ये इंडिया इतना परेशान क्यूँ है ? भय आणि भीतीच्या छायेत ते जगत आहेत. त्यामुळे ते नाखुशही
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 05:56 AM2021-03-22T05:56:36+5:302021-03-22T05:56:58+5:30
जगात दरवर्षी वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स जाहीर केला जातो, त्याचे निकष मात्र ठरलेले असतात. त्याच निकषांवर यादी केली जाते
जगात अशी कोणती व्यक्ती आहे, जिला काहीच दु:ख, चिंता, काळजी, नैराश्य नाही? अशी एक तरी व्यक्ती आहे का, की जी कायम खुश, सुखी, आनंदी असते? ज्यांनी विकारांवर विजय प्राप्त केला आहे, अशी एकही व्यक्ती सापडणं मुश्कील असं म्हटलं जातं. अगदी साधू, संतही त्याला अपवाद नाहीत. दु:ख कोणालाच चुकलेलं नाही; पण म्हणून आपण खुश, आनंदी राहू शकत नाही असं नाही. आनंदाची पातळी प्रत्येकाला वाढवता येते. आनंदी राहाणं, असणं हे आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीवर, मानसिकतेवर बरंचसं अवलंबून असलं तरी त्यात बदल मात्र आपण घडवू शकतो. अर्थातच प्रत्येकाचं सुख, आनंद वेगवेगळ्या गोष्टींत असतो. एखादी व्यक्ती अमुक एका घटनेमुळे, कृतीमुळे आनंदी होईल, तर दुसरी व्यक्ती त्याच कृत्यामुळे दु:खी, निराश होऊ शकेल.
जगात दरवर्षी वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स जाहीर केला जातो, त्याचे निकष मात्र ठरलेले असतात. त्याच निकषांवर यादी केली जाते आणि जगातला सर्वात खुश देश कोणता आणि सर्वात नाखुश देश कोणता हे ठरवले जाते. ‘युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट सॉल्यूशन्स नेटवर्क’ या संस्थेतर्फे ही पाहणी केली जाते. त्यासाठीचे तीन निकष त्यांनी ठरवून दिलेले आहेत. जीवन मूल्यांकन (लाइफ इव्हॅल्युएशन्स), सकारात्मक भावना (पाॅझिटिव्ह इमोशन्स), आणि नकारात्मक भावना (निगेटिव्ह इमोशन्स) हे ते तीन प्रमुख निकष आहेत. या यादीत लागोपाठ चाैथ्या वर्षी फिनलंड पहिल्या क्रमांकावर आला आहे, तर १४९ देशांत भारताचा क्रमांक आहे १३९!
‘गॅलप वर्ल्ड पोल’चा डेटा यासाठी प्रमुख आधार मानला जातो. सध्याचं तुमचं जीवन कसं आहे, त्यात तुम्ही किती समाधानी आहात यावर सर्व देशांच्या निवडक नागरिकांना काही प्रश्न विचारले जातात. आयुष्य अतिशय समाधानी आहे, असं उत्तर आलं, तर पैकीच्या पैकी म्हणजे दहा गुण दिले जातात आणि नागरिक जर फारच दु:खी असतील, एकही आशादायक गोष्ट आपल्या आयुष्यात घडत नाहीये असं त्यांना वाटत असेल तर शून्य गुण दिले जातात. भावनिकतेपेक्षा रोजच्या जीवनातील नागरिकांचा दैनंदिन अनुभव कसा आहे, प्रत्यक्ष परिस्थिती कशी आहे, यावर हे गुणांकन केलं जातं. सकारात्मक भावना जाणून घेण्यासाठी लोकांना एक प्रमुख प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे आज, काल दिवसभर तुम्ही किती हसलात? त्यानुसार एक आणि शून्य असे गुण दिले जातात.
नकारात्मक भावनांचा अभ्यास करण्यासाठी लोकांना त्या दिवसभरातील त्यांच्या नकारात्मक भावनांबाबत, नाखुश असण्याबाबत प्रश्न विचारले जातात. तुम्ही आज दिवसभरात किती चिंताक्रांत होता? किती दु:खी होता? दिवसभरात तुमच्या रागाचा पारा केव्हा आणि किती वेळा चढला?- त्या व्यक्तीच्या उत्तरानुसार गुण दिले जातात. या सगळ्या निकषांवर फिनलंड हा देश लागोपाठ पहिल्या क्रमांकावर आला आहे. या यादीतील पहिले वीस देश आहेत अनुक्रमे फिनलंड, डेन्मार्क, स्वीत्झर्लंड, आईसलँड, नेदरलँड, नॉर्वे, स्वीडन, लक्झेमबर्ग, न्यूझीलंड, ऑस्ट्रिया, ऑस्ट्रेलिया, इस्त्रायल, जर्मनी, कॅनडा, आयर्लंड, कोस्टा रिका, इंग्लंड, झेक गणराज्य, अमेरिका आणि बेल्जियम.
आपल्या आनंदाचा आणि दु:खाचा स्तर किती आहे, हे या सर्व्हेतून समजत असल्यामुळे या अहवालाला जगात फार महत्त्व आहे. सर्वसामान्य लोकही या अहवालाकडे डोळे लावून वाट पाहात असतात आणि आपला देश या यादीत कितव्या क्रमांकावर आहे, हे पडताळून पाहात असतात. गेल्यावर्षी वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्समध्ये १५६ देशांचा समावेश होता. यंदा काही देश या यादीतून वगळण्यात आले, कारण त्यांचं सर्वेक्षण झालं नव्हतं किंवा दरवर्षी त्या त्या देशातील जी सॅम्पल संख्या घेतली जाते, त्यापेक्षा यावेळची सॅम्पल संख्या कमी होती, त्यामुळे यंदाच्या यादीत कमी देश आहेत.
जगात सर्वात दु:खी देशांमध्ये अफगाणिस्तानचा क्रमांक लागतो. भारताची कामगिरी दरवर्षीप्रमाणे यंदाही निराशाजनकच आहे. भारतापेक्षा फक्त दहा देश मागे आहेत. त्यात बुरुंडी, येमेन, टांझानिया, हैती, मालावी, लेसॉर्थो, बोस्टवाना, रवांडा, झिम्बाम्ब्वे आणि सर्वात अखेरच्या क्रमांकावर आहे अफगाणिस्तान. पूर्वी अनेक देशांतील लोकांचा अमेरिकेकडे ओढा होता. तिथे जाऊन आपण स्थायिक व्हावं असं त्यांना वाटत होतं, पण कोरोनाकाळात अमेरिका पिछाडीवर पडल्याने अनेक देशांतील लोकांनी अमेरिकेऐवजी कॅनडाला पसंती दिली. वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्समध्ये कॅनडाचा क्रमांक आहे १४, तर अमेरिकेचा क्रमांक आहे १९. झिम्बाम्ब्वे आणि अफगाणिस्तान हे देश अगदी तळाला आहेत, कारण त्याठिकाणी असलेली परिस्थिती आणि देशातील लोकांची मानसिकता. त्याचं कारण म्हणजे जगातले हे दोन्ही देश सर्वात परेशान, दु:खी देश आहेत. भय आणि भीतीच्या छायेत ते जगत आहेत. त्यामुळे ते नाखुशही आहेत.
कोरोनानं हिरावला लोकांचा आनंद
यावेळचा वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स कोरोनामुळे लोकांच्या अडचणीत वाढ झाली,हे दाखवतो. कोरोनाच्या प्रसारामुळे लोकांच्या जीवनमानात झालेला बदल, सामाजिक, राजकीय परिस्थितीचा परिणाम इत्यादी गोष्टींचाही आम्ही अभ्यास केला, असं या अहवालात म्हटलं आहे.