कंगनाला ‘हिरो’ करण्याची काय गरज होती? मुंबईला ‘पीओके’ म्हणणे निंद्यच; पण...
By विजय दर्डा | Published: September 14, 2020 03:30 AM2020-09-14T03:30:38+5:302020-09-14T05:59:58+5:30
बाळासाहेबांचे निवासस्थान ‘मातोश्री’बद्दल साऱ्या मुंबईत प्रेम, आदराची भावना आहे तशीच भीतीही आहे आणि कंगनाच्या भाषेत बोलायचे तर त्या गर्वाच्या कंगनाने ठिक-या उडवल्या.
- विजय दर्डा
(चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)
कंगना रनौत प्रकरण ज्या प्रकारे तापले आणि तापवले गेले ते पाहून हैराणच व्हावे अशी स्थिती आहे. जिच्या अर्थशून्य, उनाड विधानांमुळे रण माजावे एवढी ती महत्त्वाची सामाजिक किंवा राजकीय सेलिब्रिटी आहे काय? मुंबई पोलीस आणि पाकव्याप्त काश्मीरसंबंधी ती जे बोलली, ते मलाही आवडले नाही, पण म्हणून तिच्या विधानांना इतकी हवा देणेही गरजेचे नव्हते. कंगना रनौत ही एक सिनेमातील नायिका आहे; पण तिच्याभोवती गुंफल्या गेलेल्या राजकारणाने मात्र तिला विनाकारण ‘हिरो’ करून टाकले.
बाळासाहेबांचे निवासस्थान ‘मातोश्री’बद्दल साऱ्या मुंबईत प्रेम, आदराची भावना आहे तशीच भीतीही आहे. आणि कंगनाच्या भाषेत बोलायचे तर त्या गर्वाच्या कंगनाने ठिक-या उडवल्या. मला दक्षिणेतील सिने अभिनेत्यांची आठवण झाली, जिथे एमजीआर, एनटीआर, करुणानिधी आणि जयललिता हे अभिनेते राजकीय हिरो झाले. कंगनाचे वैशिष्ट्य असे की बॉलिवूडमधल्या लोकांच्या स्टारडम पुढे ती झुकली नाही. न घाबरता, तडजोड न करता लढत राहिली. तिच्यात निर्भय वृत्ती आणि उत्साह आहे. जिथून रोजीरोटी मिळते, मानसन्मान मिळतो तिथल्यांशी संघर्ष करण्याची हिंमत तिने दाखवली. ‘उद्या माझे काय होईल’ याचा विचार न करता कंगना मुंबईच्या पुरुषप्रधान सिनेउद्योगाशी लढते आहे. बॉलिवूडमधल्या मोठमोठ्या नायक-नायिकांना अनेक प्रकारचे ‘समझोते’ करताना मी पहिले आहे. कंगना मात्र इंचभर मागे हटायला तयार नाही. आपल्या अटींवर ती काम घेते आणि निभावते. लोकमत पत्रसमूहाच्या ‘दीपोत्सव’ या दिवाळी अंकाला दिलेल्या विशेष मुलाखतीत ती म्हणाली होती, ‘मला भीती वाटत नाही. माझ्यात गुणवत्ता असेल, तर मला काम मिळेलच!’
- या हिमालायाच्या कन्येशी दोन हात करायला जाणे उचित नव्हते, हेच खरे. शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना तिच्याकडे दुर्लक्ष करण्याचा सल्लाही दिला होता; पण तोवर पुष्कळ पाणी वाहून गेले होते.
‘मुंबईत येऊन दाखव’ अशी धमकी कंगनाला दिली गेली. त्यावर उडालेल्या शब्दांच्या फुलबाज्यांनी कोरोनाकाळात लोकांचे मनोरंजन केले. कंगनाने मुंबईत लवकर परतण्याचा निर्णय घेतला. तशी द्वाही फिरवली. ज्या प्रकारे ती मुंबईत उतरली, विमानतळावरून बाहेर पडली त्यावेळचा तिचा रुबाब विलक्षणच होता. जणू एखादे सिनेमातले दृश्यच! कमांडोंच्या घेºयात महाराणीसारखी पावले टाकत ती आपल्या गाडीकडे गेली. कोणताही तणाव नाही, भीती नाही. घरी पोहोचली तर कार्यालयाचा काही भाग तुटलेला दिसला. मग कंगनाने पुन्हा तोंड उघडले आणि काश्मिरी पंडितांचा मुद्दा मांडला. ‘शिवसेना विरोधाचे प्रतीक’ म्हणून तिने स्वत:ची एक नवीच प्रतिमा उभी केली आहे, हे निश्चित!
शिवसेनेने कंगनाच्या विधानावर जी प्रतिक्रिया दिली त्याची काहीच गरज नव्हती. कंगना काय बोलली हे चार दिवसांनी कोणाला आठवलेही नसते. राजकारणात आणि विशेषत: सत्तारूढ पक्षाने विचारपूर्वक पावले टाकली पाहिजेत. एखाद्या क्रियेची काय प्रतिक्रिया होईल याचा अंदाज घेतला पाहिजे. पुष्कळ गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यातच शहाणपण असते. पण ते दाखवले गेले नाही, त्यातून उसळलेल्या प्रतिक्रियांनी कंगनाला सहानुभूतीच्या लाटेवर आरूढ केले. मग लोकांना समाजमाध्यमांवर सरकारला प्रश्न विचारायला निमित्तच मिळाले : १९९२ साली चार हजार अवैध इमारतींची यादी तयार झाली होती तिचे काय झाले? सगळ्या तोडून झाल्या का? शिवाय हजारोंच्या संख्येने जी छोटी-मोठी अवैध बांधकामे आहेत ती तोडली का?- असे नेमके प्रश्न विचारले गेले. वरून निष्कर्षही काढला गेला, की कंगना सरकारविरुद्ध बोलतेय म्हणून तिच्यावर कडक कारवाई केली गेली.
राजकारणात घटनांवर नजर नसेल तर तो नेता कसला? संधी मिळाली आणि दिल्लीने यात उडी घेतली. कंगनाच्या सुरक्षेसाठी ‘वाय’ सुरक्षेचे कमांडो पाठवले गेले. मुंबई दिल्लीत सुप्त लढाई चाललीच होती. ही नवी संधी मिळाली आणि कंगनाची फिल्म हिट झाली. सरकारची शाळा घेण्याची संधी राज्यपालांनाही मिळाली. एखादे अवैध बांधकाम तोडल्यावर राज्यपालांसारख्या उच्चपदस्थाने त्यात लक्ष घालावे, असे या आधी कधी घडल्याचे ऐकिवात नाही. भाजपने कंगनाच्या बेछूट विधानांवर टीका केली; पण तिचे कार्यालय तोडण्याला ‘सुडाची कारवाई’ म्हटले. तिकडे अयोध्येचे साधुसंतही कंगनाच्या समर्थनासाठी पुढे सरसावले आहेत.
आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी आणि हनुमान गढीचे महंत राजू दास यांनी इशारा देऊन टाकला आहे, की उद्धव ठाकरेंनी अयोध्येला येऊ नये. त्यांना विरोधाचा सामना करावा लागेल. काही असो, हे प्रकरण इतके तापवण्यात अर्थ नव्हता. शिवसेनेने मुंबईच्या चित्रपट उद्योगाला कायम साथ दिली आहे. दाऊद, छोटा राजन आणि रवि पुजारीसारख्या कुख्यातांनी पूर्ण चित्रपट उद्योगावर दहशत बसवली तेव्हा बाळासाहेब ठाकरेच मदतीला धावले होते. या दहशतीला लगाम घालण्याची शिकस्त त्यांनी केली. चित्रपट उद्योगातील बड्यांशी त्यांचे व्यक्तिगत आणि गाढ संबंध राहिले. उद्धव ठाकरेंनीही चित्रपट उद्योगाशी स्नेह राखला आहे, असे असताना एक हिरोईन शिवसेनेच्या विरोधाचे प्रतीक होते, याला काय म्हणावे?- प्रश्न गंभीर आहे. त्यावर विचार केला पाहिजे.