गोव्यातल्या ‘मद्य संस्कृती’ने स्थानिकांचे पित्त का खवळते?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 07:06 AM2022-08-23T07:06:34+5:302022-08-23T07:07:59+5:30
सोळा लाख लोकसंख्येच्या गोव्यात दहा हजार मद्यालये आहेत. ही मद्य संस्कृती पर्यटकांना आवडते; पण, गोवेकरांना मात्र हा ‘शिक्का’ आता नकोसा झाला आहे !
सदगुरू पाटील
निवासी संपादक, लोकमत, गोवा
सोळा लाख लोकसंख्येच्या गोव्यात दहा हजार मद्यालये आहेत. ही मद्य संस्कृती पर्यटकांना आवडते; पण, गोवेकरांना मात्र हा ‘शिक्का’ आता नकोसा झाला आहे !
गोव्याचे मनमोहक समुद्रकिनारे पाहण्यासाठी जर तुम्ही किनारपट्टीने चालत चालत पुढे जात राहिलात, तर सगळीकडे मोठ्या संख्येने हॉटेल्स व बार, रेस्टॉरंट्स दिसतील. सोळा लाख लोकसंख्येच्या गोव्यात दहा हजार मद्यालये आहेत. पोर्तुगीज काळात गोव्याच्या ख्रिस्ती धर्मीय घरांमध्येच एका खोलीत बार तयार करण्याची पद्धत सुरू झाली. ती अजून कायम आहे. देश- विदेशातील पर्यटकांना गोव्यातील मद्य संस्कृती आवडते. बडे राजकारणी, धनिक, क्रिकेटपटू व बॉलिवूडच्या कलाकारांनी गोव्याच्या किनारपट्टीत प्रचंड गुंतवणूक केलेली आहे. वीस वर्षांपूर्वी किनारी भागात जमिनीचे दर कमी होते. सदनिकांचे दर कमी होते. आता दर दहापट वाढलेले आहेत. जमीन ७० ते ९० हजार रुपये चौरस मीटर दराने विकली जात आहे. साऱ्या पक्षातील राजकारण्यांचे बंगले, व्हिला, सदनिका आणि जमिनी गोव्यात आहेत. वाढता भाव पाहून काहीजणांनी आपल्या जमिनी अलीकडेच विकल्या. गोव्यात सेकंड होम असावे या इच्छेपोटी देश- विदेशातील धनिक निदान एखादा फ्लॅट तरी गोव्यात खरेदी करतातच. आरटीआय कार्यकर्ते व हायकोर्ट वकील आयरिश रॉड्रिग्ज यांच्या मते देशातील काही राजकारण्यांनी बेनामी पद्धतीने गोव्यात मालमत्ता घेऊन ठेवल्या आहेत.
आसगाव हे उत्तर गोव्याच्या किनारी भागातील देखणे गाव. एकेकाळी कृषी संस्कृतीसाठी बार्देश प्रसिद्ध होता, आता पर्यटन वाढीमुळे मद्याचे ग्लास सगळीकडे फेसाळत आहेत. स्मृती इराणी ज्यामुळे वादात सापडल्या, ते प्रकरण याच आसगावमध्ये सुरू झाले. सिली सोल्स हे रेस्टॉरंट तथा मद्यालय येथेच आहे. काँग्रेस नेत्यांच्या मते सिली सोल्स इराणी यांच्या कुटुंबीयांकडून चालविले जाते, मात्र इराणी यांनी या विषयावरून न्यायालयात धाव घेतली व आपल्या मुलीचा किंवा कुटुंबीयांचा या बार प्रकरणी कोणताही संबंध येत नसल्याचा दावा केला आहे. गोव्यात सरकार भाजपचे असले तरी, भाजप सरकारच्याच विविध यंत्रणा सध्या चौकशीचे काम करू लागल्या आहेत. कारण चौकशी झाली नाही तर आपण उच्च न्यायालयात जाऊ अशी भूमिका आयरिश रॉड्रिग्ज यांनी घेतली आहे. रॉड्रिग्ज हे पूर्वी विविध न्यायालयांत अनेक खटले जिंकलेले आहेत. गोवा सरकारच्या नगर नियोजन खात्यानेही प्राथमिक चौकशी सुरू केली आहे.
- या ताज्या वादामुळे गोव्याची बार संस्कृती, राष्ट्रीय स्तरावरील राजकारण्यांच्या गोव्यातील मालमत्ता असे विषय चर्चेत आले आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी सिली सोल्ससमोर जाऊन आंदोलन केले. गोवा भाजपने मात्र पूर्ण मौन पाळले आहे. मीडियाने वारंवार विचारले तरी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या वादावर बोलणे आतापर्यंत टाळले. स्मृती इराणी मात्र म्हणतात की- आपण राहुल गांधी यांचा यापूर्वी लोकसभा निवडणुकीत पराभव केलेला असल्याने गांधी घराणे आपल्याला व आपल्या १८ वर्षीय मुलीला लक्ष्य बनवत आहे. काँग्रेसचे गोव्यातील नेते अमरनाथ पणजीकर व आरटीआय कार्यकर्त्यांनी स्मृती इराणी यांना सार्वजनिक चर्चेसाठी या असे आव्हान दिले. एकूणातच काय, देशभरात चर्चा थंडावली असली, तरी हा विषय गोव्यात मात्र अद्याप शांत झालेला नाही. इथे त्यावरून वातावरण तापते आहे.
या वादाने गोव्यापासून दिल्लीपर्यंत धुरळा उडविला. त्यानिमित्ताने अनेक तपशील उघड होत आहेत. आधी पर्यटनाच्या वाढीमुळे आनंदित असलेल्या स्थानिक गोवेकरांना आता गोव्याचे मूळ स्वरुप हरवत चालल्याचे वैषम्य पोखरू लागले आहे. त्या काळजीला या ताज्या वादाने अनेक नवे आयाम मिळाले आहेत.
sadguru.patil@lokmat.com