बांगलादेश का ठरताेय भारतासाठी डोकेदुखी?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2024 09:01 AM2024-12-01T09:01:57+5:302024-12-01T09:02:22+5:30

मुद्द्याची गोष्ट : 1971 साली भारतामुळे बांगलादेश जन्माला आला; पण आता हेच अपत्य भारताकडे द्वेषाने पाहत आहे. त्याला तेथील राजकारणही कारणीभूत आहे. बांगलादेशमध्ये शेख हसीना यांच्याविरोधात जो असंतोष निर्माण झाला, त्यात तेथील नागरिकांनी भारतविरोधी भावना व्यक्त केली होती. हे सगळे चित्र दुर्देवी आहे व त्याचे दूरगामी परिणाम दोन्ही देशाच्या संबंधांवर होणार आहेत.

Why is Bangladesh a headache for India? | बांगलादेश का ठरताेय भारतासाठी डोकेदुखी?

बांगलादेश का ठरताेय भारतासाठी डोकेदुखी?

समीर परांजपे मुख्य उपसंपादक

भारताने ज्या बांगलादेशची निर्मिती केली, त्याच देशाबरोबर तणावाचे संबंध निर्माण झाल्याचे दुर्दैवी चित्र सध्या दिसत आहे. बांगलादेशच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजवटीविरोधात तेथील जनतेमध्ये मोठा असंतोष होता. त्याचा भडका उडाल्यानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला व बांगलादेशचा त्याग करून त्या भारतात आल्या. हसीना या नेहमी भारताला अनुकूल असल्याचे म्हटले जात असे. त्यात काही प्रमाणात तथ्यही आहे; मात्र त्या सत्तेवर असताना बांगलादेशचे भारताशी खूप घनिष्ट संबंध होते असे म्हणता येणार नाही. त्या देशाशी भारताचा सीमेवरून सुरू असलेला वाद, बांगलादेश रायफल्सचे सीमेवर तस्करांशी असलेले साटेलोटे, भारतीय हद्दीत बांगलादेशी नागरिकांच्या घुसखोरीला बांगलादेश रायफल्स देत असलेले पाठबळ या खटकणाऱ्या गोष्टी आहेत.

शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळालेले अर्थतज्ज्ञ मुहम्मद युनूस हे बांगलादेशमध्ये हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार आहेत. शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर तेथील जनतेच्या आग्रहाखातर युनूस यांनी हे पद स्वीकारले आहे असे ते म्हणतात. बांगलादेशमध्ये झालेल्या निदर्शनात तेथील अल्पसंख्याकांवरही हल्ले झाले.  त्याचा भारताने कडक निषेध नोंदविला होता.

बांगलादेशमध्ये हंगामी सरकार स्थापन झाल्यानंतरही तेथील अल्पसंख्याकांवरील हल्ल्याचे प्रमाण कमी होत नव्हते. शेख हसीना यांच्याविरोधात असंतोषाचा जो भडका उडाला त्यात तेथील काही मंदिरे, अल्पसंख्याकांची घरे, मालमत्ता यांची नासधूस करण्यात आली होती.  पूर्वी इस्कॉनशी संबंधित असलेले चिन्मय कृष्ण दास यांना अटक केल्यानंतर भारत व बांगलादेशमधील तणाव पुन्हा वाढला आहे. बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक लोकांच्या सुरक्षेची काळजी तेथील सरकारने वाहणे आवश्यक असताना त्या देशात काही अनपेक्षित प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अटक झालेले चिन्मय कृष्ण दास यांची यापूर्वीच इस्कॉन बांगलादेशच्या सर्व पदांवरून हकालपट्टी करण्यात आली आहे असे त्या संघटनेच्या धुरिणांनी जाहीर केले. तसेच चिन्मय कृष्ण दास हे करीत असलेले आंदोलन किंवा मांडत असलेले विचार यांच्याशी आमचा कोणताही संबंध नाही असे इस्कॉन बांगलादेश या संस्थेने जाहीर केले.  चिन्मय कृष्ण दास यांना पाठिंबा दिला असता तर इस्कॉन बांगलादेश या संस्थेचे अस्तित्व संपविण्याची तेथील राज्यकर्त्यांनी तजवीज केली असती.

राजकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झाली

चिन्मय कृष्ण दास यांना तुरुंगात धाडण्यात आले असून त्यांना जामीन देण्यास बांगलादेशमधील  न्यायालयाने नकार दिला. त्या देशातील न्यायालयेदेखील पक्षपाती असून ते सत्ताधाऱ्यांना उत्तम वाटेल असेच निकाल देतात हे गेल्या दोन महिन्यांतील प्रसंगावरून लक्षात आले आहे. शेख हसीना बांगलादेशातून परागंदा झाल्यानंतर विरोधी पक्षनेत्या खालिदा झिया यांची खटल्यातून मुक्तता झाली.

पाकिस्तानातील न्याययंत्रणा सत्ताधीश, लष्कर यांच्यापुढे झुकल्याची अनेक उदाहरणे आहेत. बांगलादेशमध्येही आता तेच पाहायला मिळत आहे.  बांगलादेशच्या राजकारणात शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर एक पोकळी निर्माण झाली. मुहम्मद युनूस हा त्यांना पर्याय होऊ शकत नाही. ती पोकळी भरून काढण्यासाठी लागणारे सामर्थ्य बेगम खालिदा झिया यांच्यापाशी उरलेले नाही.

बांगलादेशमधील हल्ल्यांमुळे अल्पसंख्यक भयभीत

nबांगलादेशमध्ये २०२२ साली झालेल्या जनगणनेनुसार १६.५१ कोटी लोकसंख्या आहे. त्यात ७.९५ टक्के लोक हिंदूधर्मीय आहेत. जगात सर्वाधिक हिंदू भारतात राहातात. दुसरा क्रमांक नेपाळ व तिसरा क्रमांक बांगलादेशचा लागतो.

nबांगलादेशमधील अल्पसंख्याक समुदायांमध्ये हिंदुंचा वरचष्मा आहे. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात जनतेने केलेल्या उठावामध्ये काही मुलतत्ववाद्यांनी मंदिरे जाळण्याचे, अल्पसंख्यकांवर हल्ले करण्याचे धक्कादायक प्रकार केले.

nप्रसारमाध्यमे हल्ल्यांच्या अतिरंजित बातम्या प्रसिद्ध करत आहेत अशी सारवासारव बांगलादेशच्या हंगामी सरकारने केली पण वस्तुस्थिती वेगळी होती हे आता लपून राहिलेले नाही. अशा हल्ल्यांचा भारत सरकारने अतिशय तीव्र शब्दांत निषेध केल्यामुळे बांगलादेशसह जगाला या गोष्टींची दखल घेणे भाग पडले आहे.

बांगलादेशचा बहुतांश कारभार लष्कराच्या ताब्यात गेला आहे. त्या देशात लोकशाही व्यवस्थेत अजून धुगधुगी आहे असे दाखवण्यासाठी युनूस यांच्या हातात सत्ता सोपविण्यात आली आहे. पण अशा गोष्टींमुळे त्या देशाची राजकीय घडी नीट बसेल या भ्रमात कोणीही राहू नये.

बांगलादेशच्या राजकारणात भारतद्वेष हा तेथील राजकारण्यांना यश मिळवून देणारा आवश्यक घटक झाला आहे. मुहम्मद युनूस किंवा त्यांच्यानंतर येणाऱ्या सत्ताधीशांकडून अशाच प्रकारचे भारतदेशाशी वर्तन अपेक्षित आहे.

१९७१ साली भारतामुळे बांगलादेश जन्माला आला; पण आता हेच अपत्य भारताकडे द्वेषाने पाहत आहे. शेजारी देश म्हणून संबंध दृढ ठेवत असतानाच बांगलादेशला चार खडे सुनावणे आवश्यक होते.

ते करूनही बांगलादेशमधील कट्टरपंथी आपल्या कारवाया थांबवतील या भ्रमात कोणीही राहू नये. या सर्व स्थितीमुळे बांगलादेश हा भारतासाठी डोकेदुखी ठरला आहे.

Web Title: Why is Bangladesh a headache for India?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.