काँग्रेसवाल्यांच्या हिमतीवर हे शंकेचे बोट का?
By विजय दर्डा | Published: July 19, 2021 06:53 AM2021-07-19T06:53:31+5:302021-07-19T06:54:24+5:30
‘डरपोक, लालची लोकांनी पक्ष सोडावा, हिंमतवानांनीच पक्षात राहावे’, असे राहुल गांधी म्हणतात, याचा अर्थ काय?
- विजय दर्डा
राहुल गांधी यांच्या एका वक्तव्यावर राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. “डरपोक, लालची असतील त्यांनी पक्ष सोडून जावे, हिंमतवान असतील त्यांनी पक्षात राहावे’’, असे राहुल म्हणाले. ते असे का म्हणाले असतील, याची कारणे शोधत लोक विश्लेषण करताहेत. राहुल यांचे म्हणणे अगदी स्पष्ट असून ज्या २३ नेत्यांनी पक्षात बंडाचा झेंडा उभारला त्यांना उद्देशून ते आहे, हे नक्की!
काँग्रेसमध्ये असा बंडाचा आवाज काही पहिल्यांदा उमटलेला नाही. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्या काळापासून तो उठत आला आहे. असा आवाज खुद्द इंदिरा गांधी यांनीही उठवला होता आणि पुढे त्यांच्याविरुद्धही बंडाची भाषा झालीच! काँग्रेसचा इतिहास पाहिला तर असे दिसेल की, फिरोज गांधी, चंद्रशेखर, मोहन धारिया, कृष्णकांत, रामधन अशा अनेकांनी वेगवेगळ्या वेळी काँग्रेस पक्षात आपले वेगळे म्हणणे मांडले, वेगळी भूमिका घेतलेली आहे. असे झाले, तेव्हा त्यांनाही बंडखोर म्हटले गेले. गुलाम नबी आझाद यांचाच प्रश्न असेल तर त्यांनीही हे पहिल्यांदाच केलेले नाही . त्यांनी सीताराम केसरी आणि नरसिंह राव यांच्याविरुद्धही आवाज उठवला होता. मंत्रिमंडळात राहून उठवला होता. असे सूर उमटतात तेव्हा त्याची काही कारणे असतात. अर्थात कारण आहे, म्हणजेच प्रश्न आहे, म्हणजे मग उत्तरही असले पाहिजे. ज्योतिरादित्य शिंदे आणि जितीन प्रसाद यांनी पक्ष सोडण्याचा विषय असेल तर, हेही काही पहिल्यांदा घडलेले नाही. काँग्रेस श्रेष्ठींनी ज्यांना मुख्यमंत्री, मंत्रिपदे दिली त्यांनीही पक्ष सोडल्याची उदाहरणे दिसतात. प्रत्येक जण पक्ष सोडण्याची कारणे देतो. आज शिंदे, प्रसाद पक्षाच्या बाहेर पडले, हा निर्णय त्यांनी केवळ सत्तेच्या लोभाने घेतला, असे मी मुळीच म्हणणार नाही. पक्षाशी असलेली निष्ठा, समर्पण याबरोबरच प्रत्येकाचा म्हणून एक पुरुषार्थ असतो. फार घुसमट कोणी सहन करू शकत नाही. मग तो पक्ष असो, कुटुंब असो, किंवा संघटन. सगळीकडे मोकळेपणाने विचार मांडण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. काँग्रेसची हीच परंपरा आहे. आणि खुल्या अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य तर घटनेनेच दिले आहे. कुकरची शिटी झाल्यावर जर वाफ निघून नाही गेली तर वाफेच्या दाबाने कुकर फुटतो हे आपल्याला माहिती आहे. घुसमट सहन करण्याचीही एक सीमा असते. पक्ष कोणीही सोडून जावो, हे समजून, जाणून घेतले पाहिजे की, पक्षाबद्दल इतकी वर्षे निष्ठा ठेवणारे शेवटी असे का करतात? जर विरोधाचा स्वर उठत असेल तर त्यामागे कारणे काय, याचा थोडा विचार केला पाहिजे. काँग्रेसचे काही ठीक चाललेले नाही, हे कोणीही नाकारणार नाही.
पण एक पत्रकार म्हणून माझे आकलन, माझा आडाखा असे सांगतो, की सत्तेच्या सारीपाटावरचे फासे पालटण्याची क्षमता आजही काँग्रेसकडे आहे. भाजपच्या मनात कोणाविषयी धसका असेल तो प्रादेशिक पक्षांचा नव्हे तर काँग्रेसचा आहे. गांधी परिवाराला, राहुल, प्रियांकाला भाजप घाबरुन आहे. कारण या लोकांनी मनावर घेतले तर ते पक्षात अमाप ऊर्जा निर्माण करू शकतात. तशा क्षमता त्यांच्यात आहेत. त्यांच्याजवळ इतिहास आहे; नाव- विश्वास- त्याग- तपस्या सारे काही आहे.
राजकारणात हारजीत तर चालतेच. पण, राहुल यांच्या नेतृत्वाखाली पक्ष लागोपाठ दोन निवडणुका हरत असेल तर, त्याचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन निर्भयपणे खुल्या वातावरणात झालेच पाहिजे. मनमोहन सिंग यांनी राहुल यांना पंतप्रधान करण्याचा प्रस्ताव सोनियांसमोर स्वत: ठेवला होता, पण, राहुल यांनी साफ नकार दिला. त्यांनी मंत्रिपद, पंतप्रधानपद, किंवा विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारले असते तर, देशासमोर त्यांची प्रशासनिक क्षमता, नवनिर्माणाची ताकद सिद्ध झाली असती. पण, त्यांनी यातले काहीही स्वीकारले नाही त्यामुळे त्यांच्या या क्षमता देशासमोर आल्याच नाहीत. आता तर राहुल पक्षाची जबाबदारी घ्यायलाही तयार नाहीत. भाजपाने आजवर या सर्व घटनाक्रमाचा भरपूर फायदा घेतला आहे.
भाजपाचा प्रचार नेहरू- गांधी परिवाराविरुद्ध केंद्रित आहे. जो शक्तिशाली, धैर्यवान असेल, खंबीर नेता असेल त्याच्यावरच हल्ला करून त्याला कमजोर, जमीनदोस्त करणे हीच तर रणनीती असते. एकदा नेता बेहाल झाला, की सैन्य मग आपोआप पळून जाते. याच न्यायाने काँग्रेस आणि गांधी परिवाराची प्रतिमा मलीन करण्यात भाजपा यशस्वी झाला. आणि काँग्रेसचे जे अन्य नेते होते त्यांनी भाजपचे हे प्रयत्न हाणून पाडण्याचे प्रयत्नही केले नाहीत. खरेतर, ती जबाबदारी केवळ गांधी परिवाराची नव्हती; पूर्ण पक्षाची होती. त्यात काँग्रेसी असफल ठरले.
काँग्रेसमध्ये बंडाचा आवाज उठवणाऱ्या त्या २३ जणांनी ही जबाबदारी का उचलली नाही, असाही प्रश्न आहेच. संपूर्ण ताकदीने ते पुढे का आले नाहीत? आज जगावर जसा कोरोनाचा हल्ला झाला तसा हल्ला समाज माध्यमातून गांधी परिवारावर भाजपने केला. तेव्हा त्याला उत्तर देण्याचे काम या २३ लोकांनी का केले नाही? ते सर्व मोठे नेते गप्प राहून बघत का बसले? राज्यसभेत राजीव गांधींवर आरोप झाले तेव्हा उत्तर देण्याची जबाबदारी काँग्रेसजनांची नव्हती का? तिथे जया बच्चन पुढे आल्या त्यांनी तीव्र विरोध केला. काँग्रेसजनांनी मात्र लाजिरवाणे मौन बाळगले.
काँग्रेसला हे वागणे बदलावे लागेल. एकमेकांचे पाय ओढण्याची प्रवृत्ती बंद केली तरच भविष्य उज्ज्वल होईल. सध्याच्या राजवटीला पर्याय देण्याची ताकद केवळ आपल्याच पक्षात आहे, हे काँग्रेसजनांनी विसरू नये. उत्तरप्रदेश, बिहार, गुजरात आणि पश्चिम बंगालची गोष्ट बाजूला ठेवू. या राज्यांमध्ये काँग्रेस कमजोर आहे. पण, बाकी ठिकाणी पक्ष आहे. राष्ट्रीय स्तरावर पक्षाकडे आजही तब्बल ३० टक्के मते आहेत. भाजपची १० टक्के मते जरी कापली तरी पक्षाकडे सत्ता येईल. ही ताकद अन्य कोणात नाही. म्हणून तर भाजप सतत काँग्रेस आणि गांधी परिवारावर हल्ले करत आहे. या पक्षाने फक्त एक उदाहरण लक्षात ठेवावे, १९७७ साली राजकीय दृष्ट्या पक्ष पुरता संपला होता तरी केवळ २८ महिन्यात इंदिरा गांधी यांनी बाजी पालटवली. हे आजही शक्य आहे!