दृष्टिकोन : मौखिक परंपरेतील लोककलावंत उपेक्षेचे धनी का ठरतात?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 02:11 AM2020-06-08T02:11:21+5:302020-06-08T02:11:56+5:30

चौगुले यांनी सुमारे ३५०० गाणी गायली व १५० पेक्षा जास्त कथा रचल्या. चांगुनाची कथा, भावा-बहिणीची कथा, आईचं काळीज, मोहट्याची जगदंबा, खंडोबाची कथा, अशा अनेक कथा लोकप्रिय केल्या

Why do folk artists in the oral tradition become the masters of neglect? | दृष्टिकोन : मौखिक परंपरेतील लोककलावंत उपेक्षेचे धनी का ठरतात?

दृष्टिकोन : मौखिक परंपरेतील लोककलावंत उपेक्षेचे धनी का ठरतात?

googlenewsNext

धनाजी कांबळे

कला जीवनाला आकार, उकार देत अनेकांच्या आयुष्यातील विस्कटलेले पदर दुरुस्त करते. प्रेम, विरह, राग, लोभ, सुख-दु:ख, आसक्तीला शब्दांत बांधून स्वत: तिच्यावरचं उत्तर शोधते ती कला. अनेकजण मनातल्या भावभावनांना व्यक्त करण्यासाठी चित्रपटांतील कथानक, नायक-नायिकांशी जोडून घेतात. कविता हे त्यांच्या हक्काचंच साधन बनतं. व्यक्तिगत जीवनात हे घडत असलं तरी आपल्या सभोवती असे अनेक कलाकार असतात, जे मौखिक लोकपरंपरेतून माणसाच्या जगण्याचं तत्त्वज्ञान पेरत राहतात. लोककलेतून समाजप्रबोधन करतात. असाच हरहुन्नरी लोककलावंत छगन चौगुले हे कोरोनाचे बळी ठरले. कोरोनाने लोककलेचा जणू कंठ चोरून नेला. मूळचे नातेपुते कारूंडे येथील चौगुले यांच्या सोलापूर जिल्ह्याला लोकशाहीर अमर शेख, प्रल्हाद शिंदे यांची परंपरा आहे. तीच धार्मिक, सांस्कृतिक कलाप्रकारांसाठी त्यांनी वापरली. ‘भिक्षुकी’ वा ‘माधुकरी’ हेच जगण्याचं साधन असल्याने पोटासाठी जागरण, गोंधळ, यल्लमाईचे मेळे, आदी कार्यक्रम करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबात भाकरीशी भांडता भांडता ते घडले.

चौगुले यांनी सुमारे ३५०० गाणी गायली व १५० पेक्षा जास्त कथा रचल्या. चांगुनाची कथा, भावा-बहिणीची कथा, आईचं काळीज, मोहट्याची जगदंबा, खंडोबाची कथा, अशा अनेक कथा लोकप्रिय केल्या. मध्य प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, आदी राज्यांत त्यांनी कार्यक्रम केले. त्यांची गाणी, गोंधळ, ओव्या म्हणजे भांडारच. त्यांचा आशय चैतन्यवादी असला, तरी त्यांचा आवाज हजारो वर्षा$ंच्या भौतिक शोषणाविरुद्धचा विद्रोह म्हणायला हवा. त्यांच्या शब्दांमध्ये शुद्रातिशूद्रांच्या सांस्कृतिक संघर्षाचं, सांस्कृतिक जीवनाचं संचित होतं. ‘भोळ्या भक्ताच्या घरी गोंधळाला ये गं, मान कुंकवाचा घे गं...’, ‘नवरी नटली, काळूबाई सुपारी फुटली...’ अशा अव्यक्तनेणिवेनं ओतप्रोत भरलेली त्यांची गाणी, संगीत येणाºया पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल. पितृसत्ताक वर्ण-जातविरोधी कलाविष्कार मौखिक परंपरेतील गाण्यांतून व्यक्त होतो. त्यांच्या लोकगीतांची, गोंधळ कथांची समृद्धी मौखिक परंपरेची ताकद दाखविणारी आहे. तरीही हजारो गाणी लिहून-गाऊन ते उपेक्षेचे धनी झाले आहेत. समाज त्यांच्याकडे फक्त मनोरंजनाचे साधन म्हणून पाहतो, तर सरकार पेन्शनपुरते मर्यादित राहते. कॅसेट कंपन्या त्यांच्या आवाजाचे भांडवल करून गलेलठ्ठ होतात; कलाकार मात्र दोनवेळच्या अन्नाला मोताद होतो. लोककलांमधून लोकजीवन, लोकसमूह आणि त्या लोकसमूहाच्या परंपरा, रुढी यांचे प्रतिबिंब आजही समाजात दिसते. किंबहुना लोककलांनी समाजव्यवस्थेचे संतुलन जपले आहे. लोकसमूहाचे सांस्कृतिक व धार्मिक भावविश्वाचे दर्शनही या लोककलांमधून घडते. मात्र, आज जग बदलत असताना ‘लोकल टू ग्लोबल’च्या या प्रवासात लोककला आणि लोकपरंपरा जिवंत ठेवण्यासाठी ना सरकारकडे कोणता शाश्वत कार्यक्रम आहे ना समाजाकडे.

अनेकदा कलाकारांना उभे राहताना मोठा संघर्ष करावा लागतो. जग हातातल्या मोबाईलमध्ये आलेले असताना जे आतापर्यंत घडून गेले ते एका क्लिकवर माहिती करून घेता येते. मात्र, जिवंत सादरीकरण हल्ली फारसे पाहायला मिळत नाही. माणूसही या लोककलांपासून कोसो दूर जाऊ लागलाय. किंबहुना दूर गेला आहे. आज पारंपरिक कलाप्रकारांवर भांडवली, वर्चस्ववादींनी कुरघोडी केलेली आहे. मात्र, जे ओरिजनल होते, त्याची सर त्याला येणे अशक्य. जे बेंबीच्या देठापासून व वेदनेतून जन्माला येते, ते चंदेरी-सोनेरी दुनियेत तितक्याच ताकदीने जन्माला येण्याची शक्यता कमीच. आताच्या जनचळवळींनी मोर्चा, आंदोलनांत शाहीर आणि गायकांना माणसं जमविण्यासाठी वापरून घेतले. मात्र, त्यांना विकसित करण्यासाठी, दिशा देण्यासाठी धोरण म्हणून कला, सांस्कृतिक अंगाला म्हणावे तेवढे अजेंड्यावर घेतले नाही. कोणताही सांस्कृतिक अजेंडा-धोरण प्रागतिक चळवळींकडे दिसत नाही. कलावंत अपघाताने चळवळीत येतात व लढ्याशी जोडून घेत स्वत:ला घडवत राहतात. चौगुले यांनीही स्वत:च स्वत:चे विश्व निर्माण केले व आयुष्याच्या शेवटपर्यंत लोककलेचे व्रत सोडले नाही. त्यांनी लोककलेचा वारसा पुढे नेण्यात मोठी भूमिका निभावली. कलावंत असा अकाली गेल्यावर सरकारने त्याच्या कुटुंबाची योग्य काळजी घेऊन त्यांना उभे राहण्यास बळ द्यावे. कलावंत हा समाजाचा ठेवा असतो. तो जपावा, हीच अपेक्षा.

(लेखक लोकमतमध्ये वरिष्ठ उपसंपादक, आहेत)

Web Title: Why do folk artists in the oral tradition become the masters of neglect?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.