कुपोषणाविरोधात एकही मेणबत्ती का पेटत नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 04:38 AM2019-01-23T04:38:55+5:302019-01-23T04:39:03+5:30

कुपोषण समस्या कमी न होण्यामागे आपली व्यवस्था कारणीभूत असली, तरी सगळा दोष तिच्या माथी मारणेही योग्य नाही.

Why does not a candle stand against malnutrition? | कुपोषणाविरोधात एकही मेणबत्ती का पेटत नाही?

कुपोषणाविरोधात एकही मेणबत्ती का पेटत नाही?

Next

- प्रमोद गायकवाड
कुपोषण समस्या कमी न होण्यामागे आपली व्यवस्था कारणीभूत असली, तरी सगळा दोष तिच्या माथी मारणेही योग्य नाही. गावोगावच्या भव्य क्रिकेट टुर्नामेंट्स आणि पदयात्रांच्या धुरळ्यात तरु णाई अखंड बुडालेली असताना, त्याच गावांमधील लाखो कळ्या पोषणाअभावी रोज खुरटत आहेत. ऊठसूठ दुखावणाऱ्या अस्मितांच्या बजबजपुरीत पाचशे मुले मेल्यावरही आपल्या संवेदना जाग्या होत नाहीत, हे कशाचे लक्षण आहे?
मेळघाटात नऊ महिन्यांत पाचशे बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याची बातमी वाचली. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे लोटली, तरी आपण गरीब आदिवासी ग्रामीण जनतेला जगण्यासाठी मूलभूत सुविधा देऊ शकलो नाही, हे खूपच निराशाजनक आहे.
कुपोषण आणि बालमृत्यूसारख्या संवेदनशील विषयाच्या अपयशात काही दोष निर्णय प्रक्रि येत सहभागी असलेल्या शासकीय यंत्रणेचा, काही दोष हा अंमलबजावणी करणाºया प्रशासकीय यंत्रणेचा आणि काही दोष अशिक्षित पालकांचा आहे. या तीनही कड्या जोवर सांधल्या जात नाहीत, तोवर कोणीही कितीही वर्षे कितीही अब्ज रुपये खर्च केले, तरी कुपोषणाचे प्रमाण कमी होणार नाही, याची जाणीव झाली. म्हणूनच तुटलेल्या या कड्या जोडून एक नवी साखळी गुंफण्याचा एक प्रयत्न नाशिक जिल्ह्यात केला गेला. दोन वर्षांपूर्वी नाशिक जिल्ह्यातही ५६ बालके कुपोषणामुळे दगावली होती. या घटनेने व्यथित होऊन सोशल नेटवर्किंग फोरम या संस्थेने बालरोगतज्ज्ञ, आहारतज्ज्ञ, औषध विक्रेते आणि डॉक्टर्स असोसिएशन यांच्या मदतीने कुपोषण निर्मूलनासाठी एक अभिनव प्रायोगिक उपक्र म राबविला. सुनियोजित पद्धतीने काम केल्यास कुपोषणावर मात करणे शक्य आहे का, हे बघण्यासाठी आदिवासीबहुल त्र्यंबकेश्वर तालुक्यात हा प्रयोग केला.
विशेष बाब म्हणजे, या प्रयोगांतर्गत ३५३ कुपोषित मूलांपैकी किमान दोन तपासणी शिबिरांत हजर राहिलेल्या ६५ टक्के मुलांचे वजन केवळ ३ महिन्यांत १ किलोपेक्षा जास्त वाढले. त्यापैकी मृत्यूच्या दारात असलेल्या तीन बालकांना शहरात उपचारासाठी दाखल करून त्यांचा जीव वाचविण्यात आला.
कुपोषण निर्मूलनासाठीचे बहुतांश प्रयत्न हे आहार पुरविण्यापर्यंत मर्यादित आहेत. आहारासोबतच निदान आणि उपचार यावरही भर देणे गरजेचे आहे. बालकांमधील कुपोषणाचे कारण तज्ज्ञ डॉक्टर्सकडून व्यक्तिगत स्तरावर निदान करून घेतले जात नाही, तोपर्यंत त्यावर उपचार होणे कठीण आहे. आदिवासी भागातील शिक्षणाच्या कमी प्रमाणामुळे बरेचदा अस्वच्छता, अनियमित आहार आणि औषधांचा अयोग्य वापर हीसुद्धा कुपोषणाची कारणे आहेत.
कुपोषणावर काम करणाºया अनेक कार्यकर्त्यांना विचाराल, तर ते शासकीय यंत्रणेकडे बोट दाखवतील. हा सुस्तावलेला अजगर जागा करणे अवघड काम आहे. एखाद्या चित्रपटातील कुठले तरी एक दृश्य आपल्याला चुकीचे वाटते, म्हणून ढिगाने तोडफोड करणारा जमाव, कथा-कवितांमधील मजकूर कुणाला तरी आक्षेपार्ह वाटला, म्हणून पुस्तकांची होळी करणारा आपला समाज हजारो गरीब बालक रोज मृत्युमुखी पडत असताना मात्र निद्रिस्त असतो. खेड्यांपाड्यांतील गोरगरिबांची हजारो मुले रोज अन्नपाण्यावाचून मरून जात असताना, शहरातील अन्यायावर निघणाºया मोर्चातील एकही मेणबत्ती त्यांच्यासाठी पेटत नाही, हे दुर्दैव आहे.
( अध्यक्ष, सोशल नेटवर्किंग फोरम)

Web Title: Why does not a candle stand against malnutrition?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.