त्यांच्या कहाण्यांनी आपण गहिवरत का नाही?
By गजानन जानभोर | Published: June 14, 2018 12:21 AM2018-06-14T00:21:29+5:302018-06-15T01:21:29+5:30
आपल्या अवतीभवती अशी खूप प्रज्ञावंत मुले असतात. त्यांच्या संघर्षाच्या कहाण्यांनी आपण भारावून जातो पण कधी गहिवरत नाही.
समीक्षा सुधाकर आंडगे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुलगी. वडिलांनी नापिकीला कंटाळून आत्महत्या केली. आई मजुरीवर जाते. दहावीत तिला ९७ टक्के गुण मिळाले. यवतमाळ जिल्ह्यातील (तालुका-महागाव) हिवरासंगम या खेड्यातील ही प्रज्ञावंत लेक. नागपूरच्या श्रुतिका जगदीश कोपरकरचे वडील हातमजुरी करतात. तिला ९४ टक्के गुण मिळाले. आरती मानमोडे जन्मांध आहे. आईवडील लहानपणीच गेले. श्रद्धानंदपेठेतील वसतिगृहात ती राहते. तिचीही दहावीतील कामगिरी नेत्रदीपक. तेजस्विनी रंभाडला ९७ टक्के, वडील आजारी, आई शिवणकाम करते. आकाश रुईकर...९२ टक्के...वडील सिक्युरिटी गार्ड. कंपनीत येणाºया जाणाºयांना सलाम ठोकतात. आकाश अस्वस्थ होतो. एक दिवस मी कलेक्टर होईल आणि वडिलांना सलामी देणार, त्याचे हे स्वप्न. शांतिनगरातील प्रगती साखरेला ८८ टक्के गुण. वडील रिक्षाचालक. तिला पुढे शिकायचे आहे पण परिस्थिती आड येते. कसेतरी शिक्षण पूर्ण करायचे व नोकरी करून कुटुंबाला सावरायचे, स्वत:च्या स्वप्नांना ती स्वत:च अशी मूठमाती देणार...
पारशिवनी तालुक्यातील सालई. मंगला भाऊराव झोड...बारावीत ७७ टक्के गुण. वडील अंथरुणाला खिळलेले. घरकाम करून ती रोज सायकलने दहा किलोमीटर शाळेत जाते. चैतन्य सायरे. वडील नाहीत, आई आहे पण ती आजारी. त्याला ९५ टक्के गुण. अंकित सिद्धार्थ पाटील झोपडपट्टीत राहतो. सकाळी ५ वाजता उठून पेपर वाटतो आणि नंतर दिवसभर बिगबाजारमधील वडापावच्या दुकानात काम करतो. त्याला ८८ टक्के गुण मिळाले. संजना विनोद टेंभुर्णे. वडील रंगकाम करतात. तिला वाणिज्य शाखेत ९४ टक्के मिळाले. लातूरजवळ औसा तालुक्यातील हसेगावचा रवी बापटले आता ८० एचआयव्हीग्रस्त मुलांचा मायबाप झाला आहे. त्याच्या सेवालयातील नऊ मुले यंदा दहावीत उत्तीर्ण झाली. या घरट्यातील २७ मुले पुढील शिक्षणासाठी लातूरला जाणार आहेत. परवा रवीचा फोन आला. ‘‘या मुलांना रोज लातूरला जाण्यासाठी छोटीशी स्कूल बस मिळेल का? मी प्रयत्न करतोय. पण जमत नाही. कुणाला सांगता येईल का?’’ बीडजवळच्या गेवराईत संतोष गर्जेचे ‘सहारा अनाथालय’ आहे. तिथे ४५ मुले राहतात. यावर्षी चार मुले दहावीत उत्तीर्ण झाली. संतोषचा जीव मेटाकुटीस येतो, ‘‘या मुलांना कसेही करून शिकवीन, प्रसंगी स्वत:ला गहाण ठेवीन’’ हुंदके आवरत संतोष सांगत असतो...
ही सर्व मुले प्रज्ञावंत, अभावग्रस्त, जन्मापासूनच जगण्यासाठी झुंज देणारी... पण त्यांच्या प्रेरणा अभंग आहेत. आपल्या मुलांच्या सुखवस्तू ९७-९८ टक्क्यांपेक्षा त्यांचे यश कितीतरी लक्षणीय. इथपर्यंतची लढाई ते लढले आणि जिंकलेही. पण पुढे काय? त्यांना भेटल्यानंतर हा प्रश्न सतत अस्वस्थ करीत असतो. आपल्या अवतीभवती अशी खूप मुले असतात. त्यांच्या संघर्षाच्या कहाण्यांनी आपण भारावून जातो पण कधी गहिवरत नाही. त्यातील एखाद्याला शिक्षणासाठी दत्तक घ्यावे, असे कधीच वाटत नाही. सांसारिक प्रपंचातील मोह, माया, मत्सर कायम ठेवूनही अशा ख-या गुणवंतांना आपण मदत करु शकतो. त्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवू नका किंवा कर्जही काढू नका. आपल्या मिळकतीचा एक छोटासा वाटा या मुलांच्या शिक्षणासाठी देता आला तर बघा. तोरणा-मरणातील अवाजवी खर्च वाचवूनही त्यांचे आयुष्य घडविता येईल.रवि बापटले, संतोष गर्जे सारखे संपूर्ण आयुष्य या मुलांसाठी आपण नाही देऊ शकत. त्यासाठी समर्पण हवे असते. पण आपल्या मुलांसारखेच त्यांचे जगण्याशी, प्रकाशाशी नाते मात्र निर्माण करू शकतो...