राजधानी दिल्लीतच अशा नृशंस घटना सातत्याने का घडतात?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 11:24 AM2023-01-04T11:24:17+5:302023-01-04T11:24:41+5:30

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी शालिनी सिंह या कर्तव्यकठोर महिला आयपीएस अधिकाऱ्याकडे सोपविली आहे.

Why do such atrocious incidents happen continuously in the capital Delhi? | राजधानी दिल्लीतच अशा नृशंस घटना सातत्याने का घडतात?

राजधानी दिल्लीतच अशा नृशंस घटना सातत्याने का घडतात?

googlenewsNext

नववर्षाच्या पहिल्याच पहाटे राजधानी दिल्ली हादरली. आणखी एक कळी पूर्ण उमलण्यापूर्वीच खुडली गेली. नववर्षाचे आगमन हर्षोल्लासात साजरे करण्याचा उत्साह तिला थेट आयुष्याच्या मावळतीकडेच घेऊन गेला. नववर्षातील जीवनाची स्वप्ने रंगवीत स्कूटरवर घराकडे परतत असताना, पाच दारूड्यांच्या बेफामपणाने तिला तिच्या स्वप्नांसह कारखाली चिरडून टाकले. पहाटेच्या त्या अत्यंत पीडादायक घटनेचे हादरे अजूनही सुरूच आहेत. नवनवे खुलासे होत आहेत. नवनवी तथ्ये समोर येत आहेत. प्रारंभिक माहितीनुसार, या घटनेत मृत्युमुखी पडलेली युवती घराकडे परतत असताना आरोपींच्या कारसोबत तिच्या स्कूटरचा अपघात होऊन ती कारखाली सापडली; परंतु नशेत असलेल्या युवकांनी तिला तसेच फरफटत नेले. त्यामुळे तिच्या हाडांचा अक्षरशः चुराडा झाला. तिच्या अंगावर एकही वस्त्र शिल्लक राहिले नाही.

अंगावर शहारे आणणारे हे दृश्य बघून कुणीतरी ते पोलिसांना कळविले तेव्हा माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना उघडकीस आली. नेहमीप्रमाणे या घटनेतही, अकर्मण्यता, अकार्यक्षमता, संवेदनहीनता ही दिल्ली पोलिसांची गुणवैशिष्ट्ये पुन्हा एकदा समोर आली. पोलिसांनी प्रारंभिक टप्प्यात ज्याप्रकारे हे प्रकरण हाताळले, त्याची निंदा करावी तेवढी थोडीच! प्रारंभिक वृत्तांनुसार, गाडीखाली आलेल्या युवतीला आरोपी पाच किलोमीटरपर्यंत फरफटत घेऊन गेले; पण नव्याने समोर आलेल्या माहितीनुसार, ते अंतर पाच नव्हे, तर १३ किलोमीटर एवढे होते. मावळत्या वर्षाच्या अखेरच्या रात्री तालुका मुख्यालयीदेखील रात्रभर रस्त्यांवर पोलिस बंदोबस्त असतो. मग देशाच्या राजधानीतील एकाही पोलिसाला भर रस्त्यावर माणुसकीची हत्या होताना दिसू नये? घटनेनंतर पोलिस उपायुक्तांनी केलेले वक्तव्य तर फारच असंवेदनशील आहे.

घडलेली घटना हा एक अपघात होता, असे ते म्हणाले. एका युवतीच्या गाडीला पाच दारुडे धडक देतात आणि त्यानंतर तिला तब्बल १३ किलोमीटर कारखाली फरफटत नेतात, ही घटना केवळ एक अपघात? घटनेसंदर्भात जी नवनवी माहिती समोर येत आहे, त्यानुसार घटना घडली तेव्हा युवती एकटी नव्हती, तर तिच्यासोबत एक मैत्रिणही होती, जी किरकोळ जखमी झाली आणि घाबरून घरी निघून गेली. ज्या मैत्रिणीसोबत आपण नववर्षाचे आगमन साजरे करायला जातो, त्या मैत्रिणीला कारखाली फरफटत नेल्यानंतरही पोलिसांना न कळविणे, हे संशयास्पद आहे. त्या दोघींनी एका हॉटेलमध्ये खोली घेतली होती, तिथे त्यांना भेटायला काही पुरुष मित्र आले होते, नंतर त्या दोघींमध्ये भांडण झाले आणि त्यानंतर दोघीही एकाच स्कूटरवर निघून गेल्या, असाही घटनाक्रम आता समोर आला आहे. त्यामुळे संशयाचे धुके अधिकच गडद होते.

अर्थात त्या युवतींच्या वर्तणुकीमुळे पीडित युवतीसोबत जे घडले, त्याचे गांभीर्य कमी होत नाही. शिवाय आता एक नवे ‘सीसीटीव्ही फुटेज’ समोर आले आहे. त्यामध्ये आरोपींची कार आणि युवतींची स्कूटर परस्पर विरुद्ध दिशेने येताना दिसतात आणि कोणताही अपघात न होता निघून जातात. जर हे `सीसीटीव्ही फुटेज’ खरे असेल, तर याचा अर्थ दोन्ही गाड्या पुन्हा एकदा समोरासमोर आल्या असतील आणि तेव्हाच अपघात घडला असेल. हा निव्वळ योगायोग असण्याची शक्यता फार कमी!  मग आरोपी ‘यू टर्न’ घेऊन पुन्हा युवतींच्या गाडीसमोर आले असतील का? तसे असल्यास घडलेली घटना हा अपघात नव्हे, तर घातपातच ! या प्रकरणात दिल्ली पोलिसांप्रमाणेच राजकीय पक्षांनीही असंवेदनशीलतेचे प्रदर्शन घडविले. आरोपींपैकी एक जण भारतीय जनता पक्षाच्या ‘आयटी सेल’शी संबंधित आहे. या मुद्यावरून विरोधी पक्षांनी भाजपला घेरण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

भाजपदेखील प्रत्युत्तर देण्यात मागे नाही. नेमके तथ्य समोर आणून आरोपींना कठोरतम शिक्षा होईल, याची तजवीज करणे, हीच सध्याची सर्वोच्च प्राथमिकता असायला हवी. दुर्दैवाने राजकीय पक्षांना नेमका याच गोष्टीचा विसर पडला असून, प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याची स्पर्धा लागली आहे. हे अत्यंत उद्वेगजनक आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी शालिनी सिंह या कर्तव्यकठोर महिला आयपीएस अधिकाऱ्याकडे सोपविली आहे. ते उत्तमच झाले; पण देशातील इतर महानगरांच्या तुलनेत राजधानी दिल्लीतच अशा नृशंस घटना सातत्याने का घडतात, याचाही गंभीर विचार या निमित्ताने व्हायला हवा !
 

Web Title: Why do such atrocious incidents happen continuously in the capital Delhi?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.