महाराष्ट्रात ‘गब्बरसिंग’ का जन्माला येत आहेत?

By सुधीर लंके | Published: August 29, 2023 09:00 AM2023-08-29T09:00:26+5:302023-08-29T09:11:08+5:30

आज अनेक क्षेत्रात ‘सभ्य’ दिसणारे गब्बर आहेत. त्यांची सरंजामी मानसिकता हा खरा प्रश्न आहे, ती कशी बदलणार? 

Why is 'Gabbar Singh' being born in Maharashtra? | महाराष्ट्रात ‘गब्बरसिंग’ का जन्माला येत आहेत?

महाराष्ट्रात ‘गब्बरसिंग’ का जन्माला येत आहेत?

googlenewsNext

- सुधीर लंके 
(निवासी संपादक, अहमदनगर आवृत्ती)

‘शोले’ हा सिनेमा १९७५ साली स्वातंत्र्यदिनी प्रदर्शित झाला. त्याला दोन वर्षांनी अर्धशतक पूर्ण होईल. शोलेमधील ‘गब्बर’ला आपण आजवर विसरू शकलेलो नाही. हा गब्बर ना-ना धंदे करतो, गाव लुटतो. महिलांना पळवितो. दहशत माजवतो. बसंतीला बळजबरी नाचायला लावतो.  गब्बर हा केवळ डाकू नव्हता, ती एक मानसिकता आहे. लोकांना आपल्या दहशतीखाली ठेवण्याची. परवा अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यात हरेगाव येथे कबुतर व शेळ्या चोरल्याच्या संशयावरून एका इसमाने चार तरुणांना झाडावर उलटे टांगून जी मारहाण केली ती देखील ‘गब्बरसिंगी’ मानसिकताच आहे.

ग्रामीण भाषेत याला ‘सरंजामी’ मानसिकता म्हणता येईल. श्रीरामपूरच्या या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. थेट गृहमंत्र्यांनी या घटनेची दखल घेत आरोपींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. खरंच कारवाई होणार का? हे न्यायालयीन निकालानंतर समजेल. पण, मूळ मुद्दा हा की, तरुणांना उलटे टांगून त्यांना मारहाण करण्याइतके धाडस छोट्या हरेगावमधील नानासाहेब गलांडे नावाच्या एका व्यक्तीत आले कसे? हा गलांडे एका रात्रीत घडलेला नाही. ही ‘गब्बर’ प्रशासनाची देण असल्याचे गावात 
चर्चा केल्यानंतर जाणवते. तो अनेकांना धमकावत होता. त्याच्यावर यापूर्वीही दोन गुन्हे दाखल आहेत. जुने जमीनदार शेतावरील मजुरांना व गावातील इतर लोकांना गुलाम समजायचे. तशाच मानसिकतेत हा गलांडे वावरत होता. 

गलांडे दोषी आहेच. पण या प्रकरणाच्या दुसऱ्या बाजूचीही चर्चा व्हायला हवी. ती बाजूही तितकीच गंभीर आहे. गलांडेने चार तरुणांना मारहाण केली. त्यात दोन मागासवर्गीय तरुण आहेत व दोन इतर समाजातील. गलांडे याच्यासोबत मारहाण करणारे एकूण सात आरोपी आहेत. त्यातील तीन आरोपी मराठा समाजातील तर चार मागासवर्गीय समाजातील आहेत. म्हणजे गलांडे याच्या आदेशावरून मागासवर्गीय मुलेच मागासवर्गीय मुलांना मारत होती. तसेच मराठा मुलेच मराठा मुलांना मारत होती. याचा अर्थ असा मुळीच नव्हे की स्वजातीत नव्हे तर परजातीत भांडणे व हाणामारी करा.

गुन्हेगारांना जात नसते. हे जातनिहाय उदाहरण एवढ्यासाठी नमूद केले आहे की, जो सत्ताधीश अथवा मालक आहे त्याच्या आदेशावरून त्याच्या हाताखालील ‘गुलाम’ मानसिकतेचे लोक वागतात. येथे गलांडे हा मालक आहे. तो सरंजामी वृत्तीचा आहे. त्यामुळे त्याच्या मानसिकतेनुसार त्याची टोळी वागली. येथे जातीपेक्षाही मानसिकतेचा मुद्दा गंभीर आहे. आपण या मालकाचे चुकीचे आदेश पाळू नयेत असे या गुलामांना वाटले नाही. लोकशाहीत ही गुलामी सर्वात भयानक आहे. ही गुलामीच सरंजामदारांना जन्म देते. जेवढ्या काही गुंडपुंडांच्या व दादा लोकांच्या टोळ्या आहेत त्या टोळ्यांत असेच ‘सरंजामदार’ व हाताखाली राबणारे ‘गुलाम’ आहेत.

त्यामुळे हरेगावच्या घटनेची चर्चा करताना सरंजामी मानसिकतेपासून गुलामांना मुक्त कसे करणार? ही चर्चा व्हायला हवी. सरंजामांच्या हाताखाली गुलामच राहिले नाहीत तर हे लोक रुबाब कुणाच्या जोरावर गाजवतील? अशी सरंजामी व गुलामी अगदी गावखेड्यापासून दिल्लीचे राजकारण, प्रशासन अशी सगळीकडे आहे. (भलेही राजकारणी व प्रशासन लोकांना थेट उलटे टांगत नसतील.) गलांडे हा गावात दहशत माजवत असताना गाव मौन बाळगून असेल तर या मानसिकतेला काय म्हणणार? नगर जिल्ह्यातीलच खर्डा गावात मुलीवर प्रेम केले या संशयावरून नितीन आगे या मागासवर्गीय मुलाला शाळेतून उचलून नेले. पुढे त्याची हत्या केली. याप्रकरणात एकही शिक्षक अथवा गावकरी साक्ष देताना टिकला नाही. सगळ्या गावाने डोळे बंद करून घेतले. साक्षीदार फितूर झाले. त्यांचे गाव, जिल्हा, राज्य, प्रशासन यांनाही काहीच वाटले नाही. आरोपी निर्दोष आहेत तर नितीन आगेचा खून कुणी केला? याचे उत्तर न्यायपालिकेकडूनही मिळालेले नाही. 

‘गब्बरसिंग’ कायदा हातात घेत होता आणि कायदा हातात घेतल्याने आपले काहीच बिघडत नाही असे त्याला वाटते म्हणूनच तो दादागिरी करत राहिला. असे गब्बर आता गावोगाव आहेत. कुठे ते सावकार आहेत. काही गावांत ते वाळूतस्कर आहेत. काही गावांत ते भूखंडमाफिया आहेत. अन्य सभ्य म्हणून समजल्या जाणाऱ्या अनेक क्षेत्रातही ‘सभ्य’ दिसणारे गब्बर आहेत. बंदुकीच्या गोळ्यांची माळ गळ्यात लटकवलेला व काळ्या दातवालाच माणूस गब्बर असतो असे नव्हे. तो अगदी पांढऱ्या कपड्यांतही असू शकतो. शाळेत 
मुलांना अमानुष मारहाण करणारे, महिलांची विवस्त्र धिंड काढणारे, प्रेम केले म्हणून मुला-मुलींना संपविण्याची भाषा करणारे सगळे ‘गब्बरसिंगी’ मानसिकतेचेच आहेत. त्यांना वठणीवर आणणारे जय-विरू आज कुठे आहेत? 
 

Web Title: Why is 'Gabbar Singh' being born in Maharashtra?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.