तुमचा मुलगा आणि सुनेला तुमच्या सोबत का राहायचे नाही?

By संदीप प्रधान | Published: January 30, 2024 10:37 AM2024-01-30T10:37:58+5:302024-01-30T10:38:21+5:30

Family: बदलत्या काळात मुले, ज्येष्ठ नागरिकांच्या सांभाळाचे प्रश्न जटिल होत जाणार! ‘तरुण’ भारत उतरत्या वयात सरकेल, तेव्हा ज्येष्ठांचे काय?- हा प्रश्न येईलच!

Why don't your son and daughter-in-law want to live with you? | तुमचा मुलगा आणि सुनेला तुमच्या सोबत का राहायचे नाही?

तुमचा मुलगा आणि सुनेला तुमच्या सोबत का राहायचे नाही?

- संदीप प्रधान
(वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत, ठाणे)

‘वेगळं व्हायचंय मला’ असे घरातली सून म्हणाली किंवा लग्न झाल्यावर आपण नवे घर घेतल्याचे सांगून घराबाहेर पडलेला मुलगा जर आपल्या आई-वडिलांची काळजी घेत नसेल, त्यांची विचारपूस करत नसेल तर अशा वारसांना आई-वडिलांच्या स्थावर मालमत्तेमधील छदाम मिळणार नाही, असा ठराव सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील नरवाड ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेने नुकताच केला. याआधीही असे ठराव काही ग्रामपंचायतींनी केले आहेत. त्याचवेळी झारखंड उच्च न्यायालयाने वृद्ध सासू-सासरे, आजेसासू व आजेसासरे यांची सेवा करणे ही भारतामधील सांस्कृतिक प्रथा असून, महिलांसाठी ते ‘घटनात्मक बंधन’ असल्याचा निवाडा दिला आहे. ‘आई-वडिलांची सेवा करीत नाही’, म्हणून पत्नीपासून विभक्त होण्याच्या एका प्रकरणात न्यायालयाने हा निवाडा केला. 

या दोन घटनांमुळे वास्तव जीवनातील कौटुंबिक कलहांपासून टीव्हीच्या पडद्यावरील सासू-सुनेच्या भांडणाचे अतिरंजित चित्रण करणाऱ्या मालिकांपर्यंत सर्वच ठिकाणी चर्चेत असलेल्या नातेसंबंधांचा मुद्दा पुन्हा एकवार ऐरणीवर आला. ‘एकत्र कुटुंब पद्धती आदर्श की विभक्त कुटुंब पद्धती’, हा सनातन वाद आहे. या दोन्ही कुटुंब पद्धतींचे काही फायदे व काही तोटे आहेत. कुटुंब ही व्यवस्था असून, ती व्यवस्था राबवणारे ती कशा पद्धतीने राबवतात यावर तिचे यशापयश ठरते. काहींना हुकूमशाही आवडते. अर्थात ती आवडणाऱ्यांना त्या व्यवस्थेत स्वत:ला हुकूमशहा व्हायचे असते. आता अशी मनोवृत्ती असलेली व्यक्ती एकत्र कुटुंब पद्धतीत कुटुंबप्रमुख झाली तर काय होईल याची कल्पनाही न केलेली बरी. लोकशाही व्यवस्थेतही ती राबवणाऱ्यांनी ‘चेक आणि बॅलन्स’ यांचे संतुलन राखले तरच ही व्यवस्था यशस्वी होते.

कौटुंबिक कलह प्रकरणे हाताळणारे पोलिस अधिकारी सांगतात,  ५० ते ६० टक्के प्रकरणात ‘एकत्र राहायचे नाही’ ही कुटुंबातील एका सदस्याची भूमिका हेच वादाचे कारण असते. एकत्र कुटुंबातील व्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच आधुनिक जीवनशैलीला तसा डाचणाराच! त्यात सोशल मीडिया ग्रुपवरील (अति,सहज) संपर्क, डेटिंग ॲप वगैरेंचा वापर वाढल्याने संशय, अविश्वास वाढीस लागला आहे. अनैतिक संबंधांच्या प्रकरणातून कुटुंबात तणाव निर्माण होणे टीव्हीच्या पडद्यावरून घरात उतरताना दिसते आहे. 

मानसशास्त्रज्ञांच्या मतानुसार, विभक्त कुटुंब पद्धतीकडे आतापर्यंत ‘शहरातल्या शिकलेल्यांचे फॅड’ म्हणून पाहिले जात होते. पण, आता ग्रामीण भागातही ही पद्धत रुढ होतेय. एकत्र कुटुंब पद्धतीत वयाने धाकटे, बुद्धी आणि आर्थिक क्षमतेने दुबळे यांची कुचंबणा व्हायची. महिला, मुली यांच्या मानसिक घालमेलीने मराठी साहित्याला सत्तर, ऐंशीच्या दशकात खूप रसद पुरवली. देशात जागतिकीकरण व महिला चळवळींनी जोर धरल्यावर विभक्त कुटुंब पद्धती स्वीकारली गेली. ‘एकत्र की विभक्त कुटुंब पद्धती’ हा धनिकांपासून गोरगरिबांपर्यंत साऱ्यांच्या जीवनाला स्पर्श करणारा वाद आहे. समाजातील गोरगरीब कुटुंबात आर्थिक कारणांमुळे एकत्र कुटुंब पद्धती लादली जाते. वृद्ध आई-वडिलांना वेगळे ठेवणे, त्यांच्या सेवेकरिता खासगी व्यक्तीची नियुक्ती करणे हे परवडत नाही. दिवसभर कष्ट केल्यावर कसेबसे घर चालते. अशा कुटुंबातील कर्त्यांना आपले मन मारून जगावे लागते. याखेरीज आपण ना घरातील वृद्धांच्या ना लहान मुलांच्या इच्छा पूर्ण करू शकतो, अशी रुखरुख लागलेली असते. मध्यमवर्गीय कुटुंबांनी विभक्त कुटुंब पद्धती स्वीकारली खरी, परंतु  वृद्ध आई-वडिलांना आपल्यासोबत ठेवता न आल्याचा अपराधभावही सोसला. त्यातून एकेकटेच अपत्य असलेल्यांच्या वयाचीही मध्यान्ह आता उलटली आहे. अशा परिस्थितीत मुलांचे लग्न झाल्यावर दोघा तरुण विवाहितांना दोघांच्या मिळून चार आई-वडिलांचा सांभाळ करावा लागतो. श्रीमंत, अतिश्रीमंत कुटुंबात आर्थिक मर्यादा नसल्याने काही प्रश्न सोपे होतात. परंतु, वृद्ध, आजारी यांच्या एकाकीपणाची समस्या कौटुंबिक कलहाचा मुद्दा उरतोच.

भारतीय संस्कृतीने घालून दिलेल्या कुटुंबरचनेचा जगभरात आदर केला जात असला, तरी ज्यांना त्या व्यवस्थेचे काच सोसावे लागतात आणि ज्यांना व्यक्ती-स्वातंत्र्यापलीकडे अन्य काहीच महत्त्वाचे वाटत नाही त्यांना नुसते उपदेशाचे डोस पाजून  हा प्रश्न सुटणारा नव्हे. बदलत्या समाजरचनेत मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सांभाळाचे प्रश्न जटिल होत जाणार आहेत. स्त्रिया मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडून काम करू लागल्या, तेव्हा आपण पाळणाघरांची उत्तम व्यवस्था उभी करण्यात समाज म्हणून अयशस्वीच झालो. स्त्रियांनी ही कसरत कशीबशी निभावती ठेवली... आताचा तरुण भारत हलके हलके उताराच्या वयात सरकेल, तेव्हा ज्येष्ठांचे काय, हा प्रश्न अधिक गंभीर होऊन आपल्यासमोर येणार आहे.
sandeep.pradhan@lokmat.com

Web Title: Why don't your son and daughter-in-law want to live with you?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.