इंजिनिअरिंग मराठीत शिकवण्याची घाई का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 08:13 AM2022-01-07T08:13:11+5:302022-01-07T08:15:27+5:30

अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम यंदा प्रथम वर्षासाठी मराठीतूनही सुरू करण्यात आला आहे. अतिउत्साहापोटी केलेली ही घाई नक्की नडेल!

Why hurry to teach engineering in Marathi? | इंजिनिअरिंग मराठीत शिकवण्याची घाई का?

इंजिनिअरिंग मराठीत शिकवण्याची घाई का?

Next

- डॉ. सुनील कुटे, अधिष्ठाता, क. का. वाघ अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन संस्था, नाशिक

मातृभाषेतून दिलेलं शिक्षण अधिक प्रभावी ठरते याबद्दल जगातील सर्व शिक्षणतज्ज्ञांचे एकमत आहे. याला अनुसरून जपान, जर्मनी, फ्रान्स, युरोपातील अनेक देश, चीन व जगभरात सुनियोजितपणे पहिलीपासून ते उच्च शिक्षणापर्यंत मातृभाषेतून शिक्षण दिले जाते. असे केल्याने ते देश प्रगतीत मागे पडले किंवा तेथील वर्ग ओस पडले असे घडलेले नाही. जगाच्या या अनुभवावरूनच आपल्याकडे अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या ‘राष्ट्रीय शिक्षण धोरणात’ मातृभाषेतून शिक्षण या संकल्पनेचा पुरस्कार केला आहे.

या धोरणाला प्रतिसाद देत  राज्यातील १७९ तंत्रनिकेतनमध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून प्रथम वर्षासाठी अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. सुरुवातीला इंग्रजी व मराठी भाषेतून हे अभ्यासक्रम शिकणे ऐच्छिक असेल व विद्यार्थ्यांना सैद्धांतिक विषयात, परीक्षेत इंग्रजी वा मराठीत उत्तरे लिहिण्याची मुभा असेल. त्यासाठी सैद्धांतिक विषयांच्या मराठी अभ्यास साहित्याची निर्मिती करण्यात आली आहे. अन्य अभ्यास साहित्याची निर्मिती संस्था स्तरावर करण्याचे निर्देश आहेत. अशाच प्रकारचा प्रयोग अभियांत्रिकी पदवी शिक्षणात करण्याचा मानस अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) याआधीच व्यक्त केला आहे. त्याला मात्र राज्यात हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या महाविद्यालयांनी प्रतिसाद दिला आहे. आता १७९ तंत्रनिकेतनांमधून मराठी माध्यमात शिक्षण घेतल्यानंतर अभियांत्रिकी पदवी महाविद्यालयात थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतल्यावर या विद्यार्थ्यांना मराठी माध्यमात पदवी अभ्यासक्रम शिकविणारी महाविद्यालयेच उपलब्ध नसतील तेव्हा त्यांनी काय करावे, असा गंभीर प्रश्न भविष्यात निर्माण होऊ शकतो.

शिक्षण क्षेत्रात कोणताही निर्णय घेताना पहिली ते पदवी असा एकात्मिक व सर्वांगीण विचार होणे आवश्यक असते. कोणत्याही टप्प्यावर स्वतंत्रपणे एकांगी विचार अमलात आणल्यास त्याचे परिणाम प्रदीर्घ काळ भोगावे लागतात. धोरणकर्त्यांची धोरणे प्रत्येक सत्ताबदलानंतर बदलत असतात. शिक्षणतज्ज्ञांनी  प्रत्येक बदलाची तळी उचलली तर अनेक पिढ्यांचे अशा धरसोडीमुळे नुकसान होऊ शकते. विदेशात शिक्षणविषयक निर्णय प्रदीर्घ चिंतन व मंथन करून टप्प्याटप्प्याने सुनियोजित पद्धतीने अमलात आणले जातात, त्यामुळे ते यशस्वी होतात. आपल्याकडे नियोजन व अंमलबजावणीत उथळपणा, फाजील आत्मविश्वास व अती उत्साही प्रतिसाद यामुळे व्यवस्थाच कोलमडते.
अभियांत्रिकी शिक्षण मातृभाषेतून देण्याची संकल्पनाही अशीच कोलमडू नये म्हणून दुसऱ्या बाजूचाही विचार होणे आवश्यक आहे.

इंग्रजी या जागतिक ज्ञानभाषेतून शिक्षण घेतले नाही तर आपली मुले मागे पडतील या भावनेने  इंग्रजी माध्यमात मुलांना शिक्षण देण्याची प्रबळ इच्छा पालकांमध्ये दिसते. याला मराठी माध्यमात शिक्षण देणाऱ्या शाळांची उदासीनता, भाषेकडे होणारे अक्षम्य दुर्लक्षही कारणीभूत आहे.  यामुळेच इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या बेसुमार वाढून मराठी शाळांना मुले मिळेनाशी झाली. काही ठिकाणी मराठी शाळा प्रवेशाअभावी बंद पडल्या, काही ठिकाणी  बंद पाडल्या गेल्या, तर काही ठिकाणी ‘सेमी इंग्लिश’चा मधला मार्ग स्वीकारून अनुदानावर ‘जगवल्या’ गेल्या; पण इंग्रजी माध्यमांचे आकर्षण कमी झाले नाही. 

मराठी माध्यमाच्या शाळा सशक्तपणे चालविणे, तेथे शिकविण्यात येणाऱ्या इंग्रजी भाषेत विद्यार्थी निपुण कसे बनतील यावर लक्ष केंद्रित करणे, भाषा विषयाकडे होणारे दुर्लक्ष थांबविणे, यासाठी तेथे पैसे देऊन टीईटी परीक्षा पास झालेले शिक्षक न नेमणे यासारखे प्रयत्न होताना दिसत नाहीत. मराठी विषय इंग्रजी माध्यमात शिकविला नाही तर अनुदान बंद करू, अशी धमकी शासन इंग्रजी शाळांना देते. याचा अंतिम परिणाम म्हणजे मराठी शाळांतील विद्यार्थ्यांचे इंग्रजी कच्चे व इंग्रजी शाळांतील विद्यार्थ्यांचे मराठी कच्चे. दोन्ही माध्यमात मुळातच भाषा, समाजशास्त्र, आदी विषयांकडे दुर्लक्ष झाल्याने मातृभाषेत शिक्षण द्या किंवा इंग्रजीत द्या, विद्यार्थी सुमार दर्जा घेऊन भरमसाट गुणांनी उत्तीर्ण होणार. दहावीच्या निकालाला आलेली सूज व त्या विद्यार्थ्यांना साधे लिहिता, वाचता न येणे या बाबी याचेच द्योतक आहेत. आपल्याला इंग्रजी भाषेवर प्रभुत्व हवे होते, आपण त्यासाठी इंग्रजी माध्यमात मुलांना डांबले. भाषेवरील प्रभुत्व व माध्यमाची निवड या पूर्णत: भिन्न बाबी आहेत. याची गल्लत झाल्याने ना मुलांचे भाषेवरील प्रभुत्व वाढले, ना त्यांचा दर्जा. यामुळे दोन्ही माध्यमात शिकलेले विद्यार्थी नित्कृष्ट दर्जाचे! त्यांचे शिक्षकही तसेच!! अर्थात सन्माननीय अपवाद सोडून! 

दहावीपर्यंत इंग्रजी माध्यमात शिकलेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिक्षण एकदम मराठीत घेणे अवघड होईल. ज्यांनी स्वत:च मराठी भाषेत अभियांत्रिकी शिक्षण घेतलेले नाही असे शिक्षक मराठी भाषेत कितपत समर्थपणे अभ्यास साहित्य निर्मिती करू शकतील व शिकवू शकतील याबद्दलही शंकाच आहे. शिवाय अभ्यास साहित्य निर्मिती फक्त सैद्धांतिक विषयांपुरती ठेवून इतर विषय संस्था पातळीवर सोपविण्यात येण्यात एकजिनसीपणा व प्रमाणीकरणही होणार नाही. शिवाय मराठी माध्यमात शिकूनही मराठीवर प्रभुत्व नसलेल्या विद्यार्थ्यांनाही भविष्यात अडचण येऊ शकते. संगणक व तत्सम ‘सॉफ्ट’ विद्याशाखांना मराठी प्रतिशब्द शोधणेही जिकिरीचे आहे. ही दुसरी बाजू लक्षात घेता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शिफारस असली तरी मराठी माध्यमाचे शालेय शिक्षण सशक्त करून शिक्षकांना मराठी माध्यमातील अभियांत्रिकी शिक्षण व प्रशिक्षण देऊन पुढील दहा वर्षांनंतर सुनियाेजित पद्धतीने मराठीतून अभियांत्रिकी शिक्षणाचा श्रीगणेशा करावा, अन्यथा माध्यमाच्या गोंधळात अभियांत्रिकी क्षेत्राचे अपरिमित नुकसान करणारे अभियंते निर्माण होतील.

Web Title: Why hurry to teach engineering in Marathi?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.