विद्यापीठाला दादासाहेबांची अॅलर्जी का आहे ?
By गजानन जानभोर | Published: July 26, 2018 02:39 PM2018-07-26T14:39:27+5:302018-07-26T14:40:14+5:30
दादासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याने दादासाहेब लहान होणार नाहीत किंवा बहुजन समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा विसर समाजाला पडणार नाही.
नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू दादासाहेब काळमेघ यांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमासाठी नागपूर विद्यापीठाकडे जागा नाही. विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात केवळ विद्यापीठाचेच कार्यक्रम होतील, असा निर्णय विद्यापीठाने घेतला असल्याने दादासाहेबांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांच्या लेखी खासगी ठरला आहे. ज्या माणसाने नागपूर विद्यापीठाचा लौकिक साऱ्या देशात वाढवला, बहुजन समाजातील गरीब मुलांचे आयुष्य घडविले त्याच्या स्मृतिदिनासाठी सभागृह नाकारण्याचा निलाजरेपणा नागपूर विद्यापीठाने केला आहे. आपल्याच विद्यापीठाच्या दिवंगत कुलगुरूच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम हा खासगी कसा ठरतो? या प्रश्नाचे उत्तर कुलगुरू डॉ. काणेंकडे नाही. या कुलगुरूंना स्वत:चे मत नाही. त्यांच्यातील निर्णयक्षमता दुबळी आहे. कुणाच्या तरी हातचे ते बाहुले आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की ज्यांच्या कृपाशीर्वादाने ते कुलगुरू बनले आहेत, त्यांचे पांग फेडण्यातच त्यांचा संपूर्ण कार्यकाळ दुष्कारणी लागत आहे. नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नाव देताना त्यांच्या विचारांवर हे विद्यापीठ चालावे, ही समाजाची अपेक्षा होती. परंतु, राष्ट्रसंतांच्या जीवनकार्याला मारक ठरतील, असेच उपद््व्याप या विद्यापीठात रोज घडत असतात. काही माणसं विधायक कार्यातून प्रसिद्ध होतात. या विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. काणे मात्र वादग्रस्त निर्णयामुळे कुप्रसिद्ध होत आहेत.
व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयाकडे बोट दाखवून डॉ. काणेंनी दादासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या विद्यापीठातील कार्यक्रमाला परवानगी नाकारली. हा निर्णय घेताना स्वत:चा विवेक वापरण्याची सद््बुद्धी त्यांना सुचली नाही. दादासाहेबांच्या मनात बहुजन समाजाविषयी अपार कणव होती. या समाजाच्या उत्थानासाठी दादासाहेबांनी अनेक वाद, संकटे ओढवून घेतली. त्यांच्यावर आरोपही झाले. पण, त्याची पर्वा त्यांनी कधी केली नाही. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असताना त्यांनी केलेले लोकोत्तर कार्य अविस्मरणीय आहे. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या मुशीत त्यांचे व्यक्तिमत्त्व घडत गेले. भाऊसाहेबांमुळेच त्यांच्या शिक्षणाची वाट पुढे सुकर झाली. विद्यापीठातून लोकशिक्षण देण्यात यावे, हा त्यांचा आग्रह होता आणि त्या दिशेने त्यांनी कार्यही केले. एलआयटीत प्राध्यापक असताना त्यांनी शेकडो गरीब मुलांना मदत केली. त्यांच्या बंगल्यावर विद्यार्थ्यांची, ग्रामीण भागातून आलेल्या कार्यकर्त्यांची सदैव गर्दी दिसायची. ते कीर्तनकारही होते. कीर्तनाच्या माध्यमातून दलित, बहुजनांना जागे करण्याचे काम त्यांनी केले.
दादासाहेबांनी भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील शिवाजी शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात एकदा भेट दिली. महाविद्यालयात फेरफटका मारत असताना त्यांना प्रयोगशाळेत एक मुलगा दिसला. त्याची त्यांनी आपुलकीने चौकशी केली. तो एमएस्सी होता. त्याला लगेच प्राध्यापक म्हणून नियुक्त करा, असे आदेश दादासाहेबांनी दिले. आपल्याला मिळालेल्या अधिकारांचा उपयोग समाजासाठी व्हावा ही त्यांची तळमळ होती. कुलगुरू असताना नेमकी हीच कळकळ घेऊन त्यांनी नागपूर विद्यापीठाला लोकविद्यापीठाचे स्वरूप दिले. सध्याचे कुलगुरू डॉ. काणे नेमका हाच वारसा उलट्या दिशेने नेत आहेत. दादासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याने दादासाहेब लहान होणार नाहीत किंवा बहुजन समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा विसर समाजाला पडणार नाही. पण यानिमित्ताने डॉ. काणे आणि त्यांच्या सहकाºयांच्या खुज्या मानसिकतेचा प्रत्यय समाजाला आला आहे. या कुलगुरूंचा हा दळभद्री निर्णय ते ज्यांचा वारसा सांगतात, त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला तरी पटणारा आहे का? अशा द्वेषमुलक विचाराचा कुलगुरू या विद्यापीठाला कोणत्या दिशेने घेऊन जाईल?