लोक या उपटसुंभांच्या दारात का जातात?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 09:43 AM2022-02-09T09:43:16+5:302022-02-09T09:43:57+5:30
चळवळी नाहीत, संघटना नाहीत, बौद्धिक भरणपोषणाच्या जुन्या व्यवस्था मोडून पडल्या आहेत आणि राजकीय पक्षांना मते विकतच घ्यायची आहेत.
संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत
हिंदुस्थानी भाऊ नावाचा कुणी उपटसुंभ सोशल मीडियावर शिवराळ भाषेत व्हिडीओ पोस्ट करतो, त्या बळावर ‘इन्फ्लुएन्सर’ हे बिरुद मिरवतो. त्याच घमेंडीतून परीक्षा ऑनलाइन झाली पाहिजे, या मागणीकरिता तरुणांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन करतो व मुले-मुली वेगवेगळ्या शहरांत शेकडो-हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरतात, हे आपली व्यवस्था झपाट्याने घसरणीला लागल्याचे उदाहरण आहे. समाजातील वेगवेगळ्या घटकांचे प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे त्यांची कोंडी झाली आहे. निर्ढावलेली व्यवस्था कुणा एका व्यक्तीला दाद देत नाही. त्यामुळे या प्रश्नांकरिता लढण्याकरिता संघटन हवे. परंतु अशा संघटनांचे एकेकाळी राज्यात असलेले जाळे जागतिकीकरणानंतर वेगवेगळे कायदे, नियम करून मोडून टाकले आहे. त्यामुळे सध्या दाद कुणाकडे मागायची, असा यक्षप्रश्न अनेक समाजघटकांपुढे आहे.
काही राजकीय पक्षांनी तर जनतेशी आपली नाळ तोडून टाकली आहे. राजकारणातून पैसा कमवायचा व निवडणुकीच्या वेळी तोच पैसा वापरून आपल्या पॉकेट्समधून विजय मिळवायचा, असा हिशेबी मार्ग काहींनी स्वीकारला आहे. जे आपल्याला मते देत नाहीत त्यांच्या प्रश्नांकडे कशाला पाहायचे, असा विचार प्रबळ झाला आहे. त्यामुळे चळवळी व संघटना नाहीत आणि राजकीय व्यवस्थाही दखल घेत नाही, अशा निर्नायकी अवस्थेकडे सध्या आपली वाटचाल सुरू आहे.
नेमक्या याच पोकळीत हिंदुस्थानी भाऊसारख्या प्रवृत्तींना अंकुर फुटतो. या भाऊसारख्यांना फॉलो करणारे जे तरुण आहेत त्यांची सामाजिक, राजकीय भूमिका तयार करण्याकरिता सध्या कुठलाच पक्ष फारसा प्रयत्न करीत नाही. नरेंद्र मोदींचा उदय झाल्यापासून अनेक ठिकाणी रा. स्व. संघाच्या शाखा सुरू झाल्या आहेत. हा अपवाद वगळता अन्य पक्षांकडून बालवयात मुला-मुलींवर वैचारिक संस्कार करण्याचा प्रयत्न होत आहे हेच जाणवत नाही. त्यामुळे तरुण वयात राजकीय, सामाजिक भूमिका घेताना तौलनिक विचार करण्याची परिपक्वता साध्य होत नाही. वक्तृत्व, वादविवाद, पाठांतर वगैरे स्पर्धा अभावाने होत असल्याने शालेय वयात होणारा पाठ्यपुस्तकेतर अभ्यास संपुष्टात आला आहे. केवळ पास होण्याकरिता जुजबी अभ्यास करायचा असे सुलभीकरण झाले आहे. त्यामुळे हित-अहित समजण्याचे शहाणपणही अनेकांना नाही. महाविद्यालयीन स्तरावर नेतृत्व विकसित होण्याची प्रक्रिया ठप्प झाली आहे.
केवळ सोशल मीडियावरच हे चित्र नाही. अगदी एसटी कामगारांचे उदाहरण घेतले तरी कामगारांकरिता वर्षानुवर्षे संघर्ष करीत आलेल्या संघटनांची पुण्याई क्षीण झाल्याने कामगार भलत्याच व्यक्तीच्या कच्छपि लागले आहेत. त्यामुळे कदाचित आपली गिरणी कामगारांसारखी वाताहत होईल याचे भान सुटले आहे.
जॉर्ज फर्नांडिस व बाळासाहेब ठाकरे यांची या परिस्थितीत प्रकर्षाने आठवण होण्याचे कारण असे की, या दोघांच्या हाकेला ‘ओ’ देत लक्षावधी लोक रस्त्यावर उतरायचे. संप, बंद करायचे. अशाच प्रकारे मोर्चे काढून संघर्ष मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर प्रभृतींनी केले. या साऱ्यांच्या आपल्या वैचारिक भूमिका होत्या. दीर्घकालीन विचार मंथनातून त्या भूमिका घेतल्या गेल्या होत्या. सामान्य कार्यकर्त्यापासून नेत्यापर्यंत खस्ता खात त्यांनी आपले स्थान बळकट केले होते. आंदोलन करताना अथवा बंद करताना ते हाताबाहेर जाणार नाही, याची खबरदारी घेण्याइतके शहाणपण त्यांच्यापाशी होते. फर्नांडिस हे मुळात गोदी कामगारांचे नेतृत्व करण्याकरिता मुंबईत आले. नूर महंमद खान या कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर त्यांनी मुंबई महापालिका कामगारांचे संघटन केले. बेस्टमध्ये फर्नांडिस यांची युनियन असताना कामगारांच्या मागण्यांकरिता त्यांनी केलेल्या संपामध्ये कामगारांना आणण्याकरिता कुलाबा डेपोतून बाहेर पडणाऱ्या बसच्या चाकातील हवा काढण्याचे तंत्र स्वत: जॉर्ज यांनी शिकून घेतले होते. अनेक बेस्ट चालक फावल्या वेळेत टॅक्सी चालवायचे त्यातून फर्नांडिस टॅक्सीमेन्स युनियनचे नेते झाले. आर. जे. मेहता हे त्यावेळी प्रीमियर कामगारांकरिता संघर्ष करीत होते व त्या कामगारांना पाठिंबा देण्याकरिता जॉर्ज यांनी महापालिका, बेस्ट कामगारांना व टॅक्सीचालकांना संपात उतरवले व त्यामुळे ‘संपसम्राट’ हे बिरुद त्यांच्या नावापुढे लागले. रेल्वे कामगारांचे नेते झाल्यावर जॉर्ज यांनी सर्वप्रथम रेल्वे इंजिन बंद कसे करायचे ते शिकून घेतले. पुढे २० दिवसांच्या ऐतिहासिक रेल्वे संपाच्यावेळी तो अनुभव त्यांच्या कामी आला. रेल्वे संप मागे घेण्याचा धोरणीपणाही त्यांनी दाखवला. हा इतिहास नमूद करण्याचे कारण फर्नांडिस यांनी कठोर तपश्चर्येतून संप करून मुंबई ठप्प करण्याची ही शक्ती प्राप्त केली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या काही भूमिका, वक्तव्ये व हिंदुत्वाच्या नावाने त्यांच्या समर्थकांनी केलेली हिंसा याबाबत मतभेद असतील. परंतु प्रबोधनकार ठाकरे यांच्यासारख्या समाजसुधारकाच्या मुशीत त्यांचे व्यक्तिमत्त्व घडले होते. व्यंगचित्रकाराची दृष्टी त्यांना लाभली होती व ती त्यांनी त्यांच्या साधनेतून कमावली होती. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात तावून सुलाखून ठाकरे यांची राजकीय भूमिका तयार झाली होती. मराठी बेरोजगार तरुणांच्या रोजगाराचा त्यांनी उचललेला मुद्दा ज्वलंत होता व त्या भूमिकेशी ते प्रामाणिक राहिल्यामुळे त्यांना तुफान लोकप्रियता मिळाली. त्याच बळावर त्यांनी मुंबई बंद करण्याची ताकद प्राप्त केली होती.
एखादी हूल उठवून जनमानसाला सदसद्विवेकबुद्धी गहाण ठेवायला लावण्याचा पहिला प्रयोग गणपती दूध प्यायला हाच होता. तो कुठल्या विचाराच्या मंडळींनी केला हे वेगळे सांगायला नको. त्यावेळी सोशल मीडिया अस्तित्वात नसतानाही ती अफवा जगभर पसरली. आता तर तंत्रज्ञानाने हे अधिक सोपे झाले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्यावेळी अशाच अफवा पसरुन परप्रांतीय मजुरांना वांद्रे स्थानकाबाहेर जमा केले गेले आणि पाकिस्तानला शिव्या देणारा भाऊ परीक्षांवरून असंतोष निर्माण करू पाहत होता. या घटना वेगवेगळ्या वाटल्या तरी बारकाईने पाहिले तर यामागील हेतूमध्ये साधर्म्य दिसते हे नक्की! अर्थात तेवढा डोळसपणा पाहणाऱ्यांत हवा.
sandeep.pradhan@lokmat.com