व्यक्त व्हायचं ते कशाला? हल्ले करायला??

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 06:22 AM2021-08-07T06:22:59+5:302021-08-07T06:24:27+5:30

Sunil Sukthankar: समाज म्हणून आपल्याला हुकूमशाहीची फार आवड! तळी उचलायला जो तो असा सरसावलेला की त्रास सोसणाऱ्यांची बाजू घेणाऱ्यांवर लोक तुटून पडतात.

Why express it? To attack ?? | व्यक्त व्हायचं ते कशाला? हल्ले करायला??

व्यक्त व्हायचं ते कशाला? हल्ले करायला??

Next

- सुनील सुकथनकर
(प्रख्यात दिग्दर्शक) 
संहितेवर काम झालं, आता प्रत्यक्ष सिनेमाकडे वळायचं अशा तयारीत असताना एकदम लॉकडाऊन झालं...
माझ्यासाठी तो निराशेचा धक्का होता. काम भरात  असताना कोरोना व्हायरस नावाची गडबड झालीय हे कळलेलं, पण ती बहुतांशी चीनमध्ये आहे असा समज होता. अचानक कामं पुढं ढकलली. सगळ्या गोष्टी पुसून गेल्यासारख्या झाल्या.  सगळं ठप्प होण्यानं निराश वाटलं. सोशल मीडियावर मात्र गर्दी उसळली. कुणी कविता केल्या, कुणी पदार्थ, कुणी व्यायाम. माझं मन रमेना. अचानक आलेला बंदिस्तपणा लिहिण्या-वाचण्यात, विचार करण्यात घालवला तरी सुरुवातीचे काही महिने वाटत राहिलं, हे कशासाठी करतोय  आपण? नवीन स्क्रिप्ट लिहायचं तरी ते कुठं घडणार, त्याचं विश्‍व कसं असणार हे कळल्याशिवाय लिखाण होत नव्हतं. वाटलं, त्यापेक्षा काहीच नको!
दडपणातून माणसांची जगण्याची, वागण्याची, व्यक्त होण्याची तऱ्हा बदलली?
सगळ्यात ठळक हे की, माझ्या भवतालचा सुशिक्षित मध्यमवर्ग समाजमाध्यम स्फोटाच्या प्रचंड आहारी गेला आहे. स्वत:चं मन वेगळ्या तऱ्हेनं रमवलं असतं, एकमेकांकडं भावना व्यक्त केल्या असत्या तर मला तितका त्रास वाटला नसता. पूर्वी असं अडकून पडायला झालं असतं तर आपण मनानं खूप दमलो असतो. त्यादृष्टीनं समाजमाध्यमांचा उपयोग झाला हे खरं, मात्र माणसं जास्तीतजास्त व्यक्त झाली ती एकमेकांचा सूड घ्यायला, हल्ले करायला. त्यासाठी राजकारणाचं अत्यंत टोकाचं झालेलं ध्रुवीकरण जबाबदार आहे असं मला वाटतं. त्यातून दोनपैकी एका ध्रुवावर तुम्ही असायलाच हवं अशी राक्षसी स्पर्धा तयार होऊन जवळची माणसंसुद्धा दुरावत गेली. कुठलेही निर्बंध माणसावर आले की  दैववादी प्रवृत्ती बळावतेच, पण हुकूमशाहीला शरण जाण्याची प्रवृत्ती प्रचंड मोठ्या प्रमाणात तयार होते. आपल्याला सगळ्यांनाच समाज म्हणून हुकूमशाहीची आवड आहे. ती तळी उचलायला एवढी मंडळी सरसावलेली दिसली की लोकशाहीचे प्रश्‍न उपस्थित करणं, त्रास सोसणाऱ्यांच्या बाजूनं लिहिणं, यंत्रणेच्या निष्ठूरपणातून झालेली अडचण मांडणं असं करणाऱ्यांवर लोक तुटून पडले. दानिश सिद्धीकीसारखा फोटोग्राफर काहीही हातात नसताना चालत सुटलेले मजूर, व्यवस्थेची कमजोरी, पोराबाळांची हेळसांड, मृतदेहांच्या विल्हेवाटीबद्दल सांगत होता. त्याचवेळी गरिबी व त्रासापोटी मरणाऱ्या माणसांचीच चूक आहे असं म्हणणारा असंवेदनशील मध्यमवर्गही दिसत होता. सुरुवातीला‘कोरोनाचा रुग्ण’ हे भूत इतकं फुगवलेलं होतं की या रुग्णांना  कदाचित लोक मारून टाकतील इतकी द्वेषभावना तयार झाली होती. रुग्णांविषयी ‘सापडले’ ‘आढळले’ अशा बातम्यांमधील शब्दयोजनेतूनही ते दिसतं. आपल्या देशात जो दंगा झाला त्यावरून आपल्या देशाचं खूप घाणेरडं चित्र आपल्यालाही कळलं आणि जगालाही!  त्या भयंकर काळात  आपलं काही चुकलं असं आज कुणालाच वाटत नाहीये ही गोष्ट मला खूप त्रास देते.
मराठीसिनेमा जगभरातल्या महत्त्वाच्या महोत्सवांमध्ये पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार अशी घोषणा  सांस्कृतिक मंत्र्यांनी केलीय...
१९८०-८५ पासूनच मराठी चित्रपटाला राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचं स्थान येऊ लागलं होतं, फक्त याची दखल मराठी वृत्तपत्रं अजिबात घेत नव्हती. १९९६ मध्ये ‘दोघी’ सिनेमाला टोरिनोसारख्या जागतिक महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं बक्षीस मिळालं याबद्दलची चर्चाही झाली नाही.  इंडियन पॅनोरामा, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवात आता मराठीलाही स्थान मिळताना दिसतं. अन्य भाषेतील समीक्षक म्हणतात, आम्हाला मराठीत काय नवं येणार याची उत्सुकता असते. पण प्रेक्षकांची अभिरुची व संख्या मराठीमध्ये वाढली आहे का, याबद्दल मला शंका वाटते. वितरण व्यवस्थेबद्दलही अडचणी आहेत. वेगवेगळ्या वाहिन्यांमधून मराठी चित्रपटासाठीचा पाठिंबा कमी होत जाणं, कसदार समीक्षेचा अभाव यामुळे चांगले मराठी सिनेमे दुर्लक्षितच होत गेले.  
‘जागतिक स्तरावर मराठी चित्रपट पोहोचवायचा’ हे वक्तव्यही अज्ञानातून आलेलं आहे. ऑस्कर वगळता व्हेनिस, टोकियो, टोरंटो, बर्लिन, कान या सगळ्या महोत्सवांमध्ये कुठल्याही देशाचं सरकार जाऊन आपले चित्रपट घालू शकत नाही. त्यामुळं मराठी चित्रपटाबाबतीत त्यांचा अर्थ अमूक फेस्टिव्हलच्या मार्केट सेक्शनपर्यंत पोहोचवायचं असा असेल. ‘महाराष्ट्र सांस्कृतिक संचालनालया’चा एक स्टॉल अशा महोत्सवात लागणं यानं त्या समुद्रात काही फार मोठा फरक पडत नाही.  लॉकडाऊनच्या काळात मला बरं वाटणारी गोष्ट एवढीच होती की आता ‘एन्टरटेनमेंट’ची गरज लोकांना पटेल. चांगला कंटेट ओटीटी प्लॅटफॉर्मना घ्यावासा वाटेल; मात्र त्या बरं वाटण्याला या प्लॅटफॉर्मचा मराठी चित्रपटांबाबतीत प्रतिसाद तसा यथातथाच आहे.  मराठी चित्रपट अजूनही बॅकबेंचर आहे, तो म्हणूनच!
मुलाखत : सोनाली नवांगुळ

Web Title: Why express it? To attack ??

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.