वाचनीय लेख - मोदींनी मोरारजी देसाईंचे नाव का वगळले?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 10:59 AM2023-09-28T10:59:16+5:302023-09-28T10:59:57+5:30

जुन्या संसद भवनातील भाषणात पंतप्रधान मोदी यांनी नेहरूंपासून डॉ. मनमोहन सिंह यांच्यापर्यंतच्या पंतप्रधानांचा गौरव करताना एक नाव का टाळले?

Why did Modi drop Morarji Desai's name? | वाचनीय लेख - मोदींनी मोरारजी देसाईंचे नाव का वगळले?

वाचनीय लेख - मोदींनी मोरारजी देसाईंचे नाव का वगळले?

googlenewsNext

हरिश गुप्ता

संसदेच्या जुन्या इमारतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेवटचे भाषण केले, त्यावेळी पंडित नेहरूंपासून डॉ. मनमोहन सिंह यांच्यापर्यंत सर्व माजी पंतप्रधानांचा उल्लेख केला. गेल्या ७५ वर्षांत या नेत्यांनी देशाला काय योगदान दिले, हे त्यांनी सांगितले. परंतु १९७७ ते ७९ या कालखंडात मोरारजी देसाई पंतप्रधान होते, त्यांचा साधा उल्लेखही मोदी यांनी आपल्या दीर्घ भाषणात केला नाही. पंतप्रधान झाल्यानंतर सभागृहात बहुमत चाचणीला सामोरे न गेलेल्या चरणसिंह यांचाही त्यांनी उल्लेख केला; परंतु मोदींच्या भाषणात कोठेही मोरारजी देसाई हे नाव आले नाही. १९५० च्या दशकाच्या प्रारंभी मोरारजी देसाई महाराष्ट्र आणि गुजरात अशा संयुक्त प्रांताचे मुख्यमंत्री होते. सूरतचे खासदार म्हणून ते लोकसभेत निवडून आले. मोदी यांनी मात्र जणू मोरारजी कधी पंतप्रधान नव्हतेच अशा रीतीने त्यांचे नाव वगळले. मोदींचे भाषण लक्षपूर्वक ऐकणाऱ्यांना हे चांगलेच खटकले. पंतप्रधानांनी असे का केले असावे?

नरेंद्र मोदी नेहमीच तोलून मापून बोलत असतात. देशाच्या पहिल्या पंतप्रधानांबद्दल त्यांच्या मनातली अप्रीती एरवी लपून राहत नाही, तरीही त्यांनी आपल्या भाषणात नेहरूंचा गौरवाने उल्लेख केला. मोरारजी तर मोदींच्या घरच्या राज्यातले म्हणजे गुजरातमधले होते. शिवाय १९७७ साली जनता पक्षाच्या सरकारमध्ये मोदी यांचा  पक्ष सामील होता. तरीही मोदींकडून मोरारजींचे नाव न घेतले जाणे जास्तच आश्चर्यकारक ठरले. १९५६ मध्ये मोरारजी देसाईंनी गुजरात राज्याच्या निर्मितीला विरोध केला होता, हे त्याचे कारण असेल काय? मुंबई गुजरातला देण्यास विरोध करणाऱ्यांवर गोळीबार करण्याचा आदेश त्यांनी दिला होता. त्यात १०५ लोकांचा बळी गेला हे तर त्यामागचे कारण नव्हते? - मोदी यांनी असे का केले? याचे रहस्य येत्या काळात उलगडेलच.
इंदिरा गांधींचा प्रभाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी एरवी नेहरू, गांधी कुटुंबातील सदस्यांवर संधी मिळेल तेथे तुटून पडत असतात. परंतु दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविषयी त्यांनी चकार शब्द काढलेला नाही. जुन्या संसद भवनात १८ सप्टेंबरला अखेरचे भाषण करतानाही मोदी यांनी इंदिराजींवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. इंदिरा गांधींनी मार्च १९८३ मध्ये ‘नाम’ म्हणजेच अलिप्ततावादी देशांचे शिखर संमेलन घेतले; त्यांच्या यशाबद्दल बोलताना मोदी म्हणाले,  “जेंव्हा ‘नाम’ शिखर बैठक झाली तेंव्हा या सभागृहाने एकमताने ठराव संमत केला आणि त्या प्रयत्नांची प्रशंसा केली. आताही तुम्ही ‘जी२०’ बैठकीच्या सफलतेला एकमुखाने मान्यता दिली आहे. आपण देशाची मान उंचावली आहे, असे मला वाटते!” 

इंदिरा गांधी यांच्या बाबतीत नरेंद्र मोदी मवाळ भूमिका का घेतात, याविषयी राजकीय विश्लेषकांना नेहमीच आश्चर्य वाटत आले आहे. इंदिराजींच्या आचरणातून कदाचित मोदी यांना मार्गदर्शन मिळत असावे. २०१९ साली बालाकोटवर हल्ला करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. इंदिराजीही असेच धडाकेबाज निर्णय घेत असत. ‘रॉ ची स्थापना करणारे आर. एन. काव यांच्यासारखे सुपरकॉप इंदिराजींकडे होते. तर मोदींकडेही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या रूपाने तसेच अधिकारी आहेत. 

‘रॉ’ची नस 

१९६२ साली चीनबरोबरच्या युद्धात पराभव स्वीकारावा लागल्यावर इंदिरा गांधी यांनी १९६८ साली रिसर्च अँड ॲनालिसिस विंग तथा ‘रॉ’ ची स्थापना केली. परदेशात हेरगिरी करणारी ही देशाची पहिली संस्था. मात्र भारताचा पारंपरिक शत्रू असलेल्या पाकिस्तानवर ‘रॉ’चे लक्ष केंद्रित झाले, त्याचे कारण पाकिस्तान इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स तथा आयएसआय ही हेर संस्था. रॉने पाकिस्तानात अनेक कारवाया यशस्वी केल्या. पाकिस्तानला अस्थिर करण्याचे प्रयत्न ‘रॉ’ करत आहे, असे इस्लामाबाद नेहमीच म्हणत आले. पाकिस्तानच्या अफगाण सीमेवरील बलुचिस्तान प्रांतात फुटीरतावाद्यांना शस्त्र पुरवणे आणि प्रशिक्षण देण्याचे कामही ‘रॉ’ करते, असा पाकिस्तानचा आरोप. तर काबुलमधील भारतीय वकिलातीमध्ये जुलै २००८ मध्ये बॉम्बस्फोट घडवून आणल्याचा आरोप रॉने आयएसआयवर केला होता.
२०० अधिकारी आणि सुमारे ४ लाख डॉलर्स एवढ्या सामुग्रीवर सुरू झालेल्या रॉ ने नंतर लक्षणीय प्रगती केली. रॉ वर नेमका किती खर्च होतो हे गुलदस्त्यात राहिले आहे. ‘रॉ’कडे सुमारे आठ ते दहा हजार अधिकारी असून संस्थेला मुबलक पैसा मिळतो, असे ‘फेडरेशन ऑफ अमेरिकन सायन्टिस्ट’ या संस्थेने म्हटले आहे. 

अमेरिकेची सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी सीआयए किंवा ब्रिटनची एम १६ या गुप्तचर संस्था संरक्षण मंत्रालयाला अहवाल देतात; तर रॉ थेट पंतप्रधानांकडे जाते. सप्टेंबरच्या प्रारंभी पाकव्याप्त काश्मीरमधील रावलकोटमध्ये लष्कर ए तोयबाच्या रियाज अहमद नावाच्या दहशतवाद्याची हत्या झाली; अन्य काही दहशतवादी मारले गेले, यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. खलिस्तानवादी दहशतवादी हरमीतसिंग निज्जर याची कॅनडात हत्या झाली. अन्यत्रही काही दहशतवादी मारले गेले.  या हत्यांचा संबंध ‘रॉ’शी जोडला जात असला तरी तसे सबळ पुरावे पुढे आलेले नाहीत.
१९७७ साली मोरारजी देसाई यांनी ‘रॉ’च्या परदेशातील कारवाया गुंडाळल्या होत्या. यामुळेही मोदींच्या मनात त्यांच्याबद्दल अढी असू शकते.  मोरारजीनी जे केले तेच १९९७ साली पंतप्रधान असताना इंद्रकुमार गुजराल यांनीही केले. त्यांचेही नाव मोदींनी आपल्या भाषणात घेतले नाही, हे मुद्दाम नमूद करावे असे!

(लेखक लोकमत नवी दिल्लीत नॅशनल एडिटर, आहेत)

Web Title: Why did Modi drop Morarji Desai's name?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.