गुगल कर्मचाऱ्यांना फुकट जेवण का देते? कंपनीच्या या धोरणामागे नेमका हेतु काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 08:34 AM2024-10-21T08:34:43+5:302024-10-21T08:36:27+5:30

काही कंपन्या कर्मचाऱ्यांना सुविधा देताना खळखळ करतात, नको तिथे कंजुषी करतात, पण काही कंपन्या मात्र याबाबत अतिशय उदार असतात. अर्थातच त्याचा फायदा त्यांना होतो.

Why does Google give free lunch to employees? What is the exact purpose behind this policy of the company? | गुगल कर्मचाऱ्यांना फुकट जेवण का देते? कंपनीच्या या धोरणामागे नेमका हेतु काय?

गुगल कर्मचाऱ्यांना फुकट जेवण का देते? कंपनीच्या या धोरणामागे नेमका हेतु काय?

प्रत्येक कंपनीचं आपापलं एक धोरण असतं. अर्थातच प्रत्येक कंपनीचा हेतू जास्तीत जास्त नफा कमावणं आणि आपल्या कर्मचाऱ्यांच्याकडून जास्तीत जास्त उपयुक्त काम काढून घेणं हा असला तरी त्यासाठी ते वेगवेगळे अफलातून मार्ग अवलंबत असतात. बहुतांश कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना पगाराव्यतिरिक्त ज्या काही सवलती देतात, त्याचा हेतू हाच असतो की त्यांनीही आपली उत्पादकता वाढवावी आणि कंपनीला त्याचा फायदा करवून द्यावा.

काही कंपन्या कर्मचाऱ्यांना सुविधा देताना खळखळ करतात, नको तिथे कंजुषी करतात, पण काही कंपन्या मात्र याबाबत अतिशय उदार असतात. अर्थातच त्याचा फायदा त्यांना होतो. आपल्या कर्मचाऱ्यांना ते जेवढं देऊ करतात, त्यापेक्षा त्यांचा होणारा फायदा हा कितीतरी पटींनी अधिक असतो. आता गुगुलचंच घ्या.. संपूर्ण जगभरात ही कंपनी अतिशय प्रसिद्ध आहे. या कंपनीत आपल्याला नोकरी मिळावी यासाठी अनेक होतकरू उमेदवार प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतात. याचं कारण तिथलं कामाचं वातावरण, कर्मचाऱ्यांना दिला जाणारा मोबदला आणि त्याशिवाय सर्वाधिक महत्त्वाचं कारण म्हणजे कर्मचाऱ्यांना तिथे दिल्या जाणाऱ्या सुविधा.

याविषयी ‘अल्फाबेट’चे सीइओ सुंदर पिचाई यांनी नुकताच एक मोठा गौप्यस्फोट केला. त्यांचं म्हणणं होतं, गुगल आपल्या कर्मचाऱ्यांना ज्या सुविधा देतं त्यामागे खूप मोठं कारण आहे. त्यातही गुगल आपल्या कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी अतिशय उत्तम प्रकारचं भोजन देतं, यामुळेही आमच्याकडे काम करण्यासाठी लोक उत्सुक असतात, असं त्यांचं म्हणणं होतं. 
लोकांना घरी जेवण मिळत नाही का?, केवळ ‘फुकट’ जेवण मिळतं म्हणून कर्मचाऱ्यांचा त्याकडे ओढा असतो का? - तर तसं निश्चितच नाही. कंपनीच्या डावपेचांचा हा एक भाग आहे. कर्मचाऱ्यांच्या जेवणावर होणारा खर्च कंपनी ‘खर्च’ मानत नाही. ती इन्व्हेस्टमेंट आहे. खरंतर अतिशय छोटी इन्व्हस्टमेंट, पण यातून कंपनीला मिळणारा फायदा किती तरी अधिक आहे. 
कंपनीत एकत्रित जेवण करताना कर्मचाऱ्यांमध्ये जो संवाद घडतो, त्यातूनच आजवर अनेक सर्जनशील कल्पना कर्मचाऱ्यांना सुचलेल्या आहेत. त्या कल्पना अंमलात आणून कंपनीनं खूप मोठी झेप घेतली आहे, ही खरी गोष्ट आहे. सुंदर पिचाई यांच्या मते, ‘मोफत जेवण’ ही गोष्ट अतिशय किरकोळ वाटत असली, तरी त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सकारात्मकतेत प्रचंड भर पडते. घरी जेवण तयार करण्यासाठी त्यांना किंवा कुटुंबीयांना वेगळा वेळ द्यावा लागत नाही, जेवण कसं असेल याची चिंता करावी लागत नाही, त्याच्या तयारीसाठी लागणारा त्यांचा वेळ वाचतो आणि निश्चिंत मनानं ते कामावर येऊ शकतात. गप्पा मारत एकत्रित जेवण करताना त्यांच्यातला एकोपा वाढतो, उत्पादकता सुधारते, तणाव कमी होतो, नवनवीन कल्पना आकाराला येतात, त्याच्या अंमलबजावणीवर विचार होतो, तिथेच त्यातल्या त्रुटी दाखविल्या जातात, त्यावरही गप्पा मारता मारताच उपाय सुचविले जातात, एकानं एखादी कल्पना सुचविली की त्यावर विचारविनिमय होतो, इतरांच्याही कल्पनाशक्तीला त्यामुळे वाव मिळतो, सर्जनशीलतेत वाढ होते..

केवळ एका मोफत जेवणामुळे कंपनीचा इतका फायदा होतो.. शिवाय त्यासाठी पुन्हा कंपनीलाही वेगळा वेळ द्यावा लागत नाही.. आम्ही कर्मचाऱ्यांना मोफत जेवण देतो, म्हणजे कर्मचाऱ्यांवर उपकार करतो, असं निश्चित नाही, उलट त्याबदल्यात कर्मचारी आम्हाला कितीतरी अधिक देतात.. ‘द डेव्हिड रुबेन्स्टीन शो : पीअर टू पीअर कॉन्व्हर्सेशन्स‘ या मुलाखतीत सुंदर पिचाई यांनी नुकतीच आपले विचार प्रकट केले. या मुलाखतीत त्यांनी अजून बरंच काही सांगितलं असलं, तरी त्यांच्या मुलाखतीतील ‘मोफत जेवण’ या मुद्द्यावरच सध्या संपूर्ण जगभर चर्चा सुरू आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे जगभरातील विविध कंपन्या, तिथलं वातावरण, त्यांचं धोरण आणि तिथे दिल्या जाणाऱ्या सुविधा यावर चर्चा सुरू झाली आहे. मोफत जेवणासारखी क्षुल्लक गोष्ट, पण त्यामुळे कमर्चाऱ्यांच्या मनात सकारात्मकतेची बीजं रोवली जातानाच कंपनीलाही किती मोठा फायदा होतो, सर्वच कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या सुविधांचा प्राधान्यानं विचार करावा, याबाबतच्या चर्चा आता सर्वत्र झडू लागल्या आहेत.

गुगलच्या ‘ऑफर’वर लोकांच्या उड्या

गुगलमध्ये सध्या १,८२,०००पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. गुगल कायम चांगल्या कर्मचाऱ्यांच्या शोधात असते आणि निवड झाल्यावर त्यांना चांगल्या ऑफर्सही दिल्या जातात. प्रत्यक्ष रोख रकमेपक्षाही गुगुलमध्ये ज्या सोयीसुविधा कर्मचाऱ्यांना दिल्या जातात, त्याचंही त्यांना आकर्षण असतं. त्यामुळे गुगल ज्यांना नोकरीची ऑफर देतं, त्यातले तब्बल ९० टक्क्यांपेक्षा जास्त उमेदवार ही ऑफर डोळे झाकून स्वीकारतात अशी गुगलची ख्याती आहे.

Web Title: Why does Google give free lunch to employees? What is the exact purpose behind this policy of the company?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.