सार्वजनिक आरोग्याची आणीबाणी वारंवार का येते?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 08:18 AM2024-07-24T08:18:37+5:302024-07-24T08:19:46+5:30
स्वाइन फ्लू, कोरोना, झिका.. अशा एकामागोमाग येणाऱ्या साथी मानवी आरोग्याची परीक्षा घेतात. व्यायाम, प्रतिकारशक्तीअभावी आपण त्यांचे सोपे सावज बनतो..
- डॉ. अमोल अन्नदाते
लेखक आरोग्य व सामाजिक प्रश्नांचे विश्लेषक
गेल्या अनेक वर्षांपासून स्वाइन फ्लूपासून कोरोनापर्यंत व आता आताच्या झिका, चंदीपुरा अशा अनेक विषाणूंच्या साथी सुरूच आहेत. अनेक संसर्गजन्य आजार अधून-मधून थोड्या फार फरकाने प्रत्येकाला होत असतात. पण, साथ पसरते तेव्हा तसे नसते. मानव जातीने आजवर प्लेग, फ्लू , कॉलरा, कोरोना अशा जगातील प्रत्येक व्यक्तीवर परिणाम केलेल्या महासाथी अनुभवल्या. मानवी जिवाला असलेला धोका लक्षात घेता, या साथींची तुलना महायुद्धाशीच होऊ शकते. पण, हे युद्ध फक्त रुग्णालयातच लढले जात असल्याने त्याची तीव्रता कोणच्याही लक्षात येत नाही.
युद्धात जसा देश बेचिराख होऊ शकतो, तसा साथीतही होऊ शकतो. आजही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची आठवण निघाली, तर अंगावर काटा येतो. कोरोना साथीत प्रत्येक व्यक्तीची जवळची तीन, तरी माणसे दगावल्याचे एका क्षणात सहज आठवेल. पण, तरीही कोरोनाच्या साथीत आपण जे शिकलो ते सगळे स्मशान वैराग्यच ठरले. वेगाने मानवतेवर आदळणाऱ्या साथी पाहता साथींचे शास्त्र हे फक्त डॉक्टरच नव्हे, तर सर्वसामान्य लोक व धोरण आखणाऱ्या, राबवणाऱ्या प्रत्येकानेच समजून घेणे आवश्यक आहे.
साथ कुठलीही असो, त्याची काही वैशिष्ट्ये असतात. साथ न सांगता कधी येत नाही. ती धोक्याची घंटा आधी वाजवते. भारतात कोरोना येण्याच्या सहा महिने आधीच चीन व इतर अनेक देशांत ती हाहाकार माजवत असल्याचे अख्खे विश्व पाहत होते. साथीत सगळ्यात आव्हानात्मक गोष्ट असते, कमी वेळेत खूप मोठ्या लोकसंख्येवर परिणाम होऊन अपुऱ्या आरोग्य यंत्रणेवर खूप ताण येणे.
भारतात साथींमध्ये आधीच मोडकळीला आलेली सार्वजनिक व्यवस्था अजून अधिक ताणली जाणे ही सर्वात मोठी समस्या असते. साथी टाळण्याचे उपाय हे अत्यंत साधे व आरोग्याच्या साध्या नियमांशी निगडीत असतात. साथी कमी होतात, पण पूर्णतः कधीही संपत नाहीत. गरज सरो वैद्य मरो, या वृत्तीप्रमाणे साथीची दाहकता कमी झाली की, सर्व यंत्रणा परत उपाययोजनांच्या बाबतीत सुस्त होते. १९६८ साली साधा सर्दी-खोकला, म्हणजे फ्लूची साथ येऊन प्रत्येकाला तो होऊन गेला, पण आजही जगभरात सात लाख लोक साध्या फ्लूमुळे मृत्युमुखी पडतात. यात भारतातही ५ वर्षांखाली व ६५ वर्षांपुढे अनेक जणांचा फ्लूमुळे मृत्यू होतो. फ्लू टाळणारी उत्तम लस उपलब्ध असूनही कोणी पैसे खर्च करून ही लस घेत नाही व सार्वजनिक आरोग्य सेवेत ही लस मोफत मिळणे दिवास्वप्नच आहे. कोरोनाची साथ वेगळी होती, कारण विषाणूबद्दल व उपाययोजना, उपचारांबद्दल फारशी माहिती नव्हती. पण डेंग्यू, चिकनगुनिया, झिका, फ्लू, न्युमोनिया, अशा अनेक साथी आहेत. ज्यांच्या उपाययोजना वर्षानुवर्षे माहीत आहेत व सिद्ध झाल्या आहेत.
२०२४ मधील उन्हाळा हा गेल्या कित्येक वर्षांतील तापमानाचा उच्चांक गाठणारा ठरला. पावसाळा आधीसारखा राहिलेला नसून, कमी वेळेत ढगफुटीसदृश पाऊस पडतो. त्यामुळे साचलेल्या पाण्याचे प्रमाण वाढते. हवामानातील हे सगळे बदल विषाणूंना त्यांच्यात संक्रमण घडवून नव्या साथीच्या रूपात येण्यास पोषक आहेत.
जीवनशैलीतील बदल, कमी झालेली प्रतिकारशक्ती व आहारातील बदल हे साथी आल्यावर जीवितहानी वाढवतात. जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच भारताविषयी एक निरीक्षण नोंदवले की, भारतातील ५० टक्के लोक दिवसाच्या किमान हालचालींची गरज पूर्ण करत नाहीत. व्यायाम, हालचालींचा अभाव तुमची प्रतिकारशक्ती कमी करण्यास कारणीभूत असतात व त्यातून साथींमधले सोपे सावज निर्माण होतात. भारतीय आहारात कर्बोदकांचे प्रमाण जास्त व प्रथिनांचे प्रमाण कमी आहे. तसेच, भाज्या, फळे यांचा दर्जा घसरल्याने मायक्रोन्युट्रीयंट्सचे प्रमाण कमी असते. अधिक साखर व मीठ असलेल्या साठवलेल्या आहाराचे (अल्ट्रा प्रोसेस्ड फूड) प्रमाण वाढत चालले आहे. प्रत्येक चौकात असलेली परदेशी फास्ट फूड आउटलेट्स हे लठ्ठपणा, मधुमेह , उच्च रक्तदाबाची ब्रॅंड ॲम्बेसिडर आहेत.
हे सगळे आजार प्रतिकारशक्तीचा बळी घेणारे आहेत. वाघ जेव्हा हरणाच्या कळपाची शिकार करतो, तेव्हा त्यातील कमकुवत मागे राहून शिकार होतात. साथीमध्ये शिकार होणारे, असे कमकुवत प्रतिकारशक्ती व सहआजार असलेले असतात. नियमित येणाऱ्या साथी ही मानवाच्या आरोग्याची वार्षिक परीक्षा असते. त्यात उत्तीर्ण होण्यासाठी आरोग्याची मूलभूत तत्त्वे हाच मुख्य अभ्यासक्रम आहे.
dramolaannadate@gmail.com