ढोंगी लोकांच्या भुलाव्याला आपण का फसत गेलो?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 07:51 AM2024-10-30T07:51:03+5:302024-10-30T07:54:54+5:30
भारताची भाषा आणि संस्कारानुसार समाजाला सुधारणारी संतपरंपरा समाजातून गायब का झाली? - त्याचे खरे कारण आधुनिकता आहे.
- योगेंद्र यादव
(अध्यक्ष, स्वराज इंडिया; सदस्य, जय किसान आंदोलन)
भारताची संत परंपरा कोठे अदृश्य झाली आहे? - महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील मोझरी गावात स्थापना झालेल्या श्री गुरुदेव आध्यात्मिक गुरुकुंजमध्ये हा प्रश्न माझ्या मनात आला. संध्याकाळ उलटली होती. चहू बाजूला ग्रामीण मेळ्याचे वातावरण होते. खुल्या आकाशाखाली मुले, वृद्ध महिलांसह हजारो गावकरी भजन कीर्तन ऐकत होते. तेथे आत्मा, परमात्मा, पाप, पुण्य, स्वर्ग-नरक यावर बोलणे चाललेले नव्हते; तर ग्रामनिर्माण, आरोग्य, शेती आणि लोकशाहीतील नागरिकांची जबाबदारी अशा विषयांवर भाषणे चालली होती. भजनसुद्धा अंधविश्वासाचे खंडन करणारे होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५६व्या निर्वाण दिनानिमित्त ‘ग्रामगीता तत्वज्ञान आचार्य महायज्ञ’ तेथे संपन्न होत होता.
संत परंपरेने भारत देश घडवला, वाचवला आणि जोडून ठेवला, जिवंत राखला. रामानुजाचार्य असोत वा बसवाचार्य, नानक असोत वा कबीर, रविदास किंवा घासीदास, मीराबाई किंवा लाल देद, मोइनुद्दिन चिश्ती किंवा बाबा फरीद, देशाच्या वेगवेगळ्या भागात या संतांनी देशाचा आत्मा जिवंत राखला. राजकीय उलथापालथीच्या काळात समाज बांधून ठेवला. हा देश राज्यकर्त्यांच्या भाषणांनी नव्हे तर संतांच्या भजनांनी बांधून ठेवला आहे. यासंदर्भात महाराष्ट्रातील संतांची परंपरा अनोखी ठरते. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव, जनाबाई, शेख मोहम्मद, गोरा कुंभार आणि रोहिदासाच्या परंपरेने वर्षानुवर्षे या प्रदेशाची संस्कृती मुखर केली. एकोणिसाव्या शतकातही इंग्रज राजवटीला विरोध करण्यात संतांचे मोठे योगदान होते. परंतु, विसावे शतक येता येता ही परंपरा लुप्तप्राय होत गेली. असे का झाले?
तुकडोजी महाराजांच्या पवित्र भूमीत पोहचल्यानंतर हा प्रश्न मनात येणे स्वाभाविक होते. कारण विसाव्या शतकातील ते एक अपवाद होते. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात एका गरीब शिंपी कुटुंबात १९०९ मध्ये त्यांचा जन्म झाला. औपचारिक शिक्षण नसल्यासारखेच होते. परंतु, लहानपणीच भजनाची आवड लागली. घर सोडून जंगलात राहिले. साधू होऊन परत आले. परंतु, ते विभूती किंवा चमत्कारवाले साधू नव्हेत तर अंधविश्वासाचा भेद करणारे, समाजाच्या सुधारणेसाठी जनजागरण करणारे साधू होते. ते मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये भजने लिहीत. खंजिरी वाजवत आणि खऱ्या गोष्टी सांगत. महात्मा गांधींनी सेवाग्राममध्ये बोलावून त्यांची भजने ऐकली. तुकडोजी महाराजांनी ‘भारत छोडो’ आंदोलनात भाग घेतला, तुरुंगात गेले. स्वातंत्र्यानंतर विनोबा भावे यांच्या आग्रहावरून भूदान चळवळीत भाग घेतला. परंतु, ते कधीही गांधीवादी झाले नाहीत. कुठल्याही पक्षाशी त्यांनी स्वतःला जोडून घेतले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगेबाबा यांच्याशी त्यांचे स्नेहपूर्ण नाते होते. तुकडोजी महाराजांनी महाराष्ट्रातील गावागावात फिरून स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी, आदर्श गाव उभे करण्यासाठी मोहिमा चालविण्यात आपला जास्तीत जास्त वेळ घालवला.
हेच विचार एकत्र करून त्यांनी ग्रामगीता लिहिली. जातीव्यवस्थेमधील उच्च - नीचतेविरूद्ध मोहीम चालवली. हिंदू मुसलमानांमधील भेदभावाचा विरोध केला. मूर्तिपूजा आणि कर्मकांडापासून दूर राहत मातीशी जोडलेल्या परमेश्वराची भक्ती करण्याची प्रेरणा त्यांनी दिली. अंतिम संस्काराची एक नवी पद्धत त्यांनी सूचवली. जपानमध्ये विश्वधर्म विश्वशांती परिषदेला ते गेले आणि ‘भारत साधू समाजा’ची स्थापना केली. भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद तुकडोजी महाराजांची भजने ऐकून इतके भारावून गेले की, त्यांनी त्यांना राष्ट्रपती भवनात बोलावून ‘राष्ट्रसंत’ ही उपाधी दिली. १९६८मध्ये त्यांचे निधन झाले. आजही त्यांची वैचारिक परंपरा मानणारे गट त्यांच्या स्मरणार्थ अंधश्रद्धा निर्मूलन, पुस्तक आणि शिक्षण यांच्या प्रचारासाठी तसेच शेती, शेतकरी यांच्या सशक्तीकरणासाठी चळवळी चालवतात. सर्वधर्म प्रार्थना आयोजित करतात. त्यांच्या स्मरणार्थ होत असलेल्या भजनात तल्लीन झालेली जनता पाहून मला गेल्या वर्षी कबीर गायक प्रल्हाद टिपाणीया यांच्या सभा आठवल्या. मध्य प्रदेशातील ग्रामीण भागात त्यांची भजने आणि सरळ, तिखट बोलणे ऐकण्यासाठी भर थंडीत हजारो गावकरी बसून राहिलेले मी पाहिले. हीच गोष्ट नेते आणि सामाजिक कार्यकर्ते सांगतात तेंव्हा त्यांना श्रोते पकडून आणावे लागतात.
भारताची भाषा, म्हणी आणि संस्कारानुसार समाजाला सुधारणारी ही संतांची परंपरा आपल्या समाजातून गायब का झाली? - ही परंपरा खंडित होण्याचे खरे कारण आधुनिकता आहे. इंग्रजी राजवट आल्यानंतर समाजसुधारणा आणि परिवर्तनाच्या काळजीने आधुनिक राजकीय विचारधारेची भाषा धारण केली. समाज परिवर्तनाच्या मुख्य कार्यक्षेत्रात सामाजिकतेची जागा राजकारणाने घेतली. समाजसुधारक, साधू, संत यांच्याऐवजी आधुनिक क्रांतिकारक समाज बदलण्याची जबाबदारी घ्यायला पुढे आले. यामागे नक्कीच आपल्या समाजाचा कमकुवतपणा असणार. समाजात एक अंगभूत संस्कार क्षमता होती, ती क्षीण झाली. कदाचित जाती व्यवस्थेमुळे समाज गलितगात्र झालेला होता, त्याचाही परिणाम असेल. काही असो, आधुनिकता आल्यानंतर संत परंपरा लुप्त झाल्यामुळे धर्म, समाज आणि राजकारण सगळ्यांचेच नुकसान झाले आहे. धर्माच्या नावाने संतांची वस्त्रे घालून ढोंगी आणि पाखंडी बाबालोक आपले साम्राज्य पसरवत गेले. समाज परिवर्तनाचा विचार कमजोर झाला. सुधारणांचे प्रयत्न जातीपातीत अडकून पडले आणि राजकारण फोफावले. धर्म, समाज आणि राजकारणाला जोडण्यासाठी आधुनिक राजकीय साधूंची जमात उभी करणे राष्ट्रनिर्माणासाठी आवश्यक आहे.