लेखक का बोलतो? - त्याचे आतडे पिळवटते म्हणून!

By नम्रता फडणीस | Published: July 12, 2022 07:48 AM2022-07-12T07:48:27+5:302022-07-12T07:50:12+5:30

कुणाला काही वाटत नाही, हे खरे नव्हे! परिस्थितीला शरण जाण्याशिवाय पर्याय नाही, असे वाटल्याने लेखक मंडळी कदाचित स्वस्थ बसत असतील.

Why does the author speak spacial article on writers what they think while writing | लेखक का बोलतो? - त्याचे आतडे पिळवटते म्हणून!

लेखक का बोलतो? - त्याचे आतडे पिळवटते म्हणून!

Next

वसंत आबाजी डहाके,
ज्येष्ठ साहित्यिक

आज हे इतके स्वस्थ राहणे आपल्याला परवडणार आहे का? आपल्याला स्वस्थता लाभली आहे ते आपले स्वास्थ अजून किती काळ टिकून राहणार; की तो एक भ्रमच आहे? मनुष्य चालताना त्याला अनेकदा विस्मरण होते की आपण कुठून आलो, कुठे चाललो आहोत आणि आपल्याला कोणत्या दिशेला जायचं आहे; त्याला काही कळत नाही. तो असाच उगाचच भटकत राहतो.

जेव्हा दुसरा माणूस त्याला स्पर्श करतो, तेव्हा हे बदलते. माणसाचा स्पर्श झाला की त्याला भान येते की आपण आहोत. आपल्या अस्तित्वाची त्याला जाणीव होते. आता हा प्रश्न आहे की, माणसाचा हा स्पर्श हरवला आहे की काय?  जवळच्या पिढीत तो चेहरा शोधण्याची किमान धडपड तरी आहे. आसाराम लोमटे, कृष्णा खोत, किरण गुरव अशी पुष्कळ नावे सध्याच्या पिढीमध्ये दिसतात, जे त्या माणसांचा शोध घेत आहेत. त्या सामान्य माणसाची सध्याची स्थिती काय आहे, ते आपल्याला समजावून सांगत आहेत. 

प्रत्यक्ष आणि वास्तव यातून लेखक सामान्य माणसाचा शोध घेत आहे. सध्याच्या काळातले अनेक कवी या स्थितीचा वेध घेत आहेत, ते खिन्न आणि उद्विग्नही होत आहेत. आता अस्वस्थ शतकाची कविता लिहिण्याचे दिवस संपले; आता स्वस्थ शतकातील कविता लिहिली जाते आहे, असे म्हणण्यात मला फार काही तथ्य वाटत नाही. कारण आत्तादेखील अस्वस्थ काळातलीच कविता लिहिली जात आहे. 

लेखक का बोलतो? - सभोवतालचे वास्तव पाहून त्याचे आतडे पिळवटते, तो अस्वस्थ होतो, म्हणून बोलतो. सामान्य माणसे कोणत्या प्रकारचे जीवन जगत आहेत, त्यांच्या आयुष्यात काय घडते आहे, कोरोनाच्या काळात भर उन्हात ती कशी चालत होती, ती कशी आपल्या घरापर्यंत पोहोचली नाहीत, पोहोचल्यानंतरही गावाची दारे त्यांच्यासाठी कशी बंद होती, त्यांना किती हालअपेष्टा आणि समस्यांना तोंड द्यावे लागले हे सगळे लेखक पाहात असतो. म्हणून त्याला बोलावेसे वाटते. सुन्न करणारी शांतता त्याला ऐकू येते म्हणून तो बोलतो. 

त्याच्या मनातल्या भयाला कारण ठरणाऱ्या अनेक गोष्टी असतात. भय स्वत:चे काय होईल याचे नाही तर आपल्यावर अवलंबून असणाऱ्यांचे काय होईल, याची भीती त्यांच्या मनात असते. म्हणून बोलावेसे वाटले, तरी अनेकदा लेखक गप्प राहणे पत्करतात. सध्याच्या वातावरणात सगळे उत्तम चालले आहे, असे कुणाला वाटत असेल असे मला वाटत नाही. चुकीचे घडताना दिसत असूनही परिस्थितीला शरण जाण्याशिवाय पर्याय नाही, असे वाटल्याने लेखक मंडळी कदाचित स्वस्थ बसत असतील.  

भारत सासणे यांनी त्यांच्या साहित्य संमेलनाच्या  अध्यक्षीय भाषणात मार्मिक आणि सूचकपणे काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी  भ्रमयुगाचा मुद्दा मांडला आहे. एक अबोध दहशत, भीती आणि आतंक असे शब्द वापरले आहेत. हे भय आपण अनुभवत आहोत, पण ते आपण मान्य करत नाही. 

आतून भय वाटत असले तरी आपण बाहेरुन असा आव आणतो की, आपल्याला कसलेच भय नाही. कोणतीही भीती आपल्याला वाटत नाही, पण  हे भय माणसे आपल्या आत जगत असतात. जगण्याला हे भय वेढून आहे. लेखक टोकदार अस्वस्थतेच्या शिंगाशी झुंज देत असतो. ही काळरात्रीची सुरुवात आहे, असे ते म्हणतात. सासणे यांचे हे शब्द कदाचित टीकाकारांना झोंबले असतील, अत्यंत प्रक्षोभकही असतील, पण हेच जर वास्तव असेल तर? 
- या सुन्न करणाऱ्या शांततेत एक शब्द तरी उच्चारायला हवा!

(‘दक्षिणायन’ या संस्थेतर्फे पुण्यात ‘लेखक का बोलतो?’ या विषयावर झालेल्या परिसंवादात केलेल्या विस्तृत मांडणीचा संपादित सारांश) 
शब्दांकन : नम्रता फडणीस

Web Title: Why does the author speak spacial article on writers what they think while writing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.