सगळे नेते राज ठाकरेंच्या भेटीसाठी का जातात..?
By अतुल कुलकर्णी | Published: September 5, 2022 10:18 AM2022-09-05T10:18:16+5:302022-09-05T10:21:41+5:30
राज यांना गेल्या काही महिन्यांत भेटीसाठी कोणते नेते गेले याची यादी केली तर तीच भली मोठी होईल.
अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई -
२०१७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला ३०.४१% मतं मिळाली होती तर भाजपला २८.२८%. या पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. शिवसेनेची ही मतं शिंदे गटाकडे गेली नाहीत तर ती किमान राज ठाकरे यांच्या मनसेकडे तरी जावीत, यासाठी राजकीय नियोजन सुरू झाले आहे. राज यांना वारंवार वेगवेगळ्या नेत्यांनी भेट देण्याने त्यांचे वेगळे महत्त्व अधोरेखित करायचे, त्याचवेळी उद्धव ठाकरे कुठेही चर्चेतच येऊ नयेत, अशा रणनीतीची शक्यताही पुढे येत आहे.
उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसराज ठाकरे यांच्या भेटीला गेले, तेव्हा त्यांच्या मातोश्रींनी फडणवीस यांचे औक्षण केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणपतीच्या निमित्ताने राज ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांच्या मातोश्रींना नमस्कार करून आले. भाजपचे मुंबईचे माजी अध्यक्ष आणि कॅबिनेटमंत्री मंगल प्रभात लोढा मंत्री झाल्यानंतर राज ठाकरे यांना भेटून आले. राज यांना गेल्या काही महिन्यांत भेटीसाठी कोणते नेते गेले याची यादी केली तर तीच भली मोठी होईल.
एक नगरसेवक आणि एक आमदार असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज यांच्या भेटीला गेले काही दिवस भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे नेते का जात आहेत..? हा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडलेला आहे. याचे उत्तर गणितीय पद्धतीने मिळणार नाही त्यासाठी गेल्या दोन-अडीच वर्षांत घडलेला घटनाक्रम आणि सध्याची राजकीय परिस्थिती, गेल्या काही महिन्यांतील घटनाक्रमाची सांगड घालत जावे लागेल. शिवाय राज आणि उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचाही शोध घ्यावा लागेल.
भाजपला कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरे वगळता शिवसेना स्वतःच्या ताब्यात हवी आहे. हे करताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सहानुभूती मिळणार नाही, याची काळजी भाजपला आहे. एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेंपासून बाजूला करण्यात हीच खेळी खेळली गेली. तुम्ही परत या. समोरासमोर बसून आपण चर्चा करू, असे उद्धव ठाकरे यांनी केलेले आवाहन एकनाथ शिंदे यांना देऊ केलेले मुख्यमंत्रिपद, उद्धव ठाकरे यांच्या उपलब्ध न होण्याचे दिले गेलेले असंख्य दाखले, ही सर्व पार्श्वभूमी महाराष्ट्राला ज्ञात आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा कणा पूर्णपणे मोडून काढायचा असेल तर ‘काट्याने काटा काढायचा’ या न्यायाने राज ठाकरे यांना पुढे करणे ही एक शक्यता आहे. भाजपने उद्धव ठाकरे यांना दगा दिला; असे ज्यांना वाटते, पण ज्यांची निष्ठा ठाकरे या नावासोबत आहे, त्यांच्यापुढे राज ठाकरे हा पर्याय म्हणून उभा करायचा ही दुसरी शक्यता त्यात आहे. जो मतदार उद्धव ठाकरे यांना सोडून जाईल तो राज ठाकरेंकडे येईल, अशी राजकीय मांडणी पडद्यामागे केली जात आहे. राज ठाकरे यांचे काही प्लस पॉईंट आहेत, जे अन्य कोणत्याही नेत्यांकडे नाहीत. उद्धव ठाकरे यांच्यावर टोकाची आणि कठोर टीका करण्याची क्षमता फक्त राज ठाकरे यांच्यामध्ये आहे. बाळासाहेबांनंतर शिवसेनेचे नेतृत्व राज ठाकरे यांनी करावे, असे सातत्याने सांगणारा एक मोठा वर्ग आहे. राज आणि उद्धव यांनी एकत्र यावे. एकनाथ शिंदे आणि भाजपला सडेतोड उत्तर द्यावे, असा आवाज आता हळूहळू पुन्हा नव्याने ऐकायला येत आहे. तशी शक्यता अत्यंत धूसर आहे, तरीही असे झाले तर मुंबई महापालिका निवडणुकीत त्याचे मोठे नुकसान शिंदे गटाला आणि भाजपला होऊ शकते. म्हणून उद्धव आणि राज यांनी कोणत्याही परिस्थितीत एकत्र येऊ नये ही एक छोटी शक्यता यामागे आहे. राज आणि उद्धव यांनी एकत्र न येता, पडद्याआड जागा वाटपात तडजोडी करू नयेत, हा हेतू आता उघडपणे बोलला जात आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मुंबईवर ठाकरे या नावाचे असणारे गारुड, असे एका रात्रीतून कमी होणारे नाही. त्यामुळे एक तरी ठाकरे आपल्यासोबत असलाच पाहिजे, या हेतूने सध्या राजकीय नेत्यांच्या ‘शिवतीर्था’वर चकरा वाढल्या आहेत.
गेल्या काही दिवसांतला राजकीय घटनाक्रम पाहिला तर राजभेटीचे ‘राज’ समजण्यास मदत होईल. शिवसेना भवन कोणाचे? असा विषय सुरू झाला तेव्हा वेगळे सेना भवन शिंदे गट उभे करणार, अशा बातम्या आल्या. त्यावेळी राज ठाकरे यांनी वारसा विचारांचा असतो-वास्तूचा नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती.
एकनाथ शिंदे यांनी आपण हिंदुत्वाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडीतून बाहेर पडलो, असे सांगताना बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि हिंदुत्वाचा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे, असे विधान केले होते. राज ठाकरे यांनी मनसेची सदस्य नोंदणी सुरू करताना ‘हिंदवी रक्षक महाराष्ट्र सेवक’, अशी घोषणा दिली. नाथ शिंदे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांचा मनसे दोघांचेही दोघांनीही हिंदुत्वाला घातलेली साद पुरेशी बोलकी आहे. एकनाथ शिंदे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असताना आनंद दिघे यांच्यावरील ‘धर्मवीर’ चित्रपट आला होता. त्या चित्रपटात एका दृश्यात राज ठाकरे आनंद दिघे यांना भेटायला जातात, असा प्रसंग जाणीवपूर्वक कापला गेल्याची टीका मनसेने केली होती. मात्र अशा टीका वेळेनुरूप विसरायच्या असतात, एवढा राजकीय शहाणपणा या दोन्ही पक्षांकडे आहे.
हे सगळे संदर्भ आणि पार्श्वभूमी पाहिली तर शिवसेनेचे नेते आणि सध्या एकनाथ शिंदे गटात सामील झालेल्या सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया बोलकी आहे. दरवर्षी शिवाजी पार्क सभेसाठी आरक्षित करण्यासाठी ते स्वतः पत्र देतात. यावेळी त्यांच्या मते या दसरा मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आले तर आश्चर्य वाटून घेऊ नका, असे विधान त्यांनी केले आहे. यापेक्षा वेगळे काय सांगायला हवे.