‘सरळ उत्तरे का देत नाहीत?’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 01:40 AM2018-09-13T01:40:21+5:302018-09-13T01:42:33+5:30

नावे कुणालाही ठेवा, विरोधकांवर ठपका ठेवणारे वकील कितीही गोळा करा, पण आताच्या निस्तरणाची जबाबदारी तुमची आहे हे विसरू नका.

'Why do not you give a direct answer?' | ‘सरळ उत्तरे का देत नाहीत?’

‘सरळ उत्तरे का देत नाहीत?’

Next

नावे कुणालाही ठेवा, विरोधकांवर ठपका ठेवणारे वकील कितीही गोळा करा, पण आताच्या निस्तरणाची जबाबदारी तुमची आहे हे विसरू नका. गेल्या दोन दिवसात सेन्सेक्स एक हजार अंकांनी बसला. निफ्टीच्या दरातही फार मोठी तूट दिसली. त्यामुळे देशाचे नुकसान साडेचार लक्ष कोटींच्या घरात गेले. याचा फटका अंतिमत: सामान्य नागरिकांनाच बसणार आहे. तेलाचे भाव वाढले, नागरिक सोसणार, भाववाढ झाली नागरिकांवर बोझा पडणार, रुपया घसरला, सामान्य माणूस नुकसान सहन करणार. सरकार ही फक्त हे नुकसान नागरिकांपर्यंत पोहचविणारी पोस्टल एजन्सीच तेवढी राहिली आहे. हा प्रकार रोखणे व त्याच्या चटक्यांपासून नागरिकांचा बचाव करणे ही खरे तर सरकारची जबाबदारी. पण ती घेण्याची तसदी व मन:स्थिती या सरकारजवळ नाही. उलट या प्रकाराचे खापर कुणाच्या माथ्यावर फोडून आपली सुटका करून घेता येईल याच विचाराने ते जास्तीचे पछाडले आहे. बँका बुडाल्या, मागचे सरकार जबाबदार, महागाई वाढली, पूर्वीचे सरकार आरोपी, रुपया घसरला ती जबाबदारी त्यांची, सेन्सेक्स कोसळला तोही त्यांच्याचमुळे. हे म्हणणे खरे मानले तरी त्यांना काढून जनतेने तुम्हाला सत्तेच्या खुर्चीवर बसविले आहे आणि त्या बसण्यालाही आता चार वर्षांचा काळ झाला आहे. तरीही तुम्ही ‘तेच जबाबदार’ असे म्हणत असाल तर तुमची जबाबदारी कधी व केव्हा सुरू व्हायची ? काँग्रेसचीच सरकारे पूूर्वी असायची व नंतरही तीच टिकायची. तेव्हा अशा बनवाबनवीची सोय असे, आता ती नाही. पण म्हणून ती नव्या निवडणुका जवळ येतपर्यंत ताणायची असते काय? की तेच सरकारचे निवडणूक धोरण असते? बँका बुडाल्या आणि कर्जबुडवे विदेशात पळाले ते मोदींच्या राज्यात. तेही त्यांच्या मंत्र्यांच्या परवानगीनिशी. सरकारी विमानातून, पहिल्या वर्गाच्या तिकिटावर. पण ती फसवणूक एकदाची मान्य केली तरी आर्थिक संकटाचे येणे साऱ्यांना दिसत होते की नाही? पेट्रोलियम पदार्थांच्या किमती वाढणार आणि त्याचे देशांतर्गत दर वाढणार याची कल्पना सरकारला होती की नाही? सेन्सेक्स व निफ्टी एकाएकी कोसळत नाहीत. त्याला देशाच्या औद्योगिक व आर्थिक उत्पन्नातील घट कारण होते. ही घट होताना ती सरकारला दिसत होती की नव्हती? अरुण जेटली आजारी होते, पण पीयूष गोयल होते, जयंत सिन्हा होते आणि मोदी तर होतेच होते. तरीही त्यांना ही उतरण कशी पाहता आली नाही? की ते काम मनमोहनसिंगांचे आणि त्यांच्या पक्षाचे होते? देशातील अनेक चांगल्या गोष्टी काँग्रेसच्या इतिहासात झाल्या. तशा काही चुकाही त्यांच्या काळात झाल्या. त्यांचा पराभव त्यांना पहावा लागला. ७७ मध्ये, १९९० च्या दशकात आणि १९९९ मध्ये. भाजपालाही दुसºयांदा केंद्रात स्थान मिळाले आहे. ‘हे सारे त्यांच्यामुळे’ हे तुणतुणे हा पक्ष आता किती काळ वाजवणार आहे आणि वाजविले तरी त्याविषयीच्या जबाबदारीतून त्याची सुटका कशी होणार आहे ? लोक विरोधी पक्षांना जाब विचारीत नाहीत. ते सरकारलाच उत्तर मागत असतात. मग ‘हा प्रश्न आधीच्यांना विचारा’ असे तुम्ही म्हणणार काय? येणाºया संकटांची चाहूल फार लवकर लागणे, आव्हानांची जाण फार आधी येणे आणि त्यांना तोंड देण्याची पूर्ण तयारी ठेवणे हे दूरदर्शी नेतृत्वाचे लक्षण आहे. मात्र येथे तर हे दूरदर्शीत्वच नाही. उलट नको ती संकटे ओढवून घेण्याचीच चढाओढ आहे. परवाचा बंद त्या संदर्भात एक मोठा धडा शिकवून गेला आहे. काँग्रेससह १४ पक्ष त्यासाठी एकत्र आले होते. शिवाय जे काँग्रेस पक्षाला जमत नाही ते आम्ही करून दाखवतो हे केरळने, आंध्र प्रदेशाने, ममता बॅनर्जीने आणि वसुंधरा राजे यांनीही दाखवून दिले आहे. विरोधी पक्षांचा आरोप तर या सरकारने पेट्रोलच्या भाववाढीपायी देशाला ४० लक्ष कोटींनी लुटले असा आहे. त्या आरोपाला उत्तर देण्याऐवजी स्मृती इराणी, राहुल गांधींनाच शिवीगाळ करताना आढळल्या. उत्तरे नसली की माणसे अशी सडकछाप होतात. सबब, सरळ उत्तरे द्या. आधीच्यांवर सारे ढकलू नका आणि त्यांनी चुका केल्याच असतील तर त्या तुम्ही तरी करू नका, एवढेच.
>‘हे सारे त्यांच्यामुळे’
हे तुणतुणे सरकार आता किती काळ वाजवणार? आणि त्या जबाबदारीतून त्याची सुटका कशी होणार आहे ? लोक विरोधी पक्षांना जाब विचारीत नाहीत. सरकारलाच ते उत्तर मागत असतात. मग ‘हा प्रश्न आधीच्यांना विचारा’ असे तुम्ही म्हणणार काय?

Web Title: 'Why do not you give a direct answer?'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.