शिकून-सवरून आपण हे असे का वागतो?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 07:51 AM2023-05-22T07:51:05+5:302023-05-22T07:51:13+5:30

आपण सारेच हल्ली खोट्या आश्वासनांना, वाटलेल्या खिरापतीला सहजी बळी पडतो, प्रवाहाबरोबर वाहात जातो, पदव्या घेऊनही अशिक्षितासारखे वागतो. असे का?

Why do we learn to do this? | शिकून-सवरून आपण हे असे का वागतो?

शिकून-सवरून आपण हे असे का वागतो?

googlenewsNext

- डॉ. विजय पांढरीपांडे माजी कुलगुरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
सुशिक्षित म्हणजे नेमके काय? - फक्त शालेय शिक्षण झालेल्या व्यक्तीपेक्षा विद्यापीठाच्या एक-दोन पदव्या घेतलेली व्यक्ती अधिक सुशिक्षित समजायची का? - असे काही नसते, हे आपल्याला अनुभवाने माहिती आहे. आपले, समाजाचे, भले-बुरे कशात आहे, याची जाण आपल्याला आहे का? आपल्याला कशाने आनंद मिळतो, काय केल्याने समाधान मिळते, हा सारासार विचार आपल्याला करता येतो का? हा विवेक आपल्यात आहे का? - प्रत्यक्षात तसे दिसत नाही.

आपण एकीकडे भ्रष्टाचारावर टीका करतो. पण, या व्यवहारात कुठे ना कुठे, कधी ना कधी आपलाही हातभार असतोच. मुलांना प्रवेशासाठी द्यावे लागणारे डोनेशन, नोकरीसाठी, बढतीसाठी शिफारसीचे प्रयत्न याला भ्रष्टाचाराशिवाय दुसरे गोंडस नाव नाही. एखाद्या गोष्टीला विलंब लागत असेल तर उघडपणे मोजले जाणारे जास्तीचे दाम, जादा पैसे मोजून वेगळ्या रांगेतून पटकन देवदर्शन घेणे हाही भ्रष्टाचारच! शिक्षण हे सारे शिकवते का? मुळीच नाही! मग आपण सुशिक्षित कसे? 

आजकाल  आपणच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी जमवलेल्या “माये”च्या सुरस कथा आपण वाचतो. पण, अशाच व्यक्तींना पुन्हा पुन्हा निवडूनही देतो? हे शहाणपणाचे, सुशिक्षिताचे लक्षण आहे का? जागरूक मतदार या नात्याने आपल्याला असलेल्या अधिकारांचा कितीजण योग्य वापर करतात? आपण खोट्या आश्वासनांना, वाटलेल्या खिरापतीला बळी पडतो,  पदव्या घेऊनही अशिक्षितासारखे वागतो. 
घराघरात लहान-मोठ्या कारणाने भांडणारेदेखील सुशिक्षितच असतात. पण, आपले शिक्षणच नव्हे तर  संस्कार, नीती, धर्म, कर्तव्य, सारे सारे विसरून कौटुंबीक स्वास्थ्याला नख लावणारी माणसे सुशिक्षित सोडा, शहाणी तरी असतात का? 

बुवाबाजी, अंधश्रध्देच्या नादी लागलेले धर्मांध अशिक्षित नसतात. पण, आपण जे काही करतो ते विवेकाच्या कसोटीवर उतरणारे नाही, हे माहिती असूनही अनेक मंडळी त्याच त्या चुका करतात. एकीकडे विज्ञान, तंत्रज्ञान शिकायचे अन् दुसरीकडे बुवा-महाराजांच्या नादी लागायचे, ही समाजाची विकृती हास्यास्पद वाटते. पण, हे सर्रास चालते. त्यांना नावे ठेवणारे मूर्ख ठरतात. नास्तिक म्हणून हिणवले जातात. शाळा, कॉलेजात हे थोडीच शिकवतात? मग शिक्षणाच्या, ज्ञानाच्या विरोधात छेद देणारे हे अविचार येतात कुठून? परस्परातील दुजाभाव, द्वेष, तिरस्कार निपजतो, अंकुरतो कुठून? 

जगाला शहाणपण शिकवायला जायच्या आधी सुरुवात स्वतःपासून, आपल्या घरापासूनच करायची असते. आधी आपणच नेमके शिक्षण म्हणजे काय, ज्ञान म्हणजे नक्की काय, पदवीचा नेमका उपयोग काय, बुध्दीचा वापर कसा करायचा, विवेकाचा वापर कसा करायचा हे सारे शिकायला हवे. आपले विचार, आचार, आपले वागणे आधी चांगले हवे. प्रत्येक ॲक्शनला रिॲक्शन दिलीच पाहिजे असे नाही, अरेला कारे केलेच पाहिजे, असे नाही. ऐकून घेणे महत्त्वाचे, संयम महत्त्वाचा! सर्वांगाने विचार करणे, मागचा-पुढचा विचार करणे महत्त्वाचे आहे. त्यातही भविष्याचा विचार जास्त महत्त्वाचा. आपल्यापेक्षा आपल्यावर अवलंबून असणाऱ्यांचा विचार जास्त महत्त्वाचा. संकुचित वृत्ती नको. विश्वचि माझे घर वगैरे न झेपणारी लांब उडीदेखील नको. आपली क्षमता, आपली झेप आपणच ठरवायची.

शेतकी विज्ञान किंवा पर्यावरणशास्त्र न शिकलेल्या शेतकऱ्याला शेती, हवामानाचे ज्ञान जास्त असते. वडीलधारी माणसे घरचे तंटे, विवाद, निष्णात वकिलापेक्षा जास्त हुशारीने, कमी वेळात सोडवू शकतात. नवरा-बायकोचे मतभेद ती दोघेच शांतपणे बसून, विचार करून सोडवू शकतात. त्यांना बाहेरच्या मध्यस्थीची गरज नाही. कुठल्याही डॉक्टरेटची तर नाहीच नाही!
vijaympande@yahoo.com

Web Title: Why do we learn to do this?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.