अमेरिकी सैनिक पाकिस्तानात का थांबले?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 06:27 AM2021-09-06T06:27:30+5:302021-09-06T06:28:12+5:30

अफगाणिस्तानातून निघालेली अमेरिकी सैन्याची एक तुकडी पाकिस्तानात थांबली आहे. इस्लामाबादेत बसून अमेरिकी सैनिक काय करत आहेत?

Why did US troops stay in Pakistan? | अमेरिकी सैनिक पाकिस्तानात का थांबले?

अमेरिकी सैनिक पाकिस्तानात का थांबले?

googlenewsNext
ठळक मुद्देअमेरिकन सैनिक जास्त काळ पाकिस्तानात थांबणार नाहीत, असे रशीद सांगत असले तरी मुळात अमेरिकेला न परतता ते येथे आलेच का? ते अचानक आले की,  तसे आधी ठरले होते, हाही मुद्दा आहे.  

विजय दर्डा

ठरलेल्या वेळेच्या आधीच अमेरिकी सैन्याच्या शेवटच्या तुकडीने काबूल सोडले तेव्हा ते मायदेशी जात आहेत, असेच सर्वांना वाटले होते; पण ही विमाने इस्लामाबादेत उतरलेली जगाने थोड्याच वेळात पाहिली. इस्लामाबाद विमानतळ आणि तिथले  सेरेना हॉटेल यांची छायाचित्रे समाजमाध्यमांवर फिरू लागली. अमेरिकन सैनिकांची एक तुकडी या हॉटेलात थांबली आहे. हे सैनिक पाकिस्तानात कसे, असा स्वाभाविक प्रश्न मग विचारला जाऊ लागला. पाकिस्तानचे अंतर्गत व्यवहारमंत्री शेख रशीद यांनी आधी साफ इन्कार केला. नंतर सांगितले की तीन ते चार आठवड्यांच्या व्हिसावर हे सैनिक येथे आले आहेत; पण पाकिस्तानच्या आकाशात चिनूक  हेलिकॉप्टर्स का घिरट्या घालत आहेत, याचे उत्तर मात्र त्यांच्याकडे नव्हते.

अमेरिकन सैनिक जास्त काळ पाकिस्तानात थांबणार नाहीत, असे रशीद सांगत असले तरी मुळात अमेरिकेला न परतता ते येथे आलेच का? ते अचानक आले की,  तसे आधी ठरले होते, हाही मुद्दा आहे.  पाकिस्तान काही म्हणो, अफगाणिस्तान सोडल्यावर सैनिक जवळ कुठेतरी थांबतील, जेणेकरून अफगाणिस्तानावर लक्ष ठेवता येईल हे जवळपास तीन महिने आधी ठरले होते. याविषयी शेजारी देशांशी बोलणी चालू असल्याचे कमांडर ऑफ सेन्ट्रल कमांड जनरल केनिथ मेसेंजर यांनी खूप आधी सांगितले होते. त्याच वेळी अमेरिकेचे प्रभारी उपसंरक्षणमंत्री डेविड हेल्वी यांनी ‘आम्ही इस्लामिक स्टेटसारख्या संघटनांवर लक्ष ठेवण्यासाठी सैन्याची जागा बदलत आहोत’, असे स्पष्ट केले. या संघटनांना अमेरिकेवर हल्ला करता येऊ नये हा हेतू त्यामागे होता.  - त्याच वेळी, अमेरिकेचा पुढला मुक्काम पाकिस्तान असेल, अशी चर्चा होऊ लागली होती. तसे पाहता अफगाणिस्तानच्या सीमा पाकिस्तानव्यतिरिक्त इराण, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, ताजिकिस्तान आणि चीनशीही जोडलेल्या आहेत. इराण आणि चीनमध्ये अमेरिकेला जागा मिळू शकणार नाही. तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तान रशियाच्या जवळ असल्याने रशियन हेरांचे जाळे तेथे पसरलेले असणार. त्यामुळे अमेरिकेसाठी पाकिस्तान हाच स्वाभाविक पर्याय होता. आपल्या हवाई क्षेत्राच्या वापराची परवानगी पाकने अमेरिकेला आधीच दिलेली आहे. बलुचिस्तानच्या नसिराबादमध्ये तयार होत असलेल्या हवाई तळाला अमेरिकाच पैसे पुरवत असल्याचेही यापूर्वी समोर आले आहे. या तळावरून अफगाणिस्तानवर नजर ठेवणे सोपे जाणार आहे. अफगाणिस्तान सोडला तरी अमेरिकेचे मोठे शत्रू इस्लामिक स्टेट आणि अल कायदा तेथे मौजूद आहेत; त्यांच्यावर हल्ला करायचा तर अमेरिकेला पाकची जमीन आवश्यकच होती. आता  चीनशी जवळीक करण्याच्या प्रयत्नातला पाकिस्तान अमेरिकेला जागा का देईल? - असा प्रश्न पडू शकेल; पण मोठ्या कूटनीतीत कोणी कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो. प्रत्येक जण आपापल्या हितानुसार निर्णय घेतोल, तसेच दुर्बलाचा उपयोग सगळ्यांनाच करायचा असतो आणि दुर्बलही सगळ्यांच्या लग्नाला जायला उतावीळ असतोच. पाकिस्तान कमजोर असेल तर तो चीनच्या वरातीत जाईल आणि अमेरिकेच्याही वरातीत नाचेल. 

अर्थात, पाकिस्तानने अमेरिकन सैन्यासाठी दरवाजे उघडण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हे. जनरल अयुबखान यांनी १९५९ मध्ये पेशावर विमानतळ वापरण्याची परवानगी अमेरिकेला दिली होती. ज्याचा उपयोग सोव्हिएत रशियावर पाळत ठेवण्यासाठी केला गेला. जनरल मुशर्रफ यांनी अमेरिकेला पाकिस्तानची पाच विमानतळे वापरू दिली. तेथून त्या देशाने अफगाणिस्तानवर नियंत्रण ठेवले. अमेरिकन एलिट फोर्सची तुकडी गुप्तपणे पाकिस्तानात असल्याचीही माहिती २०१० मध्ये उघड झाली होती. सीआयएचे जाळेही तेथे पसरलेले होते. या पाकिस्तानी मदतीमुळेच अमेरिका ओसामा बिन लादेनचा खात्मा करू शकली. सध्या पाकिस्तानी नेते चीनचे गुणवर्णन करत असले तरी वास्तवात पाकिस्तानी सैन्याचे जनरल नेहमीच अमेरिकेच्या बाजूचे राहिले आहेत. या अधिकाऱ्यांची संपत्ती अमेरिकेत आहे. शिवाय त्यांची मुलेही तेथे शिकतात. चीनशी अशी चालबाजी करता येणार नाही. कारण तोच मोठा चालबाज आहे. अमेरिका फुकटात बरेच काही देईल; पण कपटी चीन मात्र बरेच काही गहाण ठेवून घेईल.

चीन-पाकिस्तान कॉरिडॉरचे उदाहरण पाहा. दोन वर्षांपासून या प्रकल्पाचे काम थांबले आहे. कारण चीनला आता त्यात काही फायदा दिसत नाही. अफगाणिस्तानात जम बसला तर ते काम पुन्हा सुरू होईल; पण चीनने अफगाणिस्तानात पाय रोवावेत हे अमेरिका सहन करणार नाही. त्यासाठी पाकिस्तानला मुठीत ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. पाकिस्तान सध्या भिकेला लागलेला, पैशाला भुकेला देश आहे. अमेरिकेने तुकडा टाकला तर तो त्या देशाच्या मांडीवर जाऊन बसायला वेळ घालवणार नाही. पाकिस्तानवर अमेरिकेचे जुने कर्जच इतके आहे की परतफेड अशक्य आहे. त्यावर या देशाला नवे कर्ज हवे असेल तर अमेरिका आपल्या पोळीवर तूप ओढणारच. सद्य:स्थितीत पाकिस्तानला अमेरिका काही सवलतीही देऊ शकते. ट्रम्प यांनी ३०० दशलक्ष डॉलर्सची मदत रोखली होती. ती पुन्हा खुली होऊ शकते. आणि हो, अफगाणिस्तातून निघताना अमेरिकेची इतकी निर्भर्त्सना झाली आहे की, या इलाख्यात सैन्य ठेवून इस्लामिक स्टेटवर हल्ला करण्याची संधी अमेरिका जिवंत ठेवणार, हे उघडच आहे. वेळ पडल्यास ‘आम्ही अफगाणिस्तान सोडले आहे, मैदान सोडलेले नाही,’ असेही अमेरिका म्हणू शकते. भारतापुरते बोलायचे तर आपल्याला ‘वाट पाहा, काय काय होतेय ते बघा’ हीच नीती अवलंबावी लागणार आहे. अफगाणिस्तानात सत्ता स्थापन करण्यासाठी तालिबान, हक्कानी गट आणि इतरांमध्ये जोरदार लठ्ठालठ्ठी चालू आहे. परिस्थिती इतकी वेगाने बदलतेय की, उंट आता कुठल्या बाजूने कूस बदलील, याबद्दल आताच काही सांगणे कठीण आहे.

(लेखक लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आहेत) 

 

Web Title: Why did US troops stay in Pakistan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.