कृषी उत्पादनांचे अंदाज का चुकतात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 12:15 AM2018-03-06T00:15:34+5:302018-03-06T00:15:34+5:30
सुरुवातीला देशात मागणी इतकेच साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज वर्तविला गेला होता. मात्र, सध्या साखरेची विक्रमी उत्पादनाकडे वाटचाल सुरू आहे. साखरेचेच नाही तर अन्य कृषी मालाचेही सरकारचे अंदाज चुकतात. परिणामी, दर कमी-जास्त होऊन त्याचा फटका शेतकरी आणि ग्राहकाला बसतो.
- चंद्रकांत कित्तुरे
देशात यंदा साखरेचे उत्पादन विक्रमी होण्याची लक्षणे दिसत आहेत. २५१ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज होता. तो आता २९० लाख टनांवर जाईल, असा अंदाज आहे. केवळ साखरच नव्हे, तर देशातील सर्वच कृषी उत्पादनांच्या बाबतीत हे कमी-अधिक प्रमाणात घडत आहे. सरकारने काढलेले अंदाज चुकतात. परिणामी, दरात चढ-उतार होतात. तात्पुरते उपाय योजून त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सरकार करते. अंदाज का चुकतात याबाबत काहीतरी कारणमीमांसा करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला जातो. तूर, हरभरा, सोयाबीन, शेंगदाणे यासारख्या पिकांबाबतचे गेल्या दोन वर्षांचे अनुभव हेच सांगतात. बाजारात मागणीपेक्षा जादा पुरवठा झाला की, किमती कमी होतात आणि कमी झाला की त्या वाढतात. अन्नधान्याच्या बाबतीतही बाजाराचा हाच न्याय आहे. त्यामुळे मागणी इतकाच पुरवठा होईल, असे नियोजन झाले तर कृषी उत्पादनाच्या किमती स्थिर राहू शकतात. पण आपल्या देशातील भौगोलिक परिस्थिती, राजकीय इच्छाशक्ती ही कोणत्याही कृषी उत्पादनाचे किती उत्पादन घ्यावे, याबाबत नियोजन करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी अशी नाही. यामुळेच ही परिस्थिती उद्भवते. पीक मुबलक आले की, दर कोसळतात. उत्पादन खर्चही निघत नाही. परिणामी, शेतकºयांना तोटा सहन करावा लागतो. आधीच कर्जात बुडालेला शेतकरी आणखी कर्जाच्या विळख्यात अडकतो. त्यातून बाहेर पडणे अशक्य वाटू लागले की, तो आत्महत्येचा मार्ग अनुसरतो. हे आपल्या देशातील वर्षानुवर्षाचे विदारक सत्य आहे. यावर मार्ग काढण्याच्या घोषणा, उपाय वेगवेगळ््या सरकारने केल्या. परंतु, परिणाम फारसे उत्साहवर्धक नाहीत.
सुरुवातीला २०१७-१८ या हंगामातील साखरेचे उत्पादन २५१ लाख टन होईल असा अंदाज ‘इस्मा’ या संघटनेने वर्तविला होता. केंद्र सरकारची असा अंदाज वर्तविणारी स्वतंत्र यंत्रणा नसल्यामुळे ‘इस्मा’चा अंदाजच सरकारही गृहीत धरते. जानेवारीत सुधारित अंदाज वर्तविताना तो २६१ लाख टनांवर नेण्यात आला. आता उद्या, बुधवारी पुन्हा ‘इस्मा’कडून सुधारित अंदाज वर्तविला जाणार आहे. गतवर्षी साखरेचे उत्पादन २४५ लाख टन होईल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात २०३ लाख टन उत्पादन झाले. यामुळे साखरेला पर्यायाने उसालाही चांगला भाव दिला गेला. परिणामी, ऊस लागवडीखालील क्षेत्रात चांगली वाढ झाली. त्यातच यंदा पाऊसमान चांगले झाले; त्यामुळे उसाची वाढ जोमाने होऊन साखरेचा उताराही वाढला आहे. परिणामी, साखरेच्या उत्पादनात अपेक्षेपेक्षा अधिक वाढ होत असल्याचे दिसत आहे.
‘इस्मा’बरोबरच विविध राज्यांतील साखर आयुक्तालये किंवा ऊस आयुक्तालयांनी साखर कारखान्यांकडून घेतलेली ऊस नोंदीची आकडेवारी आणि कृषी विभागाची आकडेवारी पाहून हा अंदाज सरकार वर्तवते, पण यात अचूकता नाही. याला वेगवेगळी कारणे आहेत. आॅल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनच्या अंदाजानुसार यंदा साखर आकडा २९० लाख टनांवर जाणार आहे. साखरेसह सर्वच शेतमालांचे किती उत्पादन होईल, याचे अचूक अंदाज बांधणारी यंत्रणा केंद्र आणि राज्य सरकारांनी विकसित करायला हवी. विकसित देशात जर अशी यंत्रणा असेल, तर ती आपल्याकडे का असू नये? ती असेल तर शेतमालांच्या किमती स्थिर ठेवण्यासही मदतकारक ठरू शकेल. नाही तर वेधशाळेने पावसाचा अंदाज वर्तवावा आणि नेमके कडक ऊन पडावे अशी स्थिती असते. तशीच ती शेतमालाच्या उत्पादनाबाबतही राहील.