का पेटलंय मणिपूर? लोकांना हवंय तरी काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 01:02 PM2023-07-30T13:02:50+5:302023-07-30T13:03:39+5:30
लाईव्ह रिपोर्ट, थेट मणिपूरहून... तीन महिन्यांपासून मणिपूर जळतेय, पण त्यामागील कारणांची चर्चा वरवरचीच होताना दिसते. दोन्ही बाजूंकडील स्थलांतरितांच्या शिबिरांत आरोग्य सेवा देणाऱ्या एका डॉक्टरांनी खास ‘लोकमत’साठी पाठवलेले अनुभव अंतर्मुख करायला लावणारे आहेत...
डॉ. प्रियदर्श, युमेत्ता फाउंडेशन -
अनेक वर्षांपासून मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये सलोख्याचे वातावरण होता. रोटी-बेटी व्यवहारही होतो. परंतु काही वर्षांपासून त्यांच्यातील दुरावा वाढला आहे. इम्फाळ आणि भवतालच्या क्षेत्रातून मैतेई समुदायाचे ३० ते ४० आमदार निवडून येतात. कुकी लोकांची अशी तक्रार आहे की, विकासासाठी आलेला ९० ते ९५ टक्के निधी मैतेईबहुल भागांमध्ये खर्च करण्यात येतो आणि पर्वतीय भागांच्या वाट्याला फक्त ५-१०% टक्के निधी येतो. आजही पर्वतीय भागात चांगले रस्ते नाहीत. शिक्षण, आरोग्य सगळ्याच गोष्टींची बोंब आहे. मैतेई लोकांची तक्रार आहे की, कुकी मूळ भारतीय नसून दीड-दोनशे वर्षांपूर्वी म्यानमारमधून आलेले स्थलांतरित आहेत. ते अफूची शेती करतात आणि ती म्यानमारला पाठवतात. कुकी अनुसूचित जमातीचे असल्यामुळे मैतेई त्यांच्या जमिनी विकत घेऊ शकत नाहीत. परंतु कुकी लोक मैतेईंची जमीन विकत घेऊ शकतात.
तात्कालिक कारण -
मैतेई समुदाय इतर जमातींच्या तुलनेत खूप पुढारलेला आहे. नोकऱ्यांतही मैतेईंची संख्या जास्त आहे. सध्याचे सरकार सत्तेवर आल्यापासून कुकी भागांवर कारवाई सुरू झाली होती. त्यातच ४० मैतेई आमदारांनी समुदायाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करावा, असा प्रस्ताव दिला. मणिपूर उच्च न्यायालयानेही केंद्र सरकारकडे तसा प्रस्ताव पाठविण्याचा निकाल दिला. त्याविरोधात अनुसूचित जमातींचे लोक एकवटले. ३ मे रोजीच्या चुरचांदपूर येथील मोर्चानंतर जाळपोळ सुरू झाली. मैतेई समुदायाने कुकी लोकांवर हल्ले केले. इम्फाळवरून ३०-४० हजार कुकी जीव मुठीत घेऊन पळाले. त्यांच्या घरांची, दुकानांची जाळपोळ केली गेली. प्रतिक्रिया म्हणून कुकीबहुल भागातूनही मैतेई लोकांची घरे आणि सामानाची जाळपोळ करण्यात आली. सशस्त्र हल्ले, हत्यांचे सत्र सुरू झाले.
स्थलांतरितांपुढील समस्या
१. आहार : अन्नधान्याची टंचाई आहे. पालेभाज्या नावालासुद्धा दिसत नाहीत. दोनवेळ फक्त वरण-भात खावा लागत आहे. मदत शिबिरांमध्ये कुपोषण वाढू शकते.
२. शिक्षण : एकाएकी घरदार सोडून पळून यावे लागल्यामुळे कोणतीही कागदपत्रे जवळ नाहीत. इथून परत जायचे की इथल्या शाळेत मुलांना दाखल करायचे, हा प्रश्न आहे. शाळेला पण प्रश्न पडला आहे की, मुलांना कोणत्या वर्गात टाकायचे. इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या मुलांचे वर्ष बुडाले.
३. आर्थिक संकट : अनेक लोकांच्या नोकऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी होत्या. आता अनेक दिवस ते नोकरीच्या ठिकाणी जाऊ शकणार नाहीत. शेतीच्या उत्पन्नावरही पाणी सोडावे लागणार आहे. दळणवळण बंद आहे. त्यामुळे किमती प्रचंड वाढल्या आहेत.
४. आरोग्य : लहानशा जागेत दाटीवाटीने एकत्र राहत असल्यामुळे आजार उद्भवू शकतात. टॉयलेट-बाथरूम अपुरी आहेत. मुलांचे लसीकरण लांबले. गरोदर माता शिबिरांमध्येच प्रसूत होत आहेत. मधुमेह, रक्तदाबासाठीची औषधे उपलब्ध नाहीत.
५. मानसिकता : अनेक लोकांचे जवळचे लोक मारले गेले, त्यांची घरे त्यांच्या डोळ्यांदेखत जाळली गेली. त्यामुळे त्यांच्या मनात प्रचंड भीती, राग, असुरक्षितता भरलेली आहे. शिबिरांमध्ये सतत याच गोष्टी चर्चिल्या जात आहेत. तरुण मुला-मुलींनी तर हिंसेचे उत्तर म्हणून शस्त्र हाती घेतले आहे.
अशी घालता येईल फुंकर...
साऱ्या जगाचे याकडे जरा उशिरानेच लक्ष गेले. मी स्वतः दोन्ही भागांत जाऊन या शिबिरांमध्ये आरोग्य सेवा देऊन आलो. तिथल्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि नेमकं काय करता येईल, याबाबत विचार केला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोन्ही गटांकडून हिंसाचार त्वरित थांबणे अत्यंत गरजेचे आहे. शांततेने तोडगा निघू शकतो, असे मानणारा एक वर्ग दोन्हीकडे आहे. असे लोक एकमेकांना मदत करत आहेत. त्यांना एकत्र आणून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. स्थलांतरित लोकांना मानवतावादी दृष्टिकोनातून मदत करावी लागेल. हिंसाचाराचे आघात झालेल्यांना विशेष समुपदेशनाद्वारे मदत करता येईल. लहान मुले, तरुण व इतर लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षणाद्वारे, खेळांद्वारे गुंतवून ठेवावे लागेल. जेणेकरून ते हिंसेपासून परावृत्त होतील.
कसे आहे मणिपूर?
पूर्वेकडे - म्यानमार, पश्चिमेकडे - सिलचर (आसाम), उत्तरेकडे - नागालँड, दक्षिणेकडे - मिझोराम
- लोकसंख्या - ३२ लाख, मैतेई - १०-१२ लाख, कुकी - ७-८ लाख, सपाट भूभाग - १०%
- पर्वतीय क्षेत्र - ९०%, लोकजीवन - मैतेई, कुकी, नागा, मुस्लीम, बौद्ध, मुख्य व्यवसाय - शेती
- इतर साधने - फलोत्पादन, वनोपज, बोलीभाषा - मैतेई, जमातींच्या वेगवेगळ्या भाषा