भारतातून विद्यार्थी शिकायला परदेशात का जातात?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2024 10:43 AM2024-12-01T10:43:17+5:302024-12-01T10:43:35+5:30
काल सकाळी नवी मुंबईत फिरायला गेलो होतो. रस्त्यावर विजेच्या खांबांवर ओळीने तरुणांचे फोटो लावले होते. भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात शिकायला जायला मदत करणाऱ्या एका सल्लागार कंपनीची ही जाहिरात होती.
नीरज हातेकर प्राध्यापक, अझीम प्रेमजी विद्यापीठ, बंगळूरु
काल सकाळी नवी मुंबईत फिरायला गेलो होतो. रस्त्यावर विजेच्या खांबांवर ओळीने तरुणांचे फोटो लावले होते. भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात शिकायला जायला मदत करणाऱ्या एका सल्लागार कंपनीची ही जाहिरात होती. साधारणत: डझनभर विद्यार्थ्यांना त्यांनी अमेरिका, यूके, कॅनडा वगैरे देशात पाठवल्याचे ही जाहिरात सांगत होती. का जातात भारतातून विद्यार्थी परदेशात शिकायला? मी ही प्रक्रिया एक शिक्षक म्हणून ३० वर्षे पाहतो आहे. परदेशातल्या विद्यापीठांत प्रवेशासाठी आवश्यक असलेले संदर्भपत्र मी आतापर्यंत बऱ्याच विद्यार्थ्यांना दिले आहे. किंबहुना, दरवर्षी न टाळता येण्यासारखे ते कर्तव्यच झाले आहे.
भारतीय विद्यार्थी परदेशात शिकायला जायचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे उच्च शिक्षणाच्या दर्जात असलेली तफावत. आजसुद्धा एकही भारतीय विद्यापीठ जागतिक क्रमवारीत पहिल्या शंभर विद्यापीठात नाही. २०१० च्या आसपास मुंबई विद्यापीठ पहिल्या पाचशे विद्यापीठांत आले होते, पण आता त्यात बरीच घसरण झाली आहे. अमेरिकेत फालतू विद्यापीठे नाहीत असे नाही. पण आपले विद्यार्थी ज्या विद्यापीठांत शिकायला जातात त्यांचा सरासरी दर्जा काढला तर तो भारतातील अगदी पहिल्या फळीच्या विद्यापीठांच्या दर्जापेक्षा चांगला असतो. अभ्यासक्रम चांगला असतो, बहुतेक प्राध्यापक उत्तम असतात. आपल्याकडे विद्यापीठातून अजूनही जुनाट अभ्यासक्रम, बहुतेक कंत्राटी स्वरूपाचे किंवा तासिका तत्त्वावर शिकविणारे प्राध्यापक आणि बहुतांशी पाठांतरावर भर देणारी परीक्षा पद्धती हेच साधारण वास्तव आहे. याला अपवाद फार थोडे.
परदेशी विद्यापीठात शिकायला जाण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे तिथे मिळणारे आंतरराष्ट्रीय एक्सपोझर. अनेक देशांचे विद्यार्थी तिथे शिकायला येतात. प्राध्यापकही जगभरातून आलेले असतात. विविध सांस्कृतिक प्रवाहांची ओळख होते. एकूण दृष्टिकोन अधिक व्यापक आणि जागतिक स्वरूपाचा होतो. याउलट भारतीय विद्यापीठात साधारण स्थानिक किंवा जास्तीत जास्त इतर राज्यांतील विद्यार्थी भेटतात. त्यामुळे परदेशी विद्यापीठांच्या तुलनेत दृष्टिकोन मर्यादित राहतो.
परदेशी विद्यापीठात जगभरातील विद्यार्थ्यांशी थेट मैत्री करता येते, गप्पा मारता येतात, एकत्र जेवता येते, राहता येते. इंटरनेटमधून फक्त माहिती मिळते, इथे प्रत्यक्ष माणसे भेटतात.
गेल्या काही वर्षात भारतातील वरच्या आर्थिक स्थरातील कुटुंबांची संख्या बरीच वाढलेली आहे. त्यांची मुले अगदी लहानपणापासून आयबी शाळेत असतात. तिथे आपोआपच त्यांना आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे शिक्षण मिळते. घराची आर्थिक परिस्थितीसुद्धा उत्तम असते.
महागडे शिक्षण हे एक स्टेटस सिम्बॉलसुद्धा झाले आहे. या मुलांना शालेय शिक्षण संपले की आपोआपच प्रसिद्ध परदेशी विद्यापीठातून प्रवेश मिळतो. त्यात मेरिटचा भाग नसतोच असे नाही, पण कुटुंबाची आर्थिक संपन्नता हा मोठा भाग असतो. त्यांच्या व्यावसायिक आणि कौटुंबिक संबंधामध्येही प्रसिद्ध परदेशी विद्यापीठात शिकणे हा स्टेटसचा भाग असतो.
सर्वसाधारण भारतीय विद्यापीठापेक्षा प्रसिद्ध परदेशी विद्यापीठांचा दर्जा चांगला असतो याचा अर्थ असा नाही की भारतीय विद्यापीठातून शिकलेले विद्यार्थी निरुपयोगी असतात. माझ्या परिचयात भारतीय विद्यापीठांत शिकेलेले आणि परदेशी विद्यापीठांत शिकविणारे बरेच शिक्षक आहेत. अर्थात, या यशात त्यांनी स्वतः घेतलेल्या मेहनतीचा वाटा मोठा आहे.