पाकिस्तानला पुराने का उद्ध्वस्त केले? तेथील एक तृतीयांश जमीन सध्या पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 11:15 AM2022-09-06T11:15:16+5:302022-09-06T11:15:47+5:30

पाकिस्तानातील एक तृतीयांश जमीन सध्या पाण्याखाली आहे, देशात आणीबाणी लावण्याइतका भीषण पूर येण्याची कारणे काय आहेत?

Why flood devastated Pakistan One third of the land there is currently under water | पाकिस्तानला पुराने का उद्ध्वस्त केले? तेथील एक तृतीयांश जमीन सध्या पाण्याखाली

पाकिस्तानला पुराने का उद्ध्वस्त केले? तेथील एक तृतीयांश जमीन सध्या पाण्याखाली

Next

प्रवीण कोल्हे, अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग, पुणे -

या शतकातील सर्वात मोठा पूर सध्या पाकिस्तान अनुभवत आहे. या देशातील सुमारे एक तृतीयांश जमीन सध्या पाण्याखाली आहे. साडेतीन कोटी लोक विस्थापित झाले आहेत, तर तेराशेपेक्षा जास्त लोक प्राणास मुकले आहेत. १२ लाख घरे, ५००० किलोमीटर लांबीचे रस्ते आणि २४० पूल आतापर्यंत वाहून गेले आहेत. एवढे घडूनसुद्धा दुर्दैवाचा फेरा अजून संपलेला नाही, असे म्हटले जात आहे. कारण येणाऱ्या कालावधीमध्ये पूर, जलमय परिस्थिती, संसर्गजन्य रोग आणि मदतकार्यात येणाऱ्या बाधा ही आव्हाने असणार आहेत. २५ ऑगस्ट २०२२ रोजी पाकिस्तानने आणीबाणी घोषित केली आहे. 

‘नेचर’मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखानुसार २०२२ चा पूर येण्यामागे प्रमुख दोन कारणे आहेत. पहिले कारण हे हवामानातील बदलाशी निगडित आहे. या वर्षांच्या एप्रिल - मे महिन्यात उष्णतेची लाट आली. त्यामुळे उत्तरेकडील बर्फाच्छादित असलेल्या पर्वतरांगा वितळून हिमनद्यांमध्ये पूर आला. दुसरे कारण मुसळधार मोसमी पावसाशी निगडित आहे. 

एप्रिल-मे २०२२ मध्ये पाकिस्तानात उष्णतेची तीव्र लाट आली होती. जकोबाबाद शहरात तापमानाचा पारा ५२.८ अंश सेल्सियसपर्यंत वाढला होता. जगातील सर्वाधिक तापमान असलेले ठिकाण म्हणून या शहराची नोंद झाली होती. जर वातावरणात उष्मा असेल तर हवा जास्त आर्द्रता धरून ठेवते. या पार्श्वभूमीवर जोरदार पर्जन्यमान होणार, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली होती. या उष्णतेच्या लाटेमुळे पाकिस्तानच्या उत्तरेकडील हिमशिखरे आणि हिमनद्या वितळून त्यातील पाणी सिंधू (इंडस) नदीमध्ये जमा होऊ लागले होते. सिंधू नदी पाकिस्तानमधील सर्वात मोठी नदी असून या नदीने पाकिस्तानचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग केले आहेत. ही नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत कराचीजवळ अरबी समुद्रास मिळते. सिंधू नदी व या नदीस मिळणाऱ्या उपनद्यांवर पाकिस्तानमधील सुमारे दोन तृतीयांश शेती आणि पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत अवलंबून आहेत. 

पाकिस्तानच्या उत्तरेकडील हिमनद्यांमधून सिंधू नदीमध्ये आलेले पाणी हे अत्यंत गढूळ आणि गाळयुक्त होते. यावरून असा निष्कर्ष काढला गेला की, हिम वितळण्याची प्रक्रिया अत्यंत जलद गतीने घडली असणार आणि त्यामुळे या पाण्यासोबत गाळ वाहून आला. प्रवाहात असलेल्या बर्फ, माती, दगड यामुळे नदीच्या पात्रात अडथळा निर्माण होऊन निसर्गनिर्मित धरण तयार झाले. तथापि, वरच्या बाजूने येणाऱ्या वेगवान प्रवाहामुळे असा जलाशय फुटून हिमनदीचा उद्रेक होऊन पूर येतो. ज्याला हिमतलाव उद्रेक पूर (Glacial lake outburst flood) असे म्हटले जाते. या पुराचा प्रवाह अत्यंत वेगवान असतोच, शिवाय प्रवाहासोबत मोठ्या प्रमाणात गाळ वाहून आल्याने त्या संवेगामुळे (momentum) त्याची विध्वंसक शक्ती वाढते. अनेक पूल, रस्ते आणि नदीकडील इमारती या पुरामुळे बाधित होऊन पुरासोबत वाहून जातात आणि पुराची ताकद वाढवतात. 

या वर्षीच्या पुरासाठी कारणीभूत ठरलेले दुसरे कारण अस्मानी संकटाशी निगडित आहे. एप्रिल-मे मध्ये आलेल्या उष्णतेच्या लाटेनंतर जून महिन्यात अरबी समुद्रात अभूतपूर्व असा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. ही एक दुर्मीळ आणि अपवादात्मक घटना होती. जमिनीवर उष्णतेची लाट आणि समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणे या दोन घटना पाठोपाठ घडल्या. यामुळे पाकिस्तानच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडला. यासोबतच मान्सूनचे आगमनदेखील झाले. यामुळे या देशात गेल्या ३० वर्षांच्या सरासरी पर्जन्यमानाच्या दुप्पट पाऊस पडला, ज्याचे एकूण परिमाण ३९०.७ मिलीमीटर एवढे आहे. सिंध आणि बलुचिस्तान या प्रदेशात तर सरासरीच्या पाचपट एवढा पाऊस पडल्याची नोंद झाली. सिंध प्रांतात पाडीदान (Padidan) या ठिकाणी ऑगस्ट महिन्यात १,२८८ मीमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. याच ठिकाणी सरासरी ४६ मीमी एवढेच पावसाचे प्रमाण आजवर नोंदवलेले आहे.

सिंधू नदीत हिमनद्यांमधून आलेला पूर या नदीच्या आणि उपनद्यांच्या किनाऱ्यावर पसरणे आणि त्याचवेळी इतर भागात मुसळधार पावसामुळे पाण्याचा निचरा न झाल्यामुळे ते पाणी सखल भागात साचणे यामुळे पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर पुराच्या पाण्याने वेढा घातला.

गेल्या २० वर्षात पडलेला पाऊस आणि त्यामुळे आलेला पूर यांचा आढावा घेतला तर लक्षात येते की ढगफुटी, मुसळधार पाऊस आणि जास्त वेळ चालणारा पाऊस यांचे प्रमाण आणि त्यामुळे येणाऱ्या पुराचे प्रमाण वाढतच चालले आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर या परिणामामुळे जगभरातच विध्वंसकारी घटनांचे प्रमाण वाढत चालले आहे. विकासाच्या वाटेवर असताना पूर आणि दुष्काळ ही संकटे अधिक गांभीर्याने हाताळण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी हवामान बदलांचा स्थानिक स्तरावर होऊ घातलेला परिणाम विचारात घेऊन यथायोग्य उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
 

Web Title: Why flood devastated Pakistan One third of the land there is currently under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.