालकांना वाटणारी असुरक्षितता, मुलांचे भविष्य घडविण्याची घाई, यामुळे परीक्षा मुले देत असली, तरी अभ्यास जणू पालकच करीत असतात.. मुळात पालकत्व ही नैसर्गिक गोष्ट राहिली नाही, तर ती शिकण्याची बाब झाली आहे. एकत्र कुटुंबात आजी-आजोबा, मामा, काका ही नाती घट्ट होती. आता एकल वा आई-बाबा पालक असलेल्यांचीच शाळा भरविणे गरजेचे आहे. काय बरोबर आहे, काय चुकते आहे  हे त्यांना तरी कसे  कळणार? वेळ निघून गेल्यावर बऱ्याच जणांना मुलांच्या बाबतीत आपण चुकलो, असा पश्चात्ताप होतो.

घटना घडली की, चार दिवस चर्चेचे असतात. तसे न घडता उपाय योजले पाहिजेत. शाळा, महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस यातील बहुतेकांना मूल्य शिक्षणाचा विसर आहे. पालकांना पाल्यांसाठी गुण हवे आहेत. शाळा, कोचिंग क्लासेसला निकाल हवा आहे. तिथे मुलांच्या मानसिकतेचा विचार करायला वेळ आहे तरी कोणाला? त्यावर काही तरी धोरण ठरले पाहिजे. दोन महिने परीक्षा बंद करून काही साध्य होणार नाही आणि तो मार्गही नाही. पहिल्या वर्गापासून विद्यार्थ्यांना अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, हे भिंतीवर लिहून नव्हे, तर मनात रुजवून शिकवावे लागेल. अलीकडे उलट मूल ऐकतच नाही म्हणून आई-बाबा मानसोपचारतज्ज्ञांकडे येतात. प्रश्न अनेक आहेत. मुलांचे आई-बाबा अन् शिक्षकांशी नाते घट्ट करण्याची वेळ आहे. जो आत्महत्या करतो तो किमान काही दिवस आधी कोणाशी ना कोणाशी बोलतो, असे नव्वद टक्के प्रकरणांत सिद्ध झाले आहे. अशावेळी आई-बाबा, शिक्षक, मित्र, समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञ असे कोणीतरी त्याला भेटेल, ही व्यवस्था करावी लागेल.

Web Title: Why blame the suicide of children on parents alone?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.