मराठी माणसांनाच मराठी नाटकांचं कौतुक का नाही?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 10:52 AM2022-11-12T10:52:58+5:302022-11-12T10:53:24+5:30
नाटकात सतत काहीतरी घडत असतं, मोडतोड होत असते. वाहणाऱ्या त्याच पाण्यात दोनदा पाय बुडवता येत नाही; तसंच हे!
सतीश आळेकर, ज्येष्ठ रंगकर्मी, नाटककार
नाटकात सतत काहीतरी घडत असतं, मोडतोड होत असते. वाहणाऱ्या त्याच पाण्यात दोनदा पाय बुडवता येत नाही; तसंच हे!
मायबाप रसिकहो! बालगंधर्व प्रेक्षकांना मायबाप म्हणत असत. मी काही त्यांच्याएवढा मोठा नाही; पण माझी भावना तीच आहे. माझी नाटकं फारशी लोकप्रिय नाहीत. नेम धरून बघावी लागतात. अत्यंत कमी प्रयोग झालेत. जास्त म्हणजे 'महानिर्वाण, त्याचेही ४००-५०० प्रयोग झालेत. 'दुसरा सामना' या एकमेव व्यावसायिक नाटकाचे दोन-अडीचशे प्रयोग झाले. 'बेगम बर्वे' चं अजूनही नाव घेतलं जातं; पण १०० प्रयोगही झाले नाहीत. बाकीच्या नाटकांचे फक्त पन्नास-साठ प्रयोग झाले असतील. इतक्या कमी प्रयोगानंतरही माझ्या नाटकांची प्रेक्षकांनी कधी टिंगल, चेष्टा नाही केली. मी लिहिलेलं समजून घेतलं. हा परिपक्वपणा मराठी प्रेक्षकांमध्ये आहे. ही परंपरा विष्णुदास भावेंनी सुरू केली.
१८५६ साली महात्मा फुल्यांनी 'तृतीय रत्न' नाटक लिहिलं. दुर्दैवाने १००-१५० वर्षे ते प्रसिद्धच झालं नाही; पण त्यांच्यासारख्या विचारवंतालाही वाटलं, माझा विचार मांडण्यासाठी नाटक हे हत्यार म्हणून वापरता येऊ शकेल का? १९८४ साली बाबा आढावांनी पुरोगामी सत्यशोधक नियतकालिकात या नाटकाची संहिता पहिल्यांदा प्रसिद्ध केली. त्यात चातुर्वण्यावर कोरडे ओढले होते.
नाटकातून प्रचार केलेला प्रेक्षक कधीच मान्य करत नाहीत. नाटक प्रवाही असतं. सतत काहीतरी घडत असतं, मोडतोड होत असते. प्रत्येक प्रयोग त्याच ताकदीने होत नाही. वाहणाऱ्या त्याच पाण्यात दोनदा पाय बुडवता येत नाही; नाटकाचं तसंच आहे.
आता वयाच्या ७४ व्या वर्षी माझ्या लक्षात येतं की, आपण परंपरा नाकारत होतो म्हणजे तिचा अर्थ लावत होतो. चेष्टा करून परंपरा तुटत नाही. मेलेला माणूस कीर्तन करतो, हे नाटकात चालतं. तो कीर्तनाची चेष्टा करत नाही. महानिर्वाण नाटकात नचिकेत देवस्थळी खरोखरच कीर्तन करतो. घाशीराम कोतवालमध्ये लोक खरोखरच खेळ म्हणून नाचतात. लावणी खरोखरची होऊन जाते. तिची चेष्टा होत नाही. परंपरा व नवतेच्या झगड्याची सुरुवात विष्णुदास भावे यांनी पहिल्यांदा केली. नाटकाचा, कलेचा व्यवसाय होऊ शकतो, हे दाखवलं. नटाला बांधून ठेवणारा करारही केला. तो करार आम्ही आजही नाट्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांना वाचायला देतो.....
मराठी नाटकांविषयी महाराष्ट्राबाहेर अतिशय चांगलं बोललं जातं. मी. जब्बार, मोहन आगाशे जेव्हा सिक्कीममध्ये गंगटोकला शिकवायला गेलो, तेव्हा तेथील विद्यार्थ्यांनी मराठी नाटकांच्या जाहिराती लॅपटॉपवर दाखविल्या. अडीच-तीन लाखांचं उत्पन्नही सांगितलं. 'चारचौघी'चे प्रयोग परत सुरू झालेत, हेही सांगितलं. ३००-५०० रुपयांचं तिकीट काढून प्रेक्षक नाटक बघायला येतात हे अचंबित करणारं आहे, असं त्यांना वाटतं, पण आपल्या लोकांना काही तसं वाटत नाही. आपण त्यांच्यापासून प्रेरणा घ्यायला हवी.
आमचं एक नाटक पाहिल्यानंतर बाळ कोल्हटकरांनी 'आम्हालाही नाटक लिहून द्या' अशी विनंती केली होती. त्या बाजूची नाटकं वाईट असतात असे नाही; पण मला काही तसं लिहिता आलं नाही. प्रभाकर पणशीकरांच्या नावे दुसरा पुरस्कार मला मिळाला आहे. त्यांच्याशी आमचं घाशीराम कोतवालवरून भांडण होतं; पण कधी कडवटपणा आला नाही. कमीत कमी मानधनात आणि प्रयोगात काम करणारे कलाकार आम्हाला मिळाले. १९९६ साली वसंतराव गोवारीकरांनी मला पुणे विद्यापीठात आणलं. तिथे नाट्यशास्त्र विभागाची निगराणी मी केली. माझे विद्यार्थी आज मालिका, चित्रपटात आहेत. कोणत्याही पायाभूत सुविधा नसताना, तिथे मनाजोगे प्रयोग करण्यासाठी स्वायत्तता विद्यापीठाने दिली.
भावे पदकासारख्या पुरस्कारानंतर लोकांच्या मनात घंटा वाजत असेल, चला तुमचा वर्तमानकाळ आता संपतोय; पण अजून मी पूर्णतः रिटायर होणारा नाही. नवं नाटक सुचतंय. 'ठकीशी संवाद' नावाचं एक नाटक लिहिलंय. २०२३ मध्ये ते रंगभूमीवर येईल, तेव्हा भेटूया!
(रंगभूमी दिनी सांगली येथे प्रतिष्ठेच्या विष्णुदास भावे गौरव पदकाचा स्वीकार करताना व्यक्त केलेले मनोगत.)
शब्दांकन : संतोष भिसे, लोकमत, सांगली