सिगारेट कंपन्या का सांगताहेत, सिगारेट सोडा?; विश्वास बसत नाही ना, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 07:10 AM2021-07-29T07:10:30+5:302021-07-29T07:11:10+5:30

एकेकाळी जेव्हा सिगारेटबंदीवर सगळीकडेच जोर पकडला होता, त्या वेळी या कंपनीनं त्याविरुद्ध जबरदस्त मोहीम आखली होती आणि लोकांना सिगारेट स्टाइल्स शिकवत होती.

Why do cigarette companies say quit cigarettes ?; Can't believe it, but ... | सिगारेट कंपन्या का सांगताहेत, सिगारेट सोडा?; विश्वास बसत नाही ना, पण...

सिगारेट कंपन्या का सांगताहेत, सिगारेट सोडा?; विश्वास बसत नाही ना, पण...

googlenewsNext

मद्य तयार करणाऱ्या कंपन्या अचानक एके दिवशी लोकांना सांगू लागल्या, दारू पिणं वाईट आहे, दारू सोडून द्या.. गुटख्याच्या पुड्या तयार करणाऱ्या कंपन्या अचानक सांगू लागल्या, पुड्या खाऊ नका, त्यानं तुम्हाला तोंडाचे विकार, कॅन्सर होईल.. सिगारेट तयार करणाऱ्या, विकणाऱ्या कंपन्याच रात्रीतून सांगू लागल्या, सिगारेट पिऊ नका, आरोग्याला ते घातक आहे... तर? एकतर ती थापेबाजी वाटेल किंवा त्यावर आपला विश्वासच बसणार नाही!

पण, सिगारेट उत्पादक  असलेल्या अनेक जगप्रसिद्ध कंपन्या हल्ली उघड उघड सांगतात, ‘सिगारेट पिणं सोडून द्या. आरोग्याला घातक असणाऱ्या या सिगारेट तुम्ही उद्या सोडणार असाल, तर आजच सोडा!’ यात सगळ्यांत मोठं नाव आहे, ‘फिलीप मॉरीस’ या कंपनीचं. सिगारेटचे अनेक जगप्रसिद्ध, महागडे ब्रॅण्ड ही कंपनी बनवते आणि विकतेही. एकेकाळी जेव्हा सिगारेटबंदीवर सगळीकडेच जोर पकडला होता, त्या वेळी या कंपनीनं त्याविरुद्ध जबरदस्त मोहीम आखली होती आणि लोकांना सिगारेट स्टाइल्स शिकवत होती. मग, असं अचानक काय झालं? स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड पाडायला या कंपन्या का तयार झाल्या? 

- त्याला कारण म्हणजे धूम्रपानाविरुद्ध जगभरात तयार झालेलं जनमत. अनेक विकसित आणि विकसनशील देशांत  सिगारेट ओढणाऱ्यांचं प्रमाण  कमी होऊ लागलं आहे. दीर्घकाळापासून धूम्रपान करणारेही सिगारेटपासून दूर राहू पाहात आहेत, धूम्रपानाचं तरुणांचं आकर्षणही कमी होत आहे. अनेक देशांमध्ये सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी आणली जात आहे. या उत्पादनांवरचे कर जगभरात सर्वत्र वाढवले जात आहेत. पर्यायानं त्यांच्या किमतीही वाढत आहेत. अमेरिकेसारख्या अनेक देशांनी सिगारेट कंपन्यांवर कोट्यवधी डॉलर्सचे दावे ठोकले आहेत, सामाजिक संस्थांकडून सिगारेटबंदीबाबत दबाव मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. या धंद्यातल्या अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या आहेत आणि इतरांनाही अशा विपरीत परिस्थितीत हा धंदा करणं दिवसेंदिवस अवघड होऊ लागलं आहे. अशा परिस्थितीत ‘जीवंत’ राहायचं असेल तर काहीतरी केलंच पाहिजे म्हणून सिगारेट क्षेत्रातील जगभरातील ‘बडे मासे’ आता एकत्र आले आहेत आणि त्यांनीच अबाउट टर्न करावं तसा पवित्रा घेऊन आता सिगारेटबंदी मोहिमेला बळ पुरवायला सुरुवात केली आहे.

याचं कारण अर्थातच स्पष्ट आहे. यातल्या कोणालाही ‘समाजसेवा’ करायची नाही आणि लोकांचा दुवाही घ्यायचा नाही. आपलं जहाज कधी ना कधी बुडणारच आहे, तर त्याला तरंगत ठेवण्यासाठी खर्च करण्यापेक्षा आपण स्वत:हूनच ते बुडवून टाकलेलं केव्हाही बरं, असं म्हणून त्यांनी नवा पर्याय शोधला आहे. अर्थातच हा पर्याय आहे ‘ई-सिगारेट’चा! या नव्या मार्केटला चांगला स्कोप आहे, हे या कंपन्यांच्या कधीच लक्षात आलं आहे. त्यामुळे अनेकांनी पारंपरिक सिगारेट बनवणं बंद, कमी करून या नव्या धंद्याकडे लक्ष पुरवायला सुरुवात केली आहे. भविष्याची पावलं त्यांनी आधीच ओळखली आहेत. 

‘फिलिप मॉरिस’ कंपनीनं २००८ पासूनच ‘स्मोक फ्री’ प्राॅडक्ट‌्सच्या संशोधन आणि विकासावर भर द्यायला सुरुवात केली आहे. त्यासाठी तब्बल आठ बिलिअन डॉलर्सचा खर्चही त्यांनी केला आहे आणि पारंपरिक सिगारेटला इलेक्ट्रॉनिक पर्याय शोधले आहेत. यासंदर्भात ‘फिलिप मॉरिस’ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आंद्रे कॅलनझोपुलस  म्हणतात, “लोकांना वाटतं की सिगारेटमध्ये जे निकोटिन असतं त्यामुळे तुमच्या शरीरातले आजार वाढतात आणि अनेक जण मृत्युमुखी पडतात; पण तसं नाही. खुद्द अन्न आणि औषध प्रशासनानंच हे स्पष्ट केलं आहे, की आजार आणि मृत्यूंना निकोटिन कारणीभूत नाही. ते फक्त तुम्हाला व्यसन लावतं. खरा धोका सिगारेटमधील निकोटिन जाळण्यामुळे होतो. निकोटिन जाळणं जर बंद केलं, तर अनेक घातक रसायनं तयारच होत नाहीत आणि त्यामुळे  जीवाला धोकाही पोहोचत नाही. म्हणूनच आम्ही आता निकोटिन न जाळता ते फक्त गरम करणाऱ्या ई-सिगारेट तयार केल्या आहेत, त्यांचा ‘स्वाद’ पारंपरिक सिगारेटसारखाच आहे. त्या तुम्ही ओढा! तुमच्या आरोग्यासाठीच आम्ही हे सारं करतो आहोत!” 

- आहे की नाही चलाखी? फक्त सहा वर्षांपूर्वीची गोष्ट. ‘फिलिप मॉरिस’चा शंभर टक्के व्यवसाय पारंपरिक सिगारेट विक्रीतून होत होता. पण, आज त्यांचा तब्बल तीस टक्के व्यवसाय ‘स्मोक फ्री’ उत्पादनांतून होतोय. पुढच्या चार वर्षांतच तो ५० टक्क्यांपर्यंत नेण्याचा त्यांचा इरादा आहे.. त्यामुळे उंदीर खाऊन मांजर यात्रेला चाललेली नाही हे नक्की!

‘आय क्विट ऑर्डिनेरी स्मोकिंग!’ 
सिगारेट  उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या मोहिमेला नावही अतिशय कल्पक दिलं आहे.. ‘आय क्विट ऑर्डिनेरी स्मोकिंग!’ म्हणजे ‘मी पारंपरिक धूम्रपान सोडून दिलं आहे!’ येत्या दशकभरातच जगातून पारंपरिक सिगारेट हद्दपार होतील, असा अंदाज आहे. म्हणूनच तर या कंपन्या म्हणताहेत, ‘बुड बुड घागरी’!   

Web Title: Why do cigarette companies say quit cigarettes ?; Can't believe it, but ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.