सेरेना को गुस्सा क्यों आता है..?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 11:39 PM2018-09-10T23:39:54+5:302018-09-10T23:40:02+5:30
अमेरिका या देशाशी संबंधित अनेक बऱ्यावाईट गोष्टी अलीकडे चर्चेत आहेत.
- अमोल मचाले
अमेरिका या देशाशी संबंधित अनेक बऱ्यावाईट गोष्टी अलीकडे चर्चेत आहेत. तेथील राष्ट्रपती डोनॉल्ड ट्रम्प यांच्या सरकारने कृष्णवर्णीयांबद्दल राबविलेल्या अलिखित धोरणाविरोधात कृष्णवर्णीय खेळाडू कॉलिन केपरनिकची जाहिरात चांगलीच गाजली. त्यानंतर, ट्रम्प यांनी पाकिस्तानला दिली जाणारी सुमारे २,१०० कोटी रुपयांची मदत रोखून धरली. या साखळीत क्रीडाक्षेत्रातील एका घटनेची भर पडली आहे. याला निमित्त ठरली, ती अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा. ही स्पर्धा म्हणजे टेनिस विश्वातील महत्त्वाच्या ग्रँडस्लॅमपैकी एक. महिला गटात अमेरिकेची दिग्गज खेळाडू सेरेना विल्यम्स ही विजेतेपदाची दावेदार मानली जात होती. मात्र, अंतिम फेरीत जपानच्या नाओमी ओसाका या युवा खेळाडूने सेरेनापेक्षा सरस खेळ करून अनपेक्षितपणे विजेतेपदावर नाव कोरले. २० वर्षीय ओसाकाच्या या नेत्रदीपक यशाबद्दल तिचे कौतुक व्हायलाच हवे... ते झालेही. मात्र, तिच्यापेक्षा चर्चेच्या केंद्रस्थानी राहिली ती सेरेना. अंतिम सामन्यात रागाच्या भरात पंचांविरुद्ध अपशब्द वापरल्यामुळे तिला तब्बल १७ हजार अमेरिकन डॉलरचा दंड ठोठावण्यात आला. त्यानंतर, बहुतेक माध्यमांमधून सेरेनावर टीकेचा भडिमार सुरू झाला. इतक्या मोठ्या खेळाडूला पराभव पचविता न आल्याबद्दल दूषणे देण्यात आली. यात तथ्य असेलही. मात्र, या घटनेच्या इतर बाजू लक्षात घेणेही आवश्यक आहे.
हा वाद सुरू झाला, तो दुसºया सेटपासून. माघारलेल्या सेरेनाने एका चुरशीच्या क्षणी गुण गमावल्यानंतर रॅकेट मैदानावर आपटली. त्या वेळी पंच कार्लोस रामोस यांनी तिला ताकीद दिली. पुन्हा तीच कृती करून सेरेनाने रॅकेट तोडल्यानंतर पंचांनी प्रतिस्पर्धी ओसाकाला गुण बहाल केला. त्यातच प्रेक्षकांमध्ये बसलेल्या प्रशिक्षकांकडून सेरेनाने टिप्स घेतल्याचा ठपका ठेवून पंचांनी तिच्याविरोधात नाओमीला आणखी गुण बहाल केला. यामुळे सेरेनाचा पारा चढला. त्या वेळी प्रशिक्षक तिला हातवारे करीत होते, हे खरे आहे. मात्र, सेरेनाचे त्याकडे लक्ष नव्हते. पंचांनी या गोष्टीची कुठलीही शहानिशा न करता थेट सेरेनाच्या विरोधात पेनल्टी दिली. यामुळे सामन्यात आधीच माघारलेली सेरेना स्वत:वरील नियंत्रण गमावून बसली... आणि तिने स्त्री-पुरुष भेदभाव करीत असल्याचे पंचांना असभ्य भाषेत सुनावले.
या स्पर्धेत अनेक पुरुष खेळाडूंनी रामोस यांच्यासह अनेक पंचांवर आगपाखड केली; मात्र, त्यांना पेनल्टी लावण्यात आली नाही. सामन्यानंतर सेरेनानेही या मुद्द्याकडे लक्ष वेधले. जागतिक महिला टेनिस संघटना तसेच अमेरिकन टेनिस संघटनेनेही याप्रकरणी पंचांवर उगीच लिंगभेदाचा आरोप केलेला नाही. महान खेळाडू बिली जेन किंग्ज हिचे या संदर्भातील टिष्ट्वट स्त्री-पुरुष समानतेचा बेगडी मुखवटा उघड करणारे आहे. ती म्हणते, ‘महिला भावनेच्या भरात एखादे कृत्य करते, तेव्हा तिला उद्धट, गर्विष्ठ म्हणून हिणवले जाते. तीच कृती पुरुषाने केल्यास तो मात्र स्पष्टवक्तेपणा मानला जातो.’ या प्रकरणी नेमके हेच घडले. लिंगभेद, वर्णभेदाला खेळात थारा नसल्याचे ऐकताना छान वाटते. मात्र, क्रीडाक्षेत्र अशा विकृतींपासून अद्याप पूर्णत: मुक्त झालेले नाही. हे लक्षात घेतले, की ‘सेरेना को गुस्सा क्यों आता है?’ या प्रश्नाचे खरे उत्तर सापडते.
(वरिष्ठ उपसंपादक, लोकमत पुणे)